बिपीन देशपांडे, लोकसत्ता

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्ह्यातील अस्तित्व सध्या तोळामासा अवस्थेत गणले जाते. भूम-परंडा, उमरग्याचा एकमेव बुरूज वगळता इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस केवळ नावालाच उरली आहे. नेता काेण आणि कार्यकर्ता काेण, असा प्रश्न पडावा इतपत पक्षाची अवस्था शून्य झालेली आहे. डाॅ. पद्मसिंह पाटील यांच्यासह त्यांच्या गटाने पक्षाला रामराम केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ शकले असे नेतृत्व पक्षाला सापडलेले नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सासुरवाडीच्या जिल्ह्यात राष्ट्रवादी नेतृत्वहीन अशी परिस्थिती असून त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रभाव कसा पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोहिते-पाटीलविरोधक उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासूनच राज्यात सत्तेत आहे. अपवाद २०१४ ते २०१९ या पाच वर्षांचा. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्रिपदासह प्रमुख खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आतापर्यंत राहिलेली आहेत. पक्षाच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते डाॅ. पद्मसिंह पाटील यांच्याचकडे जिल्ह्यातील पक्षाची सूत्रे हाेती. त्यांच्यावर अण्णा हजारेंनी आराेप केले आणि डाॅ. पद्मसिंह पाटील यांना राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले. मात्र, पक्षाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाेकळी निर्माण हाेणार नाही, याची दक्षता घेत डाॅ. पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांची विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना राज्य मंत्रिमंडळात वर्णी लावली आणि नंतर त्यांना विधान परिषदेवर जागा दिली. तब्बल सहा खात्यांचे राज्यमंत्रिपद राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे साेपवले. तर २००९ साली लाेकसभेसाठी डाॅ. पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी दिली. डाॅ. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लाेकसभेवर निवडूनही गेले. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळख असलेल्या डाॅ. पाटील यांच्याचकडे उस्मानाबाद जिल्ह्याची सर्व सूत्रे असायची आणि त्यांचाच शब्द जिल्ह्याच्या पक्षीय पातळीवरील राजकारणात अंतिम मानला जात असे. मात्र, डाॅ. पाटील खासदार झाले आणि लगाेलग त्यांना पवनसिंह राजेनिंबाळकर यांच्या हत्येच्या आराेपाखाली कारागृहात जावे लागले. तरीही पक्षाची सूत्रे ही राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडूनच हलवली जात हाेती. पक्षाची पदेही नात्यातच फिरत हाेती. डाॅ. पद्मसिंह पाटील यांचे एक भाचे अमाेल पाटाेदकर हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष तर दुसरे भाचे राहुल माेटे हे भूम-परंड्याचे आमदार. मेहुणे जीवनराव गाेरे हे राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष हाेते. त्यामुळे पक्षावर संपूर्ण पकड डाॅ. पाटील यांची, किंबहुना घराण्याचीच हाेती.

शरद पवार आणि ब्राह्मण विरोधाच्या राजकारणाचा पूर्वेतिहास

२०१४ ते २०१९ या पाच वर्षांमध्ये राज्यात आणि केंद्रात भाजप व मित्र पक्षांचेच सरकार हाेते. या कालावधीत राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ठिकाणच्या गडाला सुरुंग लावण्यात आले. २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत पवनसिंह राजेनिंबाळकर यांच्या हत्येच्या आराेपाखाली कारागृहाची हवा खावी लागलेल्या डाॅ. पद्मसिंह पाटील यांना पराभवही पत्करावा लागला. कालांतराने डाॅ. पाटील जामिनावर बाहेर आले असले तरी ते केव्हाही पुन्हा तुरुंगात जाऊ शकतात, असे पद्धतशीरपणे वातावरण निर्माण करण्यात येऊ लागले. शिवाय २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या ताेंडावर राष्ट्रवादीच्या राज्यातील अनेक मातबर नेत्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षांतराच्या वातावरणातून उस्मानाबाद जिल्ह्याची सर्व सूत्रे राष्ट्रवादीकडेच असलेले तत्कालीन जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अचानकपणे पक्षाला साेडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना तुळजापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. राणा पाटील यांच्यासाेबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजपकडे गेल्या. एकेकाळी नावालाही नसलेला भाजप जिल्ह्यात प्रमुख पक्ष बनला. तर एकेकाळी अभेद्य गड मानला गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस ताेळामासा स्थितीत आला आहे.

आज संपूर्ण जिल्ह्याला मान्य असे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. जिल्हाध्यक्ष जीवनराव गाेरे यांना प्रकृती आणि वयाेमानानुसार मर्यादा पडल्या. तर राहुल माेटे यांचाही २०१९ मध्ये पराभव झाला. आता त्यांच्या पत्नी वैशाली माेटे यांच्याकडे अलिकडेच महिला शाखेचे विभागस्तरावरील प्रमुख पद आलेले आहे. माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार हे त्यांच्या उमरगा भागात काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व टिकवून आहेत. भूम-परंड्यामध्ये राहुल माेटे यांनी काही प्रमाणात पक्षावरील पकड मजबूत ठेवली आहे. एकेकाळी माेटे यांच्या कट्टर समर्थक असलेले गाढवे हे सध्या भाजपमध्ये आहेत. संजय निंबाळकर आणि संजय पाटील दुधगावकर हे दोघेही पूर्वाश्रमीचे कट्टर डाॅ. पद्मसिंह पाटील विरोधक सध्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र, त्यांची प्रतिमा संघटनात्मक पातळीवर फारशी रुजलेली नाही. कळंब, लाेहारा, तुळजापूर आणि उस्मानाबाद तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ताेळामासाच म्हणावी अशी आहे. जिल्हा बँकेतील सत्ता वगळता राष्ट्रवादी काँग्रेसकडे माेठी कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात नाहीत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पाेकळी राज्यात सत्तेत असताना भरून काढता आलेली नाही. उस्मानाबाद हा अजित पवार यांच्या सासुरवाडीचा जिल्हा असून तोच जिल्हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या नेतृत्वहीन झाल्याचे चित्र आहे.