पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे कर्णधार अजित पवार, पण भाजपकडून कोण? | ncp targets pune municipal corporation election ajit pawar to lead what about bjp | Loksatta

पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे कर्णधार अजित पवार, पण भाजपकडून कोण?

भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महापालिकेची सत्ता आहे आणि ती मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

ajit pawar pune election
पुणे महानगर पालिकेसाठी राष्ट्रवादीनं कसली कंबर! (संग्रहीत छायाचित्र)

अविनाश कवठेकर

पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असेल. भारतीय जनता पक्षात मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्यापैकी कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

महापालिकेतील सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीत महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात महापालिकेची सत्ता आहे आणि ती मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याबरोबरच ‘बाहेरून’ आलेले अशी टीका होणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचीही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवताना कसोटी लागणार आहे. बदललेले प्रभाग, एकाच जागेसाठी अनेक तुल्यबळ उमेदवार, उमेदवारीसाठी पक्षांतर्गत तीव्र स्पर्धा अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेतृत्वाचा कस लागेल. महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली झाली पाहिजे यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच खासदार गिरीश बापट हेही प्रयत्नशील असल्यामुळे भाजपमधील कर्णधारपदासाठीची गटबाजी हा मुद्दा कळीचा ठरणार आहे.

भाजपने गेल्या महापालिका निवडणुकीत शहराच्या राजकारणात इतिहास घडविताना प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता हस्तगत केली. मात्र गेल्या पाच वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान उभे आहे. भाजपने मागील निवडणूक विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली लढविली. त्या वेळी काही प्रमाणात तेव्हाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांचा शहर भाजपवर वरचष्मा होता. काकडे यांच्या पुढाकारातूनच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसेतील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला व ते निवडून आल्याने.भाजपला सहज सत्ता मिळाली.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना व सहयोगी आमदारांची पंचतारांकित सोय

विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील यांचा शहराच्या राजकारणात प्रवेश झाला आणि शहर भाजपची सूत्रे पाटील यांच्या ताब्यात गेली. शहराच्या नेतृत्वावरून बापट आणि पाटील यांच्यात कुरघोडी सुरू झाली. ‘बाहेरून’ आलेले अशी टीका स्वपक्षाबरोबरच विरोधी पक्षांकडूनही चंद्रकांत पाटील यांच्यावर होते. बापट गट आणि पाटील गटात पक्षाच्या कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. आगामी तिकीट वाटपावेळी ही गटबाजी उफाळून येणार असल्याचे चित्र सध्या पक्षात दिसत आहे. त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान भाजपपुढे आहे. त्यातच निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आघाडी झाली, तर पाटील यांच्यापुढील अडचणीत वाढ होईल.

संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर लातूर भाजपामध्ये आक्षेप

पुणे महापालिकेतील सत्ता काँग्रेसकडून खेचून घेताना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांचा पुणे पॅटर्न सत्तेत आला होता. त्यानंतर भाजपची सत्ता महापालिकेत आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये गेल्या काही वर्षात सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. पुणे महापालिकेची सत्ता मिळवायचीच, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. प्रभाग रचना अनुकूल असल्याने स्वबळावर निवडणूक लढवावी, असा राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. मात्र निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांची राज्यातील सरकारप्रमाणे आघाडी व्हावी, असेही प्रयत्न सुरू आहेत. आघाडी झाली तर जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2022 at 14:48 IST
Next Story
जनतेशी नाळ तुटलेल्या महाराष्ट्रातील वासनिकांना राज्यसभेची संधी दिल्याने नाराजी