scorecardresearch

पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या साथीने शिंदे गट-भाजपाचे नवीन सत्तासमीकरण

शिंदे गटाने त्यांच्या वाटेला आलेले दोन्ही सभापतीपद राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांना दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा पालघर जिल्हा परिषदेतील मोठा गट मुख्यमंत्री यांच्या संपर्कात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या साथीने शिंदे गट-भाजपाचे नवीन सत्तासमीकरण
पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या साथीने शिंदे गट-भाजपाचे नवीन सत्तासमीकरण ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

नीरज राऊत

पालघर : एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात विविध स्तरावर खडाजंगी होत असताना पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १३ सदस्य गटापैकी तब्बल ११ सदस्यांनी बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा यांना साथ देण्याचा निर्णय घेत पालघरमध्ये सत्तेचे नवे मेतकूट जमवले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा व गटनेत्या रोहिणी शेलार यांनी वेगवेगळे पक्षादेश बजावले होते. या दोन्ही पक्षा देशांनुसार या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील अधिकांश सदस्य गटनेत्या रोहिणी शेलार यांचा आदेशाचे पालन करीत या निवडणुकी निमित्ताने आयोजित सभेला उपस्थित राहिले होते. त्याचबरोबरीने बहुजन विकास आघाडीने शिंदे गट व भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिला होता.

हेही वाचा… अभिजीत फाळके : विधायक कामातून राजकारणात

एकीकडे महाविकास आघाडीचे घटक पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी या प्रक्रियेतून तटस्थ (अलिप्त) राहण्याचे पसंद करणे हे कुणाच्या पथ्यावर पडणार याबाबत उलट सुलट चर्चा होती. मात्र विषय समिती सभापती निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने त्यांच्या वाटेला आलेले दोन्ही सभापतीपद राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांना दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदेतील मोठा गट मुख्यमंत्री यांच्या संपर्कात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… नागपूर जिल्हा परिषदेत निधी अडवून भाजपने केली सत्ताधारी काँग्रेसची कोंडी

दरम्यान शिंदे गट व भाजप यांच्या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्या पुरस्कृत सदस्यांना पाठिंबा द्यावयाचा नाही तसेच या निवड प्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी पक्षादेशाद्वारे सूचित केले होते. मात्र जिल्हाध्यक्षांचा आदेश झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना चार पैकी दोन सभापती पद मिळविल्याने राष्ट्रवादीच्या सदस्याने बंडाळी केल्याचे स्पष्ट झाले आहे. याविरुद्ध पक्षांतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

बिनविरोध निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्यांनी (१३ पैकी ११) ५७ सदस्य संख्या असणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेत मंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याने बाळासाहेबांची शिवसेना (२० सदस्य), भाजपा व मित्र पक्ष (१३ सदस्य) बहुजन विकास आघाडी (४ सदस्य) असे ८४ टक्के संख्याबळ झाले असून ही रचना पुढील एका वर्षासाठी असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा… भाजप खासदार गिरीश बापट यांच्या वाणीतून काँग्रेसची खंत !

जिल्हा परिषदेतील समाजकल्याण समिती सभापतीपदी मनीषा निमकर (बहुजन विकास आघाडी), महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी रोहिणी शेलार (राष्ट्रवादी काँग्रेस) तर विषय समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश ढोणे (बांधकाम) आणि भाजपाचे संदीप पावडे (कृषी, पशु संवर्धन) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 14:42 IST

संबंधित बातम्या