सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : भोवताली विविध क्षेत्रातील चांगले काम करणाऱ्यांचे कोंडाळे असावे, ती माणसे आपल्याशी तर जोडलेली असावीतच शिवाय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना या माणसांच्या चांगल्या कामाची माहिती असावी असा मिलाफ घडविणारा नेता, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते निलेश राऊत यांची ओळख. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या मराठवाड्यातील दौऱ्याचे नियोजनातील बारकावे ठरविणे असो किंवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन, परिवर्तनाच्या चळवळीतील एखाद्या नव्या लेखकास प्रोत्साहन देणे असो की कोविडसारख्या आपत्तीत मदत करणे असो; निलेश हे सारे आनंदाने करतात. ‘कार्य- कर्ते’पण साठवून ठेवणारा आणि त्यात भर टाकणारा नेता अशी ३५ वर्षांच्या निलेश राऊत यांची राजकीय बांधणी आहे.

हेही वाचा… नितीन गडकरींनी टाटा समूहाला लिहिलेल्या पत्राचा अर्थ काय?

आमदार होण्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेतून औरंगाबाद पश्चिम या राखीव मतदारसंघात आतापासून पेरणी करणारे निलेश राऊत यांनी राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले आहे. कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण आणि जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय अशी पार्श्वभूमी असलेले निलेश राऊत अभ्युदय फाऊंडेशन आणि ‘निर्मिक ग्रुप’ या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतात. पण निलेश राऊत यांची खरी ओळख ही ‘राष्ट्रवादी’च्या विविध क्षेत्रातील बांधणीची. साहित्य, संस्कृती या क्षेत्रातील मान्यवरांच्या ओळखी तर आहेतच शिवाय सध्या कोणता लघुपट चांगला आहे, कोण चांगल्या संहितेवर काम करतो आहे, कोणत्या पक्षाची विचारसरणी आणि कार्य यात मोठी तफावत होते आहे, असे सारे संदर्भ निलेश राऊत मिळवत राहतात. एखादा नवा उद्योजक औरंगाबाद शहरात नवे काही करतो आहे तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते काम करतात. सांगलीच्या पुरात अडकलेल्या व्यक्तींना मदत करण्यापासून ते ‘ताईज किचन’ सारखा महिलांना रोजगार देणारा उपक्रम असो, अनेक क्षेत्रात वावर आणि चांगले घडवून आणण्याची ताकद असणारा नेता अशी राऊत यांची ओळख आहे. पट किंवा आवाकाही तसा मोठा. शास्त्रीय संगीतामध्ये राहुल देशपांडे ते औरंगाबादचे सनई वादक कल्याण अपार यांच्यापर्यंत तेवढ्याच आपुलकीचे संबंध, तर कवी सौमित्र ते बाल कविता लिहिणारे गणेश घुलेपर्यंत लिहित्या हातांशी संपर्क. कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्रातील मंडळींबरोबरच विविध राजकीय पक्षातही स्नेह. पण हे सारे करताना यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी लागणारे कसब राऊत यांच्या अंगी आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

विचारांनी डावीकडे जाताना आपण अधिक टाेकदार कुठपर्यंत व्हायचे, याचे भानही बाळगत शहरी भागात संघटन उभे करणारे राऊत यांना पक्षात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष पद मिळाले. पण त्या पदाबरोबरची काम ते आजही करतात. नव महाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे राज्य संघटक म्हणून ते काम करत आहेत. तसेच औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते सचिवही आहेत. अपंग पुनर्वसन केंद्र चालविताना उमेदच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला पुनर्वसन उपक्रमही त्यांनी हाती घेतले. शंभराहून अधिक सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणारे राऊत तसे उदयोन्मुख नेतृत्व आहे. पण औरंगाबादच्या राजकीय अवकाशात एकूण राष्ट्रवादीची जागाच आकुंचित होत गेली आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात असला तरी येथे मुख्य प्रवाहातील नेते मात्र राष्ट्रवादीला घडवता आले नाहीत. तसे बळ कमी पडते असे नाही पण ती इच्छाशक्ती मात्र पुढच्या पायरीवर जाताना दिसते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh raut a political activist who cares for people print politics news asj
First published on: 01-11-2022 at 10:49 IST