रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. पक्षाच्या अस्तित्वासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोमाने काम करण्याच्या सुचना जयंत पाटील यांनी केल्या आहेत.

राज्यात ऑक्टोबर महिन्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची जिल्हा कार्यकारणीची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावली होती. या बैठकीत निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सुचना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आढावा घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार गटाने ढासळलेले गड पुन्हा मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीतदेखील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एक जागा देण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून प्रशांत यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ही जागा ही त्यांना गमवावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे उमेदवार शेखर निकम हे निवडून आले.

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्चस्व असताना त्यांना विधानसभा निवडणुकीत हार पत्कारावी लागली. मात्र पुन्हा या राष्ट्रवादी पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध करण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात येवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. तसे संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदेश आल्यास ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविणार. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता आघाडी करुन या निवडणुका लढविण्यावर कार्यकर्त्यांचा भर आहे. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतील अशी अपेक्षा आहे. – राजन सुर्वे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)