मधु कांबळे

राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीतही सत्ताधारी महाविकास आघाडीला दुसरा पराभवाचा धक्का बसला. अर्थात हा धक्का थेट शिवसेना आणि काँग्रेसला बसलेला आहे. आघाडीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र दोन्ही निवडणुकांमध्ये सुरक्षित चाल करून आपले उमेदवार निवडून आणले. राष्ट्रवादीच्या भोवती कायम संशयाचे धुके असते. त्याची पर्वा न करता किंबहुना संशयाचा अधिक धुरळा उडवत राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात क्रमांक एकच्या दिशेने वाचचाल सुरू आहे. आघाडीतील दोन तात्पुरत्या मित्र पक्षांना मागे टाकून त्याची सुरुवात केली आहे. त्यात राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने ते दाखवून दिले आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय अनपेक्षित आणि आघाडीसाठी धक्कादायक होता. आघाडीला समर्थन देणारे जे आमदार होते, तेही भाजपकडे वळले होते. त्यात राष्ट्रवादीचे तीन समर्थक आमदार होते, असे सांगितले जाते. त्यावरून आघाडीत संशयकल्लोळ सुरु झाला. परंतु राष्ट्रवादीचे नाव घेण्याची कुणाची हिम्मत झाली नाही. विधान परिषद निवडणुकीत आपल्या संख्याबळावर निवडून येतील असे दोनच उमेदवार राष्ट्रवादीने दिले. एक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि दुसरे एकनाथ खडसे. दोन्ही उमेदवार सुरक्षितपणे निवडून आले. भाजपमधून पक्षात आलेले एकनाथ खडसे यांना दिलेली उमेदवारी आणि एक अधिकचे मत मिळवून त्यांचा झालेला विजय, हाही चर्चेचा विषय ठरला आहे. भाजमधील माझ्या मित्रांनी मला मदत केली असावी, हे खडसेंचे विधान केवळ भाजपला डिवचण्यासाठी असावे, खरी  खेळी वेगळीच खेळली गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  राज्यसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांनाही एक मत जास्त मिळाले होते, त्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि हे जास्तीचे मत मला कसे मिळाले, याचा शोध घ्यावा लागेल, असे म्हणाले होते. आणखी एक नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, आमची कामे होत नाहीत, निधी मिळत नाही, असा राष्ट्रवादीच्या आमदारांमधून नाराजीचा सूर कधीच ऐकायला येत नाही. शिवसेना व काँग्रेसमध्ये मात्र हे रडगाणे सतत सुरू असते.

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सारखीच चाल आहे. म्हणजे दोघांच्या चालीत साम्य आहे. १९८५ पासून शिवसेनेशी घरोबा करून भाजपने आपला राज्यभर विस्तार केला, आज राज्यातील क्रमांक एकचा पक्ष हा भाजप आहे. १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर सत्तेत राहून काँग्रेसची पाळेमुळे ढिली करून आपली रोपटी तिथे लावली. सत्तेचा सर्वाधिक फायदा घेत ती रोपटी आता खोलवर मूळ धरून वेगाने वाढत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या तुलनेत तरी आज राष्ट्रवादी सुरक्षित खेळ (सेफ गेम) खेळत आहे. उद्याचे राजकारण कसेही फिरू दे, राष्ट्रवादीची भूमिका त्यात निर्णायक असेल, राज्यसभेनंतर, विधान परिषदेच्या निवडणुकीतून पक्षनेतृत्वाने त्याचे संकेत दिले आहेत.