छत्रपती संभाजीनगर : जिलेबी आणि बोरसुरी डाळ हे दोन पदार्थ निलंगा मतदारसंघात वाढले की समजावे, निवडणूक जवळ आली. १९९५ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा पराभव झाला तेव्हा गावोगावी लोकांनी स्वत:हून हरिनाम सप्ताह आयोजित केले होते. सोबत जिलेबीचं जेवणही गावोगावी झाले. तेव्हा पासून निलंगेकर जरा जास्त गोड खातात. म्हणजे निलंग्यासारख्या छोट्याशा शहरात ३५० - ४०० किलो जिलेबी रोज खपते. त्याच बरोबर गावोगावच्या तरुणांबरोबर आता बोरसुरी डाळीच्या पार्ट्या सुरू झाल्या आहेत. जरासे तिखट वरण आणि कुस्करण्यासाठी पातळ गरम भाकरी हा ऐवज निलंग्याच्या निवडणुकीमध्ये पुरतो. ज्यांना मटण खायचे नाही त्यांच्यासाठी ही पार्टी. भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर शाकाहारी असल्याने ते या बोरसुरी डाळीच्या पार्ट्या आयोजित करत असल्याचे सांगण्यात येत आहे. १९९५ च्या निवडणुकीच्या आठवणी सांगताना तेव्हा शिवाजी पाटील निलंगेकर यांना पराभूत करणारे कॉ. माणिक जाधव म्हणाले, ‘ ती निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. लोकच ठरवायचे सारे. तेव्हा निलंग्यात काँग्रेसचे काही कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याच्या तयारी होते. तेव्हा निलंग्यातील शिवाजी चौकातील भाषणात जरा ओघात म्हणालो होतो- जर गरज भासलीच तर त्यांचे धोतर फेडू. पण कोणी तरी काँग्रेसच्या नेत्याविरोधात उभा ठाकतोय, असा संदेश सर्व मतदारसंघात गेला. परिणाम असा झाला की शिवाजी पाटील निलंगेकर यांचा दणदणीत मतांनी पराभव झाला.’ पण नंतर निलंगा मतदारसंघात काँग्रेसचाच पगडा. टोपीची धारदार इस्त्री, स्वच्छ धोतर, पायात मोजे आणि खाली बूट असा निलंगेकर यांचा पेहराव. गावोगावी लग्नकार्यात आमदारांनी आहेर करण्याची पद्धतच. त्यामुळे गावोगावची मंडळी जोडलेली. राज्यात हाती सत्ता असल्याने निलंग्यातील अनेकांना सरकारी नोकरी मिळत गेली. आपली कामे होतात, हा संदेश शिवाजीराव पाटील निंलगेकरांनी दिला. पुढे गोपीनाथ मुंडे यांनी शिवाजीरावांची स्नूषा रुपाताई पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पुढे संभाजी पाटील राजकारणात स्थिरावले. आता गावोगावी तरुणांचे संघटन करण्यासाठी ते बोरसुरी वरणाच्या पार्ट्या करतात. हेही वाचा.अपप्रचारांविरोधात व्यापक मोहीम राबवा निलंग्याच्या राजकारणाचा पोत तसा लातूरचे देशमुख विरुद्ध निलंगेकर असा. आताही काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी अभय साळुंके यांना जर अधिक बळ दिले. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छूक असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अरविंद भातांब्रे, अशोक पाटील निलंगेकर हेही या विधानसभा निवडणुकीत इच्छूक आहेत. निलंगा मतदारसंघात सुरू असणाऱ्या बांधणीत आता संभाजी पाटील तसे आघाडीवर असतात. पण लोकसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार डॉ. काळगे यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांची बोरसुरी डाळ शिजेल का, हे कोडेच बनले आहे. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचाही या मतदारसंघावर प्रभाव होता. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना निलंगा शहरातील नगर पालिका ताब्यात मिळविणे कमालीचे जड होते. आता राजकीय पटलावर भाजपला ही निवडणूक सोपी वाटत असली तरी लिंगायत मतांचा प्रभाव ज्या बाजूने झुकेल त्यावर विजयाचे गणिते ठरतील.