DCM Sunetra Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची सुत्रे सोपवण्यात आली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विलीनीकरणाच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आप-आपल्या भूमिका मांडत आहेत. मात्र, यावर अद्याप तरी सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची भूमिका काय? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
असं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच प्रकरणात अटक करण्यात आल्याच्या घटनेमुळे झिरवाळ हे अडचणीत आले आहेत. विरोधकांनी थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अडचणीत येणारे नरहरी झिरवाळ हे तिसरे मंत्री आहेत.
याआधी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आणि इतर विविध कारणांमुळे वादात सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील दुसरे नेते माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते अडचणीत आले होते. त्यानंतर काही दिवसांनी कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ हे अडचणीत आले आहेत.
दरम्यान, एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आणि दुसरीकडे पक्षातील नेता तथा मंत्री नरहरी झिरवाळ हे अडचणीत असताना पक्षातील या खडतर आव्हानांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कसं तोंड देणार? या खडतर आव्हानांतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कसा मार्ग काढणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना त्यांच्या नवीन भूमिकेत स्थिरावण्यापूर्वीच सुनेत्रा पवारांना सत्ताधारी महायुती आणि आघाडी अशा राज्याच्या राजकारणाच्या दोन्ही आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून आरोप-प्रत्यारोप
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवरून तीव्र शाब्दिक युद्ध सुरू आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने अद्याप नवीन पक्षाध्यक्ष निवडलेला नाही. पण प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार याच एकमेव उमेदवार असतील. यावर एकमत असून दोन आठवड्यांत ते होईल.” तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते दोन्ही गटांमधील प्रस्तावित विलीनीकरणावर ठाम आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष यांचं विलीनीकरण लगेच होण्याची शक्यता नाही.”
“…तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन” : मंत्री नरहरी झिरवाळ
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच प्रकरणात अटक करण्यात आल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट करताना मोठं वक्तव्य केलं. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं की, “माझ्या कार्यालयात असा प्रकार घडणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. माझ्या दालनातच कर्मचारी लाच घेताना पकडला जाणं ही प्रशासनासाठी लाजिरवाणी घटना आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी माझ्यावर येते. तपासादरम्यान जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मागेपुढे पाहणार नाही.”

