आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभावशाली नेते आनंद परांजपे यांनी तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन शिंदेसेनेत प्रवेश केला… भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली… लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी नीट परीक्षाच रद्द करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली… मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बुलेट सफरीवरील पीयूसी मुद्द्यावरून राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले… शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचे मत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

आनंद परांजपे शिंदेसेनेच्या वाटेवर?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. ठाणे-पालघर क्षेत्रातील पक्षाचे प्रभावशाली नेते व माजी खासदार आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्याने परांजपे हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याच नाराजीतून त्यांनी राजीनाम्याच्या निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान परांजपे हे शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री दादा भूसे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. काही दिवसांपूर्वी परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ते प्रभावी नेते मानले जातात. ठाणे परिसरात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे.

भाजपाच्या मंत्र्याला कायदेशीर नोटीस

भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली. येत्या ७ दिवसांत आपल्या वक्तव्यावरून बिनशर्त माफी मागा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा या नोटीसीतून देण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात माध्यमाशी संवाद साधताना शिंदे यांच्यावर टीका केली होती. प्रणिती शिंदेना उद्देशून बोलताना त्या सोलापूरमधील रस्त्याचा विचार करत नाहीत, तर राहुल गांधी यांच्या घरासमोरील रस्त्याचा विचार करतात असे गोरे म्हणाले होते. त्यावरून खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने वकील असीम सरोदे, श्रिया आवले आणि आर्या राजे भोसले यांनी पालकमंत्री गोरे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

नीटची परीक्षाच रद्दच करा : राज ठाकरे

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी नीट-यूजीची परीक्षाच रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. सरकारमधील मंत्र्यांना विनंती करताना जरा पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा असे आवाहनही त्यांनी केले. समाजमाध्यमावर शेअर केलेल्या पोस्टमधून राज यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे. ‘NEET’ पेपरफुटीने परत एकदा हे सिद्ध झालं. ‘NEET’ चा पेपर १० लाख रुपयांना विकत घेतला गेला. आणि याची मुळं सापडली महाराष्ट्रात. अर्थात हे पेपरफुटीचं जाळं देशव्यापी आहे. यांत ‘NEET’ साठी तयार करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे, असे राज यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

फडणवीसांच्या बुलेटचे पीयूसी एक्सपायर?

राज्यात इंधन बचत आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर विविध स्तरांवर त्याला प्रतिसाद देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक आणि इंधन बचत करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बुलेट सफरीवरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सामान्य नागरिकांना होणाऱ्या दंडात्मक कारवाईवरही टीका केली. वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करतात. अशा परिस्थितीत जर उच्चपदस्थ व्यक्तींच्या वाहनांबाबत नियमांचे पालन झाले नसेल, तर त्यावरही समान कारवाई होईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी नियमांच्या समान अंमलबजावणीची मागणी केली आहे, तर सत्ताधारी गटाकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

पवार-तटकरेंच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयुष्यभर शरद पवार यांना राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक विषयांमध्ये साथ दिली आहे. त्या अनुषंगाने कधी-कधी आपल्या स्नेहींसोबत चर्चा करावीशी वाटते. मीसुद्धा राज ठाकरे यांच्याकडे जाऊन आलो आहे. अशा भेटींना राजकीय संदर्भातून पाहणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.