आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान ही एमआयएमच्या बड्या नेत्याची नातेवाईक असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटातील मंत्र्याने केला…राहुल गांधी हे रिजेक्टेड माल असून संपूर्ण देशाने त्यांना नाकारले आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली… अशोक खरात प्रकरणात महायुतीतील चार मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला… भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली… देशातील जनता गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून प्रवास करेल, असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना लगावला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

निदा खान बड्या नेत्याची नातेवाईक?

नाशिक टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ही एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा गंभीर आरोप शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून जलील यांच्या अटकेची मागणी केली आहे, असेही ते म्हणाले. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. एमआयएमच्या ज्या नगरसेवकाने निदा खानला लपण्यासाठी आसरा दिला होता, त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर भाष्य करताना शिरसाट यांनी खळबळजनक आरोप केला आहे. निदा खान ही इम्तियाज जलील यांच्या भावाच्या पत्नीची नातेवाईक असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपामुळे जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण असून त्यावर जलील काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधी हे रिजेक्टेड माल असून संपूर्ण देशाने त्यांना नाकारले आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितले त्याचा जर अर्थ राहुल गांधी यांना कळला नसेल तर याचा दोष त्यांना देता येणार नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर, सोने खरेदी याबाबत केलेल्या आवाहनावर राहुल यांनी टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. आताच्या घडीला ज्या प्रकारची जागतिक पातळीवर परिस्थिती तयार झाली आहे, त्याचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानात तर पेट्रोलचे भाव साडेचारशे रुपये इतके वर गेले आहेत. पुरवठा साखळीची परिस्थिती पाहता आणि परकीय चलन आपल्याला कसे वाचवता येईल, याकरिता पंतप्रधान मोदी यांनी केलेले आवाहन योग्य आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, अशी विनंती आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश?

भोंदू अशोक खरात प्रकरणात महायुतीतील चार मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला. खरातकडून सगळी माहिती घेतल्यानंतर त्याला मारून टाकले जाईल, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात चार मंत्र्यांचा थेट समावेश असल्याचे पत्रच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी करणार असल्याचे पटोले म्हणाले. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे राजकीय गुंड असतील किंवा भोंदू बाबा असतील हे समोर येत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने हे सगळे घडत आहे. राज्यात भीती नावाचा प्रकार संपला आहे. त्यामुळे अशा घटना यापुढेही महाराष्ट्रात सुरू राहतील, असा आरोप पटोले यांनी केला.

गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या विजयाबाबत जयंत पाटील यांच्या मनात नेमकी कोणती भूमिका होती, यावरून पडळकरांनी संशय व्यक्त करत टीका केली. विशाल पाटील यांना खासदार करण्याची जयंत पाटील यांची मनापासून इच्छा होती का? जर असेल तर त्यांनी आपल्या आईची शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान पडळकर यांनी दिले. त्यांच्या या आव्हानामुळे सांगलीतील लोकसभेच्या निवडणुकीत जयंत पाटलांनी पडद्यामागून नेमकी कोणती खेळी केली, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. दरम्यान, पडळकरांच्या टीकेला जयंत पाटील काय उत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा पंतप्रधान मोदींना टोला

पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसांत ३० ते ४० रुपयांनी वाढणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. लोक आता गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून प्रवास करतील, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. पश्चिम आशियातील संकटाची परिस्थिती पाहता पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या आवाहनानंतर आता विरोधी पक्षांकडून पंतप्रधानांवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात पेट्रोल-डिझेलचा भरपूर साठा असल्याचे सांगत होते. परंतु अचानक काय झाले? अर्थव्यवस्था ढासळत असून यामध्ये आपला गळा दाबला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसांत ३० ते ४० रुपयांनी वाढणार असल्याचे आव्हाड म्हणाले. इंधनाचे दर भडकल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक संकटाचे मोठे ओझे पडणार आहे. विविध जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.