देशाचे नवे कायदेमंत्री म्हणून भाजपाचे तीन टर्म खासदार असलेले अर्जुन राम मेघवाल यांनी आजपासून कारभार हाती घेतला आहे. किरेन रिजिजू यांना बाजूला करून अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती केल्यामुळे ते आज अचानक चर्चेत आले. याआधी २०१५ साली त्यांची चर्चा झाली होती. भाजपाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद असलेल्या मेघवाल यांनी संसदेत सायकलवर प्रवेश केला होता. राजस्थानी फेटा, कुर्ता-पायजमा आणि बाह्या नसलेले जॅकेट घालून वावरणारे अर्जुन मेघवाल यांनी स्वतःची साधे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख मिळवली आहे. संसदीय कार्यमंत्री आणि सांस्कृतिक विभागाच्या जबाबदारीसोबतच आता त्यांना कायदे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. रिजिजू यांच्याकडे आता वसुंधरा विज्ञान मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रिजिजू यांच्याकडून कायदे विभागाचा कारभार काढून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

फक्त रिजिजू यांना बाजूला सारणे आणि अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कारभार देणे, एवढ्यापुरतेच हे प्रकरण नाही. याला आगामी काळातील राजस्थान विधानसभा निवडणुकीचीदेखील पार्श्वभूमी आहे. राजस्थानमधील बिकानेर या लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. भाजपाचे अनुसूचित जातीमधील आणि दलित नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मेघवाल यांच्याकडे नवीन जबाबदारी देऊन राजस्थानमधील दलित समाजाचा पाठिंबा मिळवण्याची पक्षाची रणनीती असू शकते, असेही सांगितले जाते. तसेच राजस्थान भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक नेत्यांमध्ये मेघवालदेखील सामील होतील, अशी शंका भाजपाला वाटत असल्यामुळे त्यांच्याकडे मंत्रिपदाचा अतिरिक्त भार दिल्याचे सागंण्यात येत आहे.

Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
rajan vichare emotional appeal
अन्याय सहन केलात… आता लढायला सज्ज व्हा; राजन विचारे यांचं भावनिक आवाहन 
giving tickets to ministers children relatives not dynastic politics siddaramaiah
काँग्रेसच्या उमेदवार याद्यांवर घराणेशाहीचे आरोप? सिद्धरामय्या म्हणतात, “मतदारांचा कल, कार्यकर्ते-नेत्यांच्या शिफारशी…!”
महायुतीत सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्या भेटीने चर्चेला उधाण (संग्रहित छायाचित्र)
महायुतीत सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्या भेटीने चर्चेला उधाण

हे वाचा >> “निवृत्त न्यायमूर्ती देशविरोधी टोळीतले”, किरेन रिजिजू यांच्या विधानावर विरोधक, वकील आणि न्यायमूर्तींची टीका

राजकारणात येण्यापूर्वी सनदी अधिकारी

मेघवाल हे १९८२ साली राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आयएएस अधिकारी पदावर त्यांची नेमणूक होण्यापूर्वी त्यांनी राजस्थानच्या प्रशासकीय सेवेत अनेक पदे भुषविले आहेत. २००९ साली बिकानेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मेघवाल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीला उभे राहिले. मेघवाल यांनी राजशास्त्रामध्ये एमए केलेले आहे. तसेच एलएल.बी. आणि एमबीएची पदवी मिळवलेली आहे.

राजकीय कारकिर्दीला सुरुवात

२००९ पूर्वी बिकानेर मतदारसंघात अभिनेते धर्मेंद्र खासदार होते. मात्र मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघावर अनुसूचित जातीचे आरक्षण लागले. या ठिकाणी निवडणूक लढविण्यासाठी अर्जुन राम मेघवाल हे योग्य उमेदवार असल्याचे भाजपाला जाणवले. काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार रेवत राम पनवर यांचा २० हजार मतांनी मेघवाल यांनी पराभव केला. २०१० साली मेघवाल यांना भाजपाने राजस्थान प्रदेशचे उपाध्यक्षपद दिले. तसेच त्यांचा समावेश राष्ट्रीय समितीमध्ये केला. यूपीए सरकारच्या काळात त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच वर्षी लोकसभेत त्यांनी समलैंगिकतेविरोधी विधेयक मांडले होते.

२०१४ च्या निवडणुकीआधी मेघवाल यांनी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ड वाड्रा यांच्यावर बिकानेर येथील अवैध जमीन खरेदी प्रकरणावर रान उठवले. २०१४ साली भाजपाने देशभरात बहुमताने विजय मिळवला. त्याच वर्षी मेघवाल यांनीदेखील बिकानेरमध्ये २००९ पेक्षाही मोठा विजय मिळवीत काँग्रेसच्या शंकर पन्नू यांचा तीन लाख मतांनी पराभव केला. भाजपाने त्यांची लोकसभेतील मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघवाल यांना मंत्रीपद देऊ केले. गंगानगरचे खासदार आणि पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री निहाल चंद मेघवाल यांच्यावर २०११ च्या बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळातील जातीय संतुलन राखण्यासाठी अर्जुन राम मेघवाल यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले होते, असे सांगितले जाते.

हे वाचा >> चार वर्षांत दुसऱ्या विधीमंत्र्यावर गदा

२०१९ साली मेघवाल यांना त्यांच्याच पक्षातून आणि कुटुंबातून आव्हान निर्माण झाले होते. मेघवाल यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन काम केले तसेच जातीय विभाजन केले असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. बिकानेरचे सात वेळा आमदार असलेले आणि जिल्ह्यातील मातब्बर नेते देवी सिंह भाटी यांनी भाजपाचा राजीनामा देऊन मेघवाल यांच्याविरोधात २०१९ साली प्रचार केला. दुसरे आव्हान म्हणजे, आयपीएस असलेले त्यांचे चुलत भाऊ मदन गोपाल मेघवाल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट देऊन मेघवाल यांच्याविरोधात उभे केले. मेघवाल यांनी या वेळी मदन यांचा २.६ लाख मतांनी पराभव झाला.

मेघवाल यांची वादग्रस्त वक्तव्ये

पाकिस्तानवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मेघवाल अनेकदा वादात अडकले होते. २०१९ साली पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मेघवाल यांनी पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या पूर्वेकडील नद्या अडवल्या जाव्यात, असे विधान केले होते. हे अडवलेले पाणी पंजाब किंवा राजस्थानमध्ये पिण्याच्या किंवा सिंचनाच्या हेतूसाठी वापरण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

जुलै २०२० मध्ये, करोना महामारीत मेघवाल यांनी अवैज्ञानिक दावे केल्यामुळे ते अडचणीत आले होते, तसेच त्यांच्याव टीकादेखील करण्यात आली होती. मेघवाल म्हणाले होते की, ‘भाभीजी पापड’ खाल्ल्यामुळे शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते, ज्यामुळे करोनाविरोधात लढण्यासाठी शक्ती मिळते. भाभीजीच्या पापडाची जाहिरात केल्याच्या दोन आठवड्यानंतरच मेघवाल करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

लोकसभेतील मुख्य प्रतोद आणि संसदीय कार्यमंत्री या नात्याने मेघवाल यांनी भाजपा पक्षातील खासदारांचे कामकाज नियमित होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त मेघवाल हे आध्यात्मिक भजन गाण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी मोदी यांच्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाच्या १०० व्या भागावर गाणे गायले आहे.