NCP Sunitra Pawar Sunil Tatkare Conflict : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसून येते. बुधवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील बैठक कटुतेने संपल्याचे सांगितले जाते. मंगळवारी रात्री तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील उपस्थित असल्याची माहिती होती. या बैठकीची पूर्वकल्पना आपल्याला का देण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित करत सुनेत्रा पवार यांनी तटकरे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते, त्याविषयी…

विशेष बाब म्हणजे, मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. संसदेत मांडण्यात येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार गट पाठिंबा देऊ शकतो, तसेच भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली गेली. या बैठकीला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती असल्यामुळे २०२३ मध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे यांना अत्यंत कडक शब्दात फटकारले. मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीची पूर्वकल्पना आपल्याला का देण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करताना त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. त्यावर शरद पवार गट मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या शक्यतेची माहिती मिळाल्यानंतर आपल्या पक्षात कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही फडणवीस यांची भेट घेतली असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिल्याचे समजते.

दरम्यान, सुनील तटकरे यांनी पक्षात कोणत्याही प्रकारची फूट किंवा नाराजी असल्याचे वृत्त फेटाळून लावले. माझे अजित दादांसोबत जसे चांगले संबंध होते, तसेच सुनेत्रा वहिनींसोबतही आहेत. आमच्यात कोणताही गैरसमज किंवा नाराजी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा सुरू आहे. त्यातील एक गट हा सुनेत्रा पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभा असून दुसरा गट हा त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या वाढत्या राजकीय भूमिकेमुळे नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पार्थ पवार हे सुनील तटकरे यांच्या जागी उत्तर महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. मात्र, तटकरे यांनी आपणच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. त्यातच पक्षाचे राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीला आव्हान देणारी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मात्र, या नोटीसला उत्तर न देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे समजते. या नोटीसला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. जर यामागे कोणताही गैरहेतू असेल, तर उत्तर न दिल्यानंतर तो स्वतःहून समोर येईल, असे पवार कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि संवादाच्या अभावाचा परिणाम पक्षाच्या संघटनात्मक कामांवर होत असल्याचे दिसून येते. पक्ष संघटनेसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या युवक आणि महिला आघाडीच्या अध्यक्षपदांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची नियुक्तीही रखडली आहे. याशिवाय पक्षाला अर्थखाते मिळण्याची शक्यताही धूसर होत चालली आहे. यापूर्वी हे खाते अजित पवार यांच्याकडे होते; पण त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खात्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे विलीनकरण झाल्यास पक्षाला आणखीनच बळकटी मिळू शकते, असे काही आमदारांचे मत आहे. मात्र, याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते, पवार कुटुंबात नेतृत्वाच्या प्रश्नावर एकमत झाल्याशिवाय पुढील कोणतीही मोठी राजकीय हालचाल होण्याची शक्यता कमी आहे. सध्या पवार कुटुंबातील पुढील पिढीतील पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असून, सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेत्या आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीलाच एका विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले, तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद धुमसत असल्याचे चित्र दिसून आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या मुलाच्या मदतीने पक्षावरील पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांचे तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. १० मार्च २०२६ रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून २८ जानेवारी (अजित पवार यांच्या निधनाचा दिवस) नंतर पक्षाच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने केलेला पत्रव्यवहार अमान्य ठरवावा, अशी विनंती केली होती. विशेष म्हणजे, १६ फेब्रुवारी रोजी पक्षाची सुधारित घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. त्यात ‘राष्ट्रीय कार्याध्यक्ष’ या नवीन पदाची निर्मिती करण्यात आली होती. या पदावरील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्या अनुपस्थितीत पक्ष चालवण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आल्याचे समजते. सध्या प्रफुल्ल पटेल हे या पदावर कार्यरत असल्याचे दिसून येते.

अलीकडेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे वगळली असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ही केवळ एक ‘टायपिंगची चूक’ असल्याचे स्पष्टीकरण दिले. विशेष म्हणजे, ‘टायपिंगची चूक’ मान्य करूनही ते पत्र अद्याप मागे घेण्यात आलेले नाही. यादरम्यान पक्षाचे राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील नियुक्तीला आव्हान देणारी कायदेशीर नोटीस पाठवली. या घडामोडीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा अंतर्गत संघर्ष आणखीनच तीव्र झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.