पुणे : विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्याने पुणे जिल्ह्यातील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात असलेल्या भाजपला आव्हान देण्यासाठी या दोन शहरांतील इच्छुक उमेदवारांपैकी एकाची निवड करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्याच बालेकिल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने ‘राष्ट्रवादी’चे पुण्यातील नेते नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी हे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत. या जागेसाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणाची निवड करणार, याबाबत उत्सुकता होती. इच्छुकांमध्ये झिशान सिद्दीकी यांच्यासह माजी केंंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील ही नावे चर्चेत होती. पुणे जिल्ह्यातीलही इच्छुक होते. त्यामध्ये पुण्यातून माजी आमदार सुनील टिंगरे, पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल हे इच्छुक होते.
पुणे जिल्हा हा ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुणे शहर किंवा पिंपरी-चिंचवडमधील एकाची निवड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, इच्छुकांच्या पदरी निराशा आल्याने ‘राष्ट्रवादी’च्या पुण्यातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपला शह देण्यासाठी या दोन शहरांपैकी एका नेत्याला संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, स्थानिक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पुण्यात एकच आमदार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकही आमदार नाही. या दोन्ही महापालिकांवर भाजपची सत्ता आहे. आगामी काळात भाजपपुढे आव्हान उभे करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांना संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिशान सिद्दीकी यांना संधी दिल्याने ‘राष्ट्रवादी’तून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
सुनेत्रा पवारांचे ‘बालेकिल्ल्या’कडे दुर्लक्ष?
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री असून, जिल्ह्याची धुरा त्यांच्याकडे आहे. मात्र, पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांना डावलून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत काही स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपला आव्हान देणार कसे?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. आगामी तीन वर्षे कोणतीही निवडणूक नाही. मात्र, पक्षाला बळकटी देण्यासाठी स्थानिक नेत्याला संधी देण्यात आली असती, तर कार्यकर्त्यांना बळ मिळाले असते. त्यातून भाजपपुढे आव्हान उभे करता आले असते. मात्र, स्थानिकांना डावलण्यात आल्याने आगामी काळात भाजपला आव्हान देणार कसे, असा सवाल काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
