मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारताचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्षसंघटनेचे मजबूत पाठबळ सरकारला देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना येथे केले. पक्षविस्तार करण्यासाठी अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्याची आवश्यकता असते. पण ते देताना स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाईल आणि भाजप नेत्यांवरही अन्याय होऊ देणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदापासून २००२ मध्ये संघटनेतील कामाची सुरुवात केलेले चव्हाण हे २००५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले व २००७ मध्ये स्थायी समिती अध्यक्ष झाले. २००९, २०१४, २०१९ व २०२४ असे चार वेळा डोंबिवलीतून आमदार म्हणून निवडून आलेल्या चव्हाण यांनी राज्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे. चव्हाण यांच्यावर पक्षसंघटनेत प्रदेश सरचिटणीस, संघटन पर्व प्रभारी आणि प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी होती. आता ते १२ वे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.

मी संघटनेत युवा मोर्चापासून कामाला सुरुवात केल्याने मला संघटनेतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना व प्रश्न माहीत आहेत. अधिकाधिक नागरिकांना भाजपबरोबर आणण्याचे व संघटना आणखी मजबूत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्यांची संख्या एक कोटी वरुन दीड कोटीवर गेली आहे. कार्यकर्त्यांची संख्या आणखी वाढवून सर्वसामान्य जनतेची कामे करणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोचविणे, ही संघटनेची जबाबदारी प्रामुख्याने राहणार आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करताना विकासाचे लाभ तळागाळातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवून त्याचे जीवनमान उंचावणे व ते सुखकर करणे, यासाठी संघटनेचे सरकारला पाठबळ व योगदान राहणार आहे.

भाजपची सदस्यसंख्या दीड कोटीवर गेली असताना आणि केंद्रात व राज्यात सरकार असतानाही नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्यांना विरोध असतानाही भाजपमध्ये प्रवेश कसा दिला गेला, असे विचारता चव्हाण म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी सुरु आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अन्य पक्षांमधून नेते व कार्यकर्ते येतील. हा ओघ पुढील काही महिन्यांमध्ये वाढणार आहे. पण त्यांना प्रवेश देण्याआधी त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल व स्थानिक नेत्यांशी चर्चाही केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाहेरच्या नेत्यांना सत्तापदे लवकर मिळतात आणि मूळ भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, अशी त्यांची भावना आहे, यासंदर्भात विचारता चव्हाण म्हणाले, सत्तापदे किंवा संघटनेत जबाबदाऱ्या देताना बाहेरून आलेले आणि मूळ भाजपमधील नेते व कार्यकर्ते यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यात येईल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही आणि नाराजी निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, हा माझा मोठा बहुमान आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करीन.