राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही सोमवारी एका कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले. मुंबईत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र दिसले. गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या विविध कार्यक्रमांत हे दोघेही दुसऱ्यांदा व्यासपीठावर एकत्र दिसले आहेत.

शुक्रवारी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेने आयोजिलेल्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र दिसल्यानंतर ते मुंबईतील कार्यक्रमात पुन्हा दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी असा दावा केला आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाच्या अंतर्गत असंतोषाला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी, तसेच पक्षकार्यकर्ते यांचं मनोबल वाढवणं महत्त्वाचं आहे. हा त्यांच्या रणनीतीचा एक भाग आहे”, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ प्रतिनिधीने सांगितले आहे.

दी इंडियन एक्स्प्रेसला ७ मे रोजी दिलेल्या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करण्याबाबत भाष्य केले. यावेळी पवारांनी पक्षातील अंतर्गत मतभेदांबाबत कबुली दिली. तेव्हापासून पक्षात हातमिळवणीबाबत चर्चा सुरू आहे. “पक्षात दोन मतप्रवाह आहेत. आम्ही अजित पवारांशी हातमिळवणी करावी, असा एक मतप्रवाह आहे. दुसरं मत असं की, आम्ही भाजपासोबत जाऊ नये; मग ते प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष”, असे त्यांनी म्हटले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केल्यानंतर दोनच दिवसांनी शरद पवार यांनी हातमिळवणीबाबत भाष्य केले. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्याला विश्वासार्हता मिळाली आहे की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुका लक्षात घेऊनच असा अंदाज बांधला असावा.

२०१४ मध्ये अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता, असा दावा करताना त्यांनी सांगितले की, वरिष्ठ नेतृत्वाकडून भाजपासोबत युतीसंदर्भात चर्चा करण्यास परवानगी देण्यात आली होती. “त्यावेळी काहीच निश्चितपणे कळविण्यात आलं नव्हतं. मात्र, शेवटच्या क्षणीदेखील ते प्रत्यक्षात आलं नाही. तसेच पवार त्यांच्या नेत्यांना संदेश देत आहेत की, त्यांनी वाट पाहावी आणि सध्या या संदर्भात कोणतंही पाऊल उचलू नये”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या १० पैकी किमान चार आमदार हा‍तमिळवणीच्या बाजूने आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधक महाविकास आघाडीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८६ जागांपैकी फक्त १० जागा जिंकता आल्या आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकऱणाची कुजबुज सुरू झाली. भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने राज्यात २८८ विधानसभा जागांपैकी २३५ जागा जिंकत जोरदार कमबॅक केले. लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या १० जागांपैकी आठ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) हार मानावी लागली होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मतदानाचा वाटा अनुक्रमे ११.२८ टक्के आणि ९.१ टक्के इतका होता. तसेच लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना अनुक्रमे १०.२७ टक्के आणि ३.६ टक्के मते मिळाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)च्या कार्यकारी अध्यक्ष व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षकार्यकर्त्यांशी या विषयावर चर्चा करण्याबद्दल सांगितले होते. असं असलं तरी विलीनीकरण हे वाटतं तितकं सोपं नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) एका आमदारानं म्हटले आहे. “अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी करणं म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पाठिंबा देणं. मतभेद दूर करण्यापेक्षा आमचे आठ खासदार आहे आणि त्यांच्याकडे पूर्ण बहुमत नाही हा महत्त्वाचा संदेश भाजपाला दिला गेला पाहिजे. पवार हे एक प्रमुख विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपण वाट पाहू”, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका नेत्याने सांगितले आहे.

दोन्ही पवारांच्या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे सत्ताधारी आघाडी आणि विरोधी आघाडीतील इतर पक्ष सावध झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर अद्याप मत व्यक्त केलेले नाही. तसेच शिवसेना (उबाठा) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “राष्ट्रवादीचे दोन्ही गट आधीच एकत्र होते. ते आमच्यासारखे नाहीत. ज्यांनी आमचा पक्ष फोडला, सरकार पाडले, सत्तेचा गैरवापर केला आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याशी हातमिळवणी करू नये, असा आमचा स्वाभिमानी दृष्टिकोन आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा स्पष्टपणे उल्लेख करताना राऊत म्हणाले, “काही पक्ष अधिक उदारमतवादी आहेत. ते पक्षकार्यकर्त्यांशी सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेतील, असा दावा करतात.” तसेच पवारांबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नसल्याचेही राऊत यांनी सांगितले.