NDA Allies Differ on Vande Mataram Controversy : काँग्रेसने राष्ट्रीय गीताचे तुकडे केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेतील विशेष चर्चेदरम्यान केला. जवाहरलाल नेहरू यांनी १९३७ साली मुस्लीम लीगसमोर वाकून ‘वंदे मातरम’मधील प्रमुख ओळी वगळल्याची टीकाही त्यांनी केली. पंतप्रधानांच्या या आरोपांवर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर भाजपाचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने स्वत:ला वंदे मातरमच्या वादापासून दूर ठेवले. त्याउलट चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने आणि तेलुगू देशम पार्टीने भाजपाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यांनी काँग्रेसवर राष्ट्रीय गीताच्या छेडछाडीचा आरोप करीत जवाहरलाल नेहरूंना दोष दिला.

‘वंदे मातरम’वादावरून एनडीएमध्ये मतभेद?

वंदे मातरमवरील सभागृहातील चर्चेदरम्यान भाजपा आणि त्यांच्या बहुतेक मित्रपक्षांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. १९३७ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इच्छेविरुद्ध आणि कथितरित्या नेहरूंनी सांगितल्यामुळे वंदे मातरममधील काही कडवी वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जनता दल युनायटेड पक्षाच्या खासदारांनी आपल्या भाषणात या वादावर भाष्य करणे टाळले. त्याउलट वंदे मातरमचे महत्त्व आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करण्याच्या भूमिकेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

नितीश कुमार यांच्या पक्षाची भूमिका काय?

संविधान सभेने प्रदीर्घ विचार विनिमय केल्यानंतर वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केले. ‘जन गण मन’ला राष्ट्रीय गाण म्हणून जेवढा आदर मिळाला तेवढाच वंदे मातरमलाही मिळाला. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केले होते की- वंदे मातरमला राष्ट्रगीताइतकाच मान मिळेल, असे जेडीयूचे खासदार देवेशचंद्र ठाकूर म्हणाले. वंदे मातरम हा केवळ शब्द आणि स्वरांचा संगम नाही, तर आपल्या राष्ट्राच्या आत्म्याचे आणि लोकांच्या स्वप्नांचे प्रतीक आहे. वंदे मातरमचा जयघोष करताना आपण राष्ट्राप्रती आपला विश्वास, बांधिलकी आणि त्याग व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

मित्रपक्षाच्या पाठिंब्यामुळेच भाजपाचे सरकार

गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. परंतु इंडिया आघाडीच्या संविधान बचावच्या नाऱ्यापुढे पक्षाला केवळ २४० जागाच जिंकता आल्या. त्यामुळे केंद्रात तिसऱ्यांदा सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज भासली. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनता दल युनायटेड आणि तेलुगु देशम पार्टीच्या प्रत्येकी १२ खासदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि चिराग पासवान यांच्या पक्षानेही भाजपालाच पाठिंबा दिलेला आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेड पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांनी राज्यात भाजपाच्या मदतीने सलग पाचव्यांदा सत्तास्थापन केली आहे.

जेडीयूने ठेवला वादापासून दुरावा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड पक्ष नेहमीच समाजवादी परंपरेशी निगडित राहिलेला आहे. त्यांनी कधीही सांप्रदायिक राजकारणाचा अवलंब केल्याचे दिसून येत नाही. अलीकडील बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून विजयी झालेला एकमेव मुस्लीम उमेदवार हा जनता दल युनायटेड पक्षाचाच होता. भाजपाने या निवडणुकीत एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते. वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान सभागृहात केलेल्या भाषणात जेडीयूचे खासदार देवेशचंद्र ठाकूर यांनी भारतावर झालेल्या प्राचीन आक्रमणांचा उल्लेख केला. भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेची पाळंमुळं इतकी खोलवर रुजली होती की कोणालाही ती उखडता आली नाही, असे ते म्हणाले.

खासदार देवेशचंद्र ठाकूर काय म्हणाले?

ब्रिटिशांच्या भारत आगमनाचा आणि त्यांच्या ‘God Save the Queen’ या गीताला लोकप्रिय करण्याच्या प्रयत्नांचाही देवेशचंद्र ठाकूर यांनी उल्लेख केला. स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या भारतीयांनी ब्रिटिशांचे हे गीत कधीच स्वीकारले नाही. त्यामुळेच वंदे मातरमला अधिकच लोकप्रियता मिळाली आणि हजारो क्रांतिकारकांना याच गीताने प्रेरणा दिली, असेही ते म्हणाले. दरम्यान- एकीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील खासदारांनी वंदे मातरमवरून काँग्रेससह जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य करीत असताना जेडीयूने वादापासून दूर राहणेच पसंत केल्याने त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तेलुगु देशम पार्टी आणि चिराग पासवान यांच्या जनशक्ती पार्टीच्या खासदारांनी मात्र पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे समर्थक केले आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

‘वंदे मातरम’ला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त लोकसभेत सोमवारी दिवसभर चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेची सुरुवात करताना मोदींनी, ‘वंदे मातरम’ची १५० वर्षे साजरी करत असताना नव्या पिढ्यांना हा विश्वासघात कोणत्या परिस्थितीमुळे झाला याची माहिती देणे आपले कर्तव्य आहे, असा मुद्दा मांडला. ‘वंदे मातरम’च्या निमित्ताने नेहरू व जीनांमुळे सांप्रदायिकतेला खतपाणी घातले गेल्याचाही आरोप त्यांनी केला. ‘वंदे मातरम’ला विरोध केला. १५ ऑक्टोबर १९३७ रोजी मोहम्मद अली जीना यांनी लखनौमधून ‘वंदे मातरम’विरोधात घोषणाबाजी केली. मुस्लीम लीगच्या विरोधाचा निषेध करून ठामपणे उत्तर देण्याऐवजी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष नेहरूंनी ‘वंदे मातरम’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यांचे हे आरोप काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी खोडून काढले होते.