मुंबई : प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यापाठोपाठ छगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाशी सुरू झालेल्या धुसफुसीनंतर पक्षांतर्गत वाद दिवसेंदिवस अधिक चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. नवे नेतृ्त्व पार्थ पवार विरुद्ध जुनेजाणते नेते अशी पक्षात उघड उघड दरी निर्माण झाली आहे.

शासकीय निविदेवरून भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात विसंवाद झाल्याचे समोर आले. अर्थात, भुजबळ व पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्याचा इन्कार केला असला तरी पक्षात सध्या जे काही चालले आहे ते काही खरे नाही, अशीच प्रतिक्रिया नेतेमंडळींकडून उमटू लागली आहे. सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्या तरी पडद्याआडून सारी सूत्रे ही पार्थ पवार हलवितात. पार्थ पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांना दरमहा योगदान देण्याचे फर्मान सोडले. त्यातून मंत्र्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावे गायब झाली. त्यापाठोपाठ भुजबळांशी झालेला विसंवाद यातून पार्थ पवार हे जुन्या नेत्यांना फार महत्त्व देण्यास तयार नाहीत, असे एकूण चित्र निर्माण झाले आहे. पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील ‘वजनदार’ मंत्र्यालाही पार्थ पवार यांनी खडसावल्याचे समजते. या मंत्र्याने मात्र जुळवून घेतलल्याचे सांगण्यात येते. या सर्व घडामोडी घडत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील हे नेतृत्वाच्या नजीक गेल्याचे बघायला मिळते. अजित पवार यांच्या कार्यकाळात वळसे-पाटील काहीसे मागे पडले होते. त्यांना पुन्हा मंत्रिपदही नाकारण्यात आले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये वळसे-पाटील हे सुनेत्रा पवार यांच्या बैठकांना उपस्थित असतात. तसेच दोन दिवसांपूर्वी दिल्लीत पक्षांतर्गत वादाबाबत सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता वळसे-पाटील यांनी हा प्रश्न धुडकावून लावला होता.

राष्ट्रवादीतील हा वाद विकोपास जाऊ लागल्याने पक्षाचे आमदार, नेते व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्षाचे भवितव्य काय, असा सवाल नेतेमंडळी करू लागली आहेत. पक्षाची खरी ताकद ही पश्चिम महाराष्ट्रात असली तरी तेथेही भाजपने गेल्या निवडणुकीपासून पाळेमुळे रुजली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अन्य पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. २०२९च्या निवडणुकीपर्यंत भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पार खच्चीकरण केले जाईल, अशी पक्षाच्या आमदारांनाच भीती सतावू लागली आहे. प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ या जुन्या नेतेमंडळींना दुखावून पार्थ पवार हे काय साधणार आहेत, असा सवाल पक्षात केले जात आहे. अजित पवारांमुळे पक्षाला उभारी मिळाली. पार्थ पवार यांना हे शक्य होणार आहे का, असेही आता पक्षात उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. भाजपच्या पाठिंब्यावर सारे घडवून आणू, असा पार्थ पवार यांचा समज असला तरी भाजप कधी दोर कापेल याची काही खात्री देता येत नाही.