अलिबाग – शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे हत्त्या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव या प्रकरणात आरोपी म्हणून जोडले गेल्याने पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नगरपालिका निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील संबध कमालीचे ताणले गेले होते. यातून महाड नगरपालिकेच्या मतदान प्रक्रीये दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. तर दोन्ही पक्षांतील राजकीय वादातून खोपोलीत शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती.

शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे २६ डिसेंबर रोजी मुलीला शाळेत सोडून घरी परतत होते. यावेळी काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या पाच जणांनी धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला होता. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत, रविंद्र देवकर यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र देवकर यांच्या सह १३ आरोपींना या प्रकरणात पोलीसांनी अटक आहे. राजकीय वादातून सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीचे भरत भगत यांना या प्रकरणात अटक करण्यात आली नसली तरी दोघांचा अटकपूर्व जामिन अर्ज पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तेव्हा पासून ते फरार आहेत. ऐन जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर पक्षाचे जिल्हाध्यक्षच अडचणीत सापडल्याने पक्षाची कोंडी झाली आहे. दुसरीकडे काळोखे यांच्या हत्त्येचे तीव्र पडसाद खोपोली परीसरात उमटले होते. हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला होता. आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत याचा जनक्षोभाचा परिणाम पक्षाच्या वाटचालीवर होण्याची शक्यता आहे.

महाड मध्ये जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवारच फरार…

दुसरीकडे महाड नगरपालिका निवडणूकी दरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप, सुशांत जाभरे, धनंजय देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे विकास गोगावले यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून पासून सर्वजण फरार आहेत. हे सर्वजण जिल्हा परिषद निवडणूकीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.