Veer Savarkar Bharat Ratna Controversy : गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दक्षिण अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. हिंदुत्ववादी विचारवंत मानल्या जाणाऱ्या सावकरांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये होणारा वाद काही जुना नाही. अनेक वर्षांपासून दोन्ही पक्षांमध्ये या मुद्द्यावरून सातत्याने वाद होताना दिसून येत आहे. अलीकडेच नेहरू संग्रहालयातील कागदपत्रांवरून या वादाला आणखीच फोडणी मिळाली आहे. या कागदपत्रांमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिल्याचे नमूद आहे. त्याविषयीचा हा आढावा…

वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचा प्रस्ताव पंजाबमधील हिंदू महासभेच्या शाखेकडून पुढे आला होता. या संदर्भात जून १९६३ मध्ये डेहराडूनहून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. “आपल्या कार्यालयातून मला एक पत्र प्राप्त झाले आहे; परंतु हे पत्र मी आपणास परत पाठवत आहे. त्यात विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या काळात सावरकर यांनी नक्कीच महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, पुढील काळात ते अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व ठरले. त्यामुळे पंजाब हिंदू महासभेने मांडलेला हा प्रस्ताव स्वीकारणे योग्य ठरणार नाही,” असे नेहरू या पत्रात स्पष्ट केले होते.

याआधीही जवाहरलाल नेहरूंनी वीर सावरकर यांच्या बाबतीत भूमिका घेतली होती. अंदमान येथील ‘सेल्युलर जेल’मध्ये सावकरांना अनेक वर्षांचा तुरुंगावास भोगावा लागला होता. ते पाडून टाकण्याच्या प्रस्तावालाही नेहरूंनी पाठिंबा दिल्याचे या कागदपत्रांमधून समोर आले होते. त्याशिवाय खडकवासला येथील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’मध्ये सावरकरांना निमंत्रित करण्याबाबतही नेहरूंनी आक्षेप नोंदवला होता. त्या संदर्भात १८ जानेवारी १९६१ रोजी नेहरू यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना पत्र लिहिल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : Nitin Nabin : भाजपाची नव्या पिढीकडे वाटचाल की राजकीय डावपेच?

“मला प्राप्त झालेल्या एका पत्राची पत्र यासोबत जोडण्यात आलेली आहे. विनायक दामोदर सावरकर यांना खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे का? याची आपण खातरजमा करावी. जर त्यांना खरोखरच आमंत्रण देण्यात आले असेल आणि त्यांनी ते स्वीकारले असेल, तर या टप्प्यावर ते मागे घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतो. प्रत्यक्षात त्यांना आमंत्रण न देण्याचा निर्णयच योग्य ठरला असता. तरीही, जर सावरकर निमंत्रणानुसार तिथे येत असतील, तर त्यांच्या भेटीबाबत कोणताही मोठा गाजावाजा किंवा प्रसिद्धी केली जाऊ नये. त्यांना फक्त प्रबोधिनी दाखवली जावी. माझ्या माहितीनुसार ते आता ८०-९० च्या घरांत असून खूप वृद्ध आहेत,” असे नेहरू यांनी पत्रात नमूद केले होते.

१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर सावरकर आणि हिंदू महासभेवर अनेक आरोप झाले होते. त्यानंतर समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, पंडित नेहरूंनी डॉ. राधाकृष्णन यांना सांगितले होते की, सावरकरांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती; परंतु नंतर ते एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व झाले. नेहरू यांच्या अनेक पत्रांत सावरकर यांचा उल्लेख आढळतो आणि त्यापैकी काही पत्रे विशेष लक्षवेधी आहेत. असेच एक पत्र त्यांनी तत्कालीन बॉम्बे स्टेटमधील शिवाजीनगर हिंदू महासभेचे आमदार आणि ‘केसरी’चे संपादक जे. एस. टिळक यांना लिहिले होते.

८ जानेवारी १९६१ रोजी टिळकांनी नेहरूंना पत्र लिहून सावरकरांच्या स्मृतींशी संबंधित असलेल्या अंदमानमधील सेल्युलर जेलचे रूपांतर स्मारकात करण्याची मागणी केली होती. या पत्राला १५ जानेवारी १९६१ रोजी दिलेल्या उत्तरात नेहरू यांनी स्पष्टपणे मत मांडले होते. “सेल्युलर किंवा इतर कोणतेही कारागृह स्मारक म्हणून जतन करावे, या तुमच्या सूचनेशी मी सहमत नाही. भारतातील जवळपास प्रत्येक कारागृहात अनेक भारतीयांनी दीर्घकाळ कारावास भोगला आहे. मग अशा सर्वच कारागृहांचे आपण स्मारकांसारखे जतन करायचे का? काही काळापूर्वीच दिल्ली जिल्हा कारागृह जिथे अनेक नामवंत व्यक्ती कारावासात होत्या ते पाडण्यात आले आहे,” असे नेहरू यांनी म्हटले होते.

हेही वाचा : शिंदेंच्या मतदारसंघातच बंडाचा इशारा; महायुतीत पुन्हा फोडाफोडी; कोकाटेंना होणार अटक? वाचा ५ घडामोडी

नेहरूंचा विरोध असला तरी कालांतराने अंदमानमधील सेल्युलर जेलला अखेर राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आणि फेब्रुवारी १९७९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते या स्मारकाचे उदघाटन करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात अंदमान आणि निकोबार बेटांमधील श्री विजयपुरम येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह यांनी सावरकरांनी हिंदू समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात धैर्याने लढा दिला. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी मोठे कार्य केले. अंदमानातील सेल्युलर जेल हे सर्व भारतीयांसाठी एक तीर्थस्थळ झाल्याचे उदगार काढले.

अंदमान आणि निकोबार ही केवळ बेटांची भूमी नसून, असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, समर्पण व देशभक्तीने निर्माण केलेली तपोभूमी असल्याचे शाह म्हणाले. आपण सर्व जण एका पवित्र भूमीवर एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यापूर्वी कोणीही स्वेच्छेने येथे आले नव्हते. ज्यांना येथे आणले गेले, त्यांची परतण्याची कोणतीही आशा नव्हती. त्या काळात ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा भोगल्यानंतर कोणीही परत येऊ शकेल अशी कल्पना कोणीही केली नव्हती. परंतु सावरकरांनी ती धमक दाखवली आणि त्यांच्यातच ते धाडस होते. केवळ भयावर विजय मिळवणारा शूर नसतो, तर भय ओळखून त्यावर विजय मिळवणारा खरा शूर वीर असतो, असेही शाह म्हणाले.