Neither review nor discussion cm eknath shinde visit to Marathwada is only for Satsang? ssb 93 | Loksatta

ना आढावा ना चर्चा, मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा केवळ सत्संगासाठी?

ठाण्यात राजकारण आणि मराठवाड्यात महाराजांच्या गाठीभेटी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाता अहेत.

eknath shinde Marathwada
ना आढावा ना चर्चा, मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा केवळ सत्संगासाठी? (लोकसत्ता ग्राफिक्स)

औरंगाबाद : ना एखाद्या योजनेचा आढावा होतो ना मराठवाड्याच्या प्रश्नांवर उहापोह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात एखाद्या अध्यात्मिक कार्यक्रमास हजेरी लावतात आणि निघून जातात. ठाण्यात राजकारण आणि मराठवाड्यात महाराजांच्या गाठीभेटी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाता अहेत.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून यापूर्वी औरंगाबाद येथे हजेरी लावली होती. नुकतेच रविवारी ते संत निरंकारी सत्संगात सहभागी झाले. त्यांच्या समवेत पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ यांची उपस्थिती होती. त्यांच्या मराठवाड्यातील कार्यक्रमांवर बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, ‘‘ मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, मराठवाड्याच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे चर्चा व्हावी, अशी मागणी आहेच. पण, ते येतात आणि हात जोडून निघून जातात, हे बरोबर नाही’ अशी अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबदास दानवे यांनी केली.

हेही वाचा – ठाकरेंना ‘हिरे’ गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता

मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले तर त्यांच्याकडे प्रादेशिक प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी निवदने देण्यासाठी खूप संघटनाही सक्रिय असत. आता मुख्यमंत्री ‘आध्यात्मिक’ कार्यक्रमांनाच हजेरी लावून निघून जात असल्याने धोरणात्मक निर्णयांवर त्यांना निवेदन देण्यासाठी फारशा संघटनाही पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. नोकरशाहीतील वरिष्ठ अधिकारी योजनांचे टीपण करून काय सुरू आहे, याची माहिती देत. आता त्यासाठी फारशी हालचाल होताना दिसत नाही. ते येतात, हात जोडतात, आम्ही सहा महिन्यांपूर्वी दहिहंडी फोडली, चमत्कार केला, परिवर्तन घडविले, असे सांगतात आणि निघून जातात’ असे त्यांच्या सहा महिन्यांतील कार्यशैलीचे वर्णन आता मराठवाड्यात केले जात आहे. मुख्यमंत्री पुन्हा पाच तारखेला वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमास परभणी येथे हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येते आहे.

हेही वाचा – मुंबईत भाजपची मदार मोदींवरच

जिल्हा नियोजन आराखड्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे येऊन नुकतीच अर्थसंकल्प पूर्व तयारीच्या अनुषंगाने बैठक घेतली. पण शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे कोणत्या प्रश्नावर चर्चा झाली याचा तपशील मराठवाड्यातील जनतेपर्यंत पोहचू शकला नाही. धोरणात्मक निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि गर्दीच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी, असे चित्र राजकीय व प्रशासकीय पातळीवर दिसून येत आहे. ‘जेथे गर्दी तेथे मतदार, त्यांचा आध्यात्मिक गुरू हा आपलाही अध्यात्मिक गुरू, असे चित्र निर्माण करून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घ्यायचे नाहीत. त्यांनी अशा सोहळ्यांना हजेरी लावून सहानुभूती मिळवावी, पण ज्या भागात आपण जात आहोत त्या भागातील दरडोई उत्पन्न, मानव विकास निर्देशांकही मुख्यमंत्र्यांनी तपासावेत, त्या भागातील प्राधान्याच्या विकास प्रकल्पावर चर्चा करण्याची तसदी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. तसे ते करत नाहीत, हे दुर्दैव आहे’ अशी टीका भाकपचे नेते राजन क्षीरसागर यांनी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:05 IST
Next Story
ठाकरेंना ‘हिरे’ गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता