राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर १२ फेब्रुवारीला निर्णय होणार होता, असा दावा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केला असतानाच विलीनीकरणासाठी अजित पवार गटाच्या नेत्यांना भाजपशी आधी चर्चा करावी लागेल या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण प्रक्रियेत खंड पडल्याचेच स्पष्ट होते.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली होती. जयंत पाटील यांनी आधी ८ फेब्रुवारीचा मुहुर्त सांगितला होता. त्यानंतर शरद पवार यांनी १२ तारखेला त्याची घोषणा होणार होती, असा दावा केला होता. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे विलीनीकरणाच्या ठाम विरोधात आहेत. विलीनीकरणानंतर सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल, हा मुख्य प्रश्न आहे. याशिवाय शरद पवार गटाने विलीनीकरणानंतर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्षपदी नको, अशी अट घातली होती. या साऱ्या घडामोडींमुळेच तटकरे हे विलीनीकरणाच्या ठाम विरोधात होते.

अजित पवार यांच्या पश्चात विलीनीकरणाला पक्षातील नेत्यांचा विरोध असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. ‘विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना अजित पवारांनी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. भाजपला विचारल्याशिवाय ते एवढे पुढे गेलेच नसते. त्यांना सरकारमधून बाहेर पडायचे नव्हते’ या फडणवीस यांच्या विधानांवरून भाजप दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला अनुकूल नाही हेच स्पष्ट होते. अजित पवार यांच्या पश्चात विलीनीकरण करायचे असल्यास भाजपशी चर्चा करायला हवी, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली. म्हणजेच भाजपला विचारल्याशिवाय पुढे काही हालचाली राष्ट्रवादीला करता येणार नाहीत, असा स्पष्ट संदेश फडणवीस यांनी दिला.

फडणवीस यांनी ही भूमिका मांडली असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी वेगळा सूर लावला आहे. ‘दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवढणुकांपुरतीच मर्यादित होती, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली. तसेच आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष आहोत. आमच्याबरोबर यायचे असल्यास शरद पवार गटाने तसा निर्णय घ्यावा, असेही तटकरे यांनी सांगितले. म्हणजेच शरद पवार गटाने आमच्या बरोबर यावे, असे तटकरे यांना सुचवायचे आहे. तटकरे यांनी एक प्रकारे शरद पवारांना डिवचले आहे. फडणवीस यांनी अजित पवारांचा उल्लेख करीत विलीनीकरणाची त्यांनी कधी आमच्याशी चर्चा केली नव्हती, असे सांगणे तर तटकरे यांनी शरद पवार गटाला डिवचणे यातून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आता सहज सोपी राहिलेली नाही. भाजपच्या इशाऱ्यावरून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेच फडणवीस यांनी सुचविले आहे. एक प्रकारे शरद पवार गटाला इशाराच दिला आहे.