नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृह जिल्ह्यातच त्यांची पक्षपातळीवर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच्या समर्थकांना पद्धतशीरपणे संघटनेतून बाजूला केले जात आहे. नुकत्याच झालेल्या संघटनेतील नियुक्त्या हे त्याचे ताजे उदाहरण ठरावे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत महत्वाचे ठरणारे पक्षाचे शहर आणि जिल्हा अध्यक्षपद या दोन्ही पदांवरून गडकरी समर्थकांना बाजूला करून इतरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे शहर अध्यक्षपद गडकरी समर्थक बंटी कुकडे यांच्याकडे होते, त्यांना बाजूला करून माजी महापौर दयाशंकर तिवारी याची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा अध्यक्षपदी असलेले आणखी एक गडकरी समर्थक माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याऐवजी आनंदरराव राऊत आणि मनोहर कुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली. कुंभारे तर वर्षभरापूर्वीच भाजपमध्ये आले होते. हे येथे उल्लेखनीय. जिल्ह्यात व शहरातील नियुक्त्या लक्षात घेतल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड अधिक घट्ट केल्याचे स्पष्ट होते.
नागपूरमध्ये पक्षाचा शहर अध्यक्ष नियुक्त करताना गडकरी यांचा शब्द आतापर्यत अंतिम मानला जात होता.शहर अध्यक्षपद सांभाळणाऱ्या नेत्यांच्या यादीवरून ही बाब स्पष्ट होते. ज्यांना नव्या फेररचनेत बाजूला करण्यात आले त्या बंटी कुकडेंची नियुक्तीही गडकरी यांच्यामुळेच झाली होती.बहुजन समाजाला प्राधान्य देण्याचे धोरण गडकरींनी नेहमीच ठेवले होते. त्यामागे लोकसभा मतदारसंघाचा असलेला बहुजन प्राबल्यवादी चेहरा हे होते. कुकडेच्या नियुक्तीमागेही हीच भूमिका होती.
कट्टर गडकरी समर्थक ही ओळख कुकडे यांच्यासाठी नंतरच्या काळात अडचणीची ठरली. पक्षातील दुसरा गट त्यांच्यापासून अंतर ठेवत होता. कुकडेंचा कार्यकाळ एक वर्ष शिल्लक होता. त्यामुळे त्यांनाच पुन्हा संधी दिली जाईल, असे वाटत होते. पण शहर अध्यक्षपदासाठी निश्चित केलेल्या तीन नावांमध्येही त्यांचे नाव नव्हते. यावरूनच त्यांची गच्छंती होणार हे अटळ होते. पण त्यांच्या जागी होणारा नवा अध्यक्ष गडकरी समर्थक असेल, असे मानले जात होते. नवे अध्यक्ष दयाशंकर तिवारी कट्टर हिंदुत्ववादी मानले जातात.
ग्रामीण अध्यक्षपदावरूनही गडकरी समर्थक दूर नागपूर शहराप्रमाणेच नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदावरूनही गडकरी समर्थक माजी आमदार सुधाकर कोहळे यांना दूर करण्यात आले. मुळात कोहळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती हीच आश्चर्यकारक होती. कारण कोहळे नागपूर शहराच्या राजकारणात सक्रिय नेते होते. ते पक्षाचे नगरसेवक, दक्षिण नागपूरचे आमदार होते. विशेष म्हणजे अनेक वर्ष भाजपचे शहर अध्यक्ष होते. २०१९ मध्ये विद्यमान आमदार असताना त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे ते नाराज होते.
नंतर झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांना संधी दिली जाईल हे आश्वासनही फोल ठरले.त्यामुळे त्याची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना ग्रामीणचे अध्यक्ष करण्यात आले. मात्र त्यांचा जीव तेथे रमला नाही.ते पश्चिम नागपूर मधून विधानसभा निवडणूक लढले. परंतु त्यांचे ग्रामीणचे अध्यक्षपद कायम होते. या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात गडकरीं समर्थकांना वाव होता.पण कोहळेंचीही गच्छंती झाली. त्यामुळे शहरासोबत ग्रामीणमधूनही गडकरी समर्थक सध्या तरी पोरके ठरले आहेत. राजकारणात आजचे समर्थक उद्याचे विरोधकही होऊ शकतात. गडकरी सध्या हा अनुभव नागपूरमध्ये पक्षात घेत आहेत.