नागपूर : नागपूर हे सर्वधर्मसमभावाची परंपरा जपणारे शहर. त्यामुळेच अनेक दशके येथे काँग्रेसचे राजकीय अधिराज्य राहिले. मात्र, या पक्षाची एक छत्री सत्ता असतानाही विरोधी राजकीय प्रवाहांची ताकद कमी नव्हती. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचा प्रभाव काही भागांत होता, तर कामगार क्षेत्रात डाव्या पक्षांच्या संघटनांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. कामगार चळवळीला दिशा देणाऱ्या नेत्यांमध्ये नागपूरचे भाई बर्धन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुढे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर डाव्या राजकारणाचे नेतृत्व केले.या पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनीही विद्यापीठाच्या राजकारणात आपला प्रभाव कायम ठेवला. मात्र, २०१४ नंतर राजकीय चित्रच बदलले. काँग्रेस सत्तेपासून दूर गेल्याने संघटनात्मक मरगळ आली.

देशपातळीवर डाव्या विचारसरणीचा प्रभाव सातत्याने कमी होत गेला. प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांची अवस्थाही फारशी वेगळी राहिली नाही. काही पक्ष सत्तेच्या समीकरणात सामील झाले, तर काहींनी राजकीय अस्तित्व टिकवण्यापुरतीच धडपड सुरू ठेवली. दुसरीकडे भाजप आणि त्याच्याशी संबंधित विविध संघटनांचा राजकीय प्रभाव मात्र वाढत गेला. त्यांच्या कार्यक्रमांना होणारी मोठी गर्दी आणि विरोधकांच्या कार्यक्रमांना दिसणारी मोजकी उपस्थिती हे गेल्या दशकातील राजकीय वास्तव बनले. यातून बदललेल्या राजकीय सामाजिक समीकरणांचेही दर्शन घडत होते. हे सर्व सांगण्याचे कारण एकच.गुरूवारी नागपुरात झालेल्या नेहा बोरा यांच्या कार्यक्रमाला झालेली तुफान गर्दी.

नेहा बोरा या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. ही संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लनिनवादी) लिबरेशनशी संलग्न आहे. नागपुरातील डाव्या राजकारणाची सध्याची संघटनात्मक ताकद आणि प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या कार्यक्रमाला देशपांडे सभागृहात झालेली गर्दी अनेक कारणांमुळे लक्षवेधी ठरते.कारण या कार्यक्रमाला आलेल्या तरुणांपैकी अनेक जण कोणत्याही एका राजकीय पक्षाशी बांधील नसल्याचे दिसत होते. त्यांचा राजकीय कल पारंपरिक अर्थाने डाव्या विचारांकडेही नव्हता. मात्र, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, वाढती स्पर्धा, सरकारी धोरणे आणि सत्तेच्या केंद्रीकरणाबाबत त्यांच्यात अस्वस्थता असल्याचे चर्चेतून जाणवत होते.हीच बाब त्यांना नेहा बोराच्या कार्यक्रमाला घेऊन आली असावी.म्हणूनच ही गर्दी एखाद्या पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन नव्हती तर तरुणाईच्या मनातील असंतोषाला व्यासपीठ मिळाल्याचे लक्षण असल्याचे दिसून येत होते.

नेहा बोराच्या कार्यक्रमाची चर्चा का?

नागपूर ही राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर. २०१४ नंतर शहराला राज्याच्या आणि देशाच्या सत्ताकारणात अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे येथे राजकीय मेळावे आणि कार्यक्रमांची कमतरता नाही. मात्र, त्यातील बहुतांश कार्यक्रम सत्ताधारी पक्षाशी किंवा सरकारी यंत्रणेशी संबंधित असतात. या कार्यक्रमांना साधनसामग्री, मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ सहज उपलब्ध होते. त्यामुळे गर्दी हा प्रश्न राहत नाही. मात्र हा प्रश्न विरोधकांसमोर आहे. .नेहा बोरा यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला ते देशपांडे सभागृह शहरातील दुसरे मोठे सभागृह आहे. या सभागृहाची आसनक्षमता दोन हजारांहून अधिक आहे. त्याबाहेर आणि उभे राहून कार्यक्रम पाहणाऱ्यांची संख्याही मोठी असू शकते. अशा ठिकाणी कार्यक्रम घेणे आणि सभागृह भरून दाखवणे, हे सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी पक्षांसाठी तुलनेने सोपे; विरोधकांसाठी मात्र आव्हानात्मक आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांचे कार्यक्रम अनेकदा पक्ष कार्यालये किंवा छोट्या सभागृहांपुरते मर्यादित राहतात. गर्दी जमविण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ आणि संघटनात्मक यंत्रणा त्यांच्याकडे कमी आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वयंप्रेरणेने कार्यक्रमाला येणारा समर्थक वर्गही तुलनेने मर्यादित झाला आहे. अशा वेळी डाव्या विचारसरणीशी संबंधित विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षेच्या कार्यक्रमासाठी देशपांडे सभागृह ओसंडून वाहणे हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्यामुळेच या कार्यक्रमाची शहरात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

या गर्दीमागे काँग्रेसचे पाठबळ असल्याचे सांगितले जाते. काही दलित संघटनांचे मूक समर्थनही होते. हे घटक नाकारता येणार नाहीत. कोणताही मोठा राजकीय कार्यक्रम केवळ एका संघटनेच्या ताकदीवर यशस्वी होत नाही. मात्र, यामुळे तरुणाईची उपस्थितीच्या मुद्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण कार्यक्रमस्थळी दिसणारा तरुण वर्ग कोणत्याही एका पक्षाच्या पारंपरिक कार्यकर्त्यांच्या चौकटीत बसणारा नव्हता. त्याची देहबोली, चर्चेतील मुद्दे आणि व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती. आणि हाच सध्याच्या राजकारणासाठी सर्वांत महत्त्वाचा संकेत असू शकतो, असे मानले जात आहे.

संघाला थेट आव्हान

नेहा बोरांच्या भाषणाची शैलीही या गर्दीला धरून होती. आक्रमक, परंतु मुद्देसूद भाषणातून त्यांनी थेट नागपुरात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच आव्हान दिले. नागपूर ही केवळ संघाची भूमी नसून संविधानाची भूमी आहे, असे ठासून सांगत त्यांनी नव्या विद्यार्थी आंदोलनाची सुरुवात नागपुरातून व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटनात्मक ताकद मोठी आहे. अशा शहरात संघाच्या प्रभावाला थेट आव्हान देणारे व्यासपीठ उभे राहणे आणि त्याला तरुणांचा प्रतिसाद मिळणे, ही बाब राजकीयदृष्ट्या नोंद घेण्यासारखी आहे.पण त्याचवेळी या गर्दीकडे दुर्लक्ष करणेही सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही.