Sharad Pawar and Mamata Banerjee Congress Merger: “आगामी काळात काही प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसशी अधिक घनिष्ठ संबंध निर्माण होऊ शकतात किंवा ते काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्यायही स्वीकारू शकतात”, असे विधान शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले होते. द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी शरद पवार यांची प्रचारादरम्यान मुलाखत घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी हे उत्तर दिले होते. तसेच त्यांचा पक्ष आणि काँग्रेसच्या विचारधारेत अंतर नसल्याचेही ते म्हणाले होते.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात काँग्रेसशी संबंधित असलेले प्रादेशिक पक्ष कमकुवत होत असताना आता शरद पवारांच्या त्या जुन्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. आगामी काळात कमकुवत झालेले हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात का? यावर नीरजा चौधरी यांनी द इंडियन एक्सप्रेससाठी लेख लिहिला आहे.

शरद पवारांच्या विधानानंतर त्याची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. राजकारणात तोलून मापून बोलणे आणि जे बोलायचे आहे, त्याची योग्य वेळ कशी साधावी, याची सजगता शरद पवारांमध्ये इतरांपेक्षा अधिक आहे. काँग्रेसची यावर काय प्रतिक्रिया असेल, याची चाचणी शरद पवारांनी यातून केली होती.

या विधानाच्या वर्षभरापूर्वीच म्हणजे २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. पक्षातला एक मोठा गट अजित पवारांसह बाहेर पडला होता. यामुळेच शरद पवारांनी निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी आणि राष्ट्रीय राजकारणातले स्थान मिळवण्यासाठी ही चाचपणी केल्याचे बोलले गेले.

नीरजा चौधरी यांनी शरद पवारांची ही मुलाखत घेतल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या जवळच्या नेत्याला याबाबत पुन्हा प्रश्न विचारला होता. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा मांडला होता, त्याबद्दल शरद पवारांना विचारणा केली असता, “काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद आला नाही”, एवढे एका वाक्यात उत्तर आले होते.

काँग्रेसने संधी गमावली?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकल्या. मात्र त्यानंतरही पक्षाने याचा लाभ करून घेण्याचे बहुतेक ठरवले नाही. कदाचित ते शरद पवार यांच्यामार्फत इतर पक्षांशी समन्वय ठेवू शकले असते. ज्याचा लाभ लोकसभेनंतर झालेल्या हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकला असता. या तीन राज्यांच्या निवडणुकांनी भाजपाला पुन्हा उभारी दिली. मात्र काँग्रेस शरद पवारांबाबत असलेले जुने मळभ दूर करू शकली नाही.

शरद पवार हे १९७८ साली पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी १९८६ साली पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ साली त्यांनी सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडली.

शरद पवारांच्या विधानाची पुन्हा चर्चा का?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी जे विधान केले होते, ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजपा देशभरात आक्रमकरित्या आपला विस्तार करत असताना त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष कमकुवत होत चालले आहेत. विरोधी पक्षातील दोन तृतीयांश सदस्यांना आपल्या बाजूला करत त्यांच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्ष अपराजित राहिलेल्या ममता बॅनर्जींच्या पक्षात उभी फूट पडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी वेगवेगळे गट स्थापन केले असून ते ममता बॅनर्जींपासून दूर गेले आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होऊ नये, यासाठी ममता बॅनर्जींच्या पक्षातील २० खासदारांनी फारशा परिचित नसलेल्या एनसीपीआय (नॅशनॅलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया) पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा दर्शवला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फूट?

महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा बंडाचे वारे वाहू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी रविवारी (१४ जून) घेतलेल्या बैठकीला शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी ५ खासदारांनी दांडी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील ८ खासदारही अजित पवार गटात सामील होण्याची वाट पाहत आहेत. अजित पवार यांच्या अकस्मात विमान अपघातानंतर ही प्रक्रिया थांबली असल्याचे सांगितले जाते.

Uddhav Thackeray party split
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील बैठकीला ४ खासदार का नव्हते? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं (बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

मतदारसंघ पुनर्रचना आणि विलीनीकरणाची चर्चा

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा मंजूर करून भाजपाला लोकसभेच्या जागा वाढवायच्या आहेत. याला विरोधकांचा तीव्र विरोध आहे. मात्र भाजपाकडून आता प्रादेशिक पक्षांना आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाची द्रमुकशी पडद्याआडून चर्चा सुरू आहे. यामुळे ८ जून रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलवली गेली आणि पुन्हा एकदा विरोधकांच्या एकजुटीची हाक देण्यात आली.

या घडामोडी घडत असताना पुन्हा एकदा शरद पवार आणि ममता बॅनर्जी हे त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये सामील करू शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली. काँग्रेस आणि तृणमूलच्या प्रवक्त्यांनी ही चर्चा फेटाळली असली तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या पक्षांना पुन्हा ‘घरवापसी’चे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनीही ही शक्यता फेटाळली नाही. ‘योग्य वेळी यावर कदाचित निर्णय होऊ शकतो’, असे विधान त्यांनी केले.