बिहारच्या राजकारणात समाजवादी विचारसरणीचे नेते व भाजपामध्ये कायम वाद दिसून आला. तसेच हे दोन्ही गट एकत्र आल्याचेही दिसून आले. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरीही बिहारमध्ये समाजवादी हे भाजपापेक्षा वरचढ ठरले आहेत. त्याचे कारण म्हणजे नितीश कुमार यांचे बिहारवर असलेले नियंत्रण होय. बिहार हे राज्य आतापर्यंत भाजपाला कधीही स्वबळावर जिंकता आलेले नाही. परंतु, आता नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. भाजपाला बिहारमध्ये हळूहळू स्वबळावर उभे राहण्यासाठी पाय रोवता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संयुक्त जनता दलासमोरील आव्हान
संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार दिल्लीत गेल्यानंतर बिहारमध्ये भाजपा व राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) या दोन पक्षांमध्ये चुरस रंगेल. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासमोर (जेडीयू) बिहारमधील प्रस्थ कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे. कुर्मी व अति मागासवर्गीय समाजावर असलेली पकड नितीश कुमार यांना कायम ठेवावी लागेल. दरम्यान, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) अत्यंत खराब कामगिरी केली होती. त्यामुळे आता बिहारच्या राजकारणात भाजपाला दबदबा आणखी वाढवता येईल.
बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) ८५ आमदार तर १२ लोकसभेचे खासदार आहे. नितीश कुमार यांना मुख्यत: २५ टक्के लोकसंख्या असलेल्या अतिमागासवर्गीय समाज व ७ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी लव-कुश (कुर्मी-कोइरी) समाजाचा पाठिंबा आहे. तसेच महिला मतदारदेखील मोठ्या संख्येने जेडीयूशी जोडल्या गेल्या आहेत.
नितीश कुमार वगळता अन्य चेहरा नाही
दरम्यान, संयुक्त जनता दल पक्षाकडे नितीश कुमार वगळता अन्य कोणताही चेहरा नाही. पक्षात श्रवण कुमार, अशोक चौधरी, विजय कुमार चौधरी असे दुसऱ्या फळीतील नेते आहेत. परंतु, त्यांपैकी सर्वांना मान्य होईल, असे नेतृत्व पक्षात नाही. अशा परिस्थितीत नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे जेडीयूत पुढे येऊ शकतात. देशात प्रादेशिक नेत्यांपैकी फक्त नितीश कुमार यांनीच त्यांच्या मुलांना राजकारणात आणले नव्हते. परंतु, आता निशांत यांना राजकारणात आणले जाणार आहे. निशांत कुमार यांच्या राजकीय पदार्पणाला उशीर झाल्याची कुजबूज जेडीयूमध्ये आहे.
नितीश कुमारांकडून पुत्राला राजकारणात आणण्याचे प्रयत्न
निशांत कुमार हे नितीश कुमार यांचे पुत्र आहेत, हीच निशांत कुमार यांची राजकीय ताकद तसेच कमजोरी ठरू शकते. “निशांत कुमार यांना लवकर त्यांचे नेतृत्व सिद्ध करावे लागणार आहे. त्यांनी त्यांच्या वडीलांचे राजकारण जवळून पाहिले आहे. त्यांना फक्त बिहारमध्ये फिरायचे आहे. त्यांना जनाधार आणि बिहारच्या नागरिकांचा आशीर्वाद आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा त्यांना मिळणार आहे”, अशी माहिती निशांत यांच्या निकटवर्तीयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
भाजपासाठी संधी
नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणे हे भाजपासाठी एका छोट्या विजयासारखे आहे. भारतीय जनता पक्ष मागील अनेक वर्षांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होता, ती या निमित्ताने घडल्याचे मानले जात आहे. भाजपाने विधानसभेच्या ८९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जेडीयूबरोबर पुढील काही वर्ष जुळवून घेणे भाजपाला सहज शक्य होणार आहे. परंतु, भाजपासमोर खरे आव्हान हे २०३० नंतर असेल. त्याचे कारण म्हणजे बिहारमध्ये भाजपाला एक कणखर नेतृत्व उभे करावे लागणार आहे. सुशील मोदी यांच्या निधनानंतर भाजपाला बिहारमध्ये नवीन चेहरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, सम्राट चौधरी यांच्याकडे भाजपा नवे नेतृत्व म्हणून सध्या पाहत आहे. “भाजपाने कमजोर मुख्यमंत्री दिला तर कालांतराने भाजपाचे बिहारमधील वर्चस्व कमी होत जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाला बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत यश मिळवून देऊ शकतात, परंतु, विधानसभा निवडणुकीत नाही.”, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे.
भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करणार?
नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पद सोडण्याने भाजपाला बिहारमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा राबवणे सोपे होईल, असे मानले जात आहे. नितीश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात हिंदुत्वाच्या मुद्द्याला विरोध केला होता. २०१४ मध्ये नितीश कुमार हे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचावरून गुजरात दंगल कधीही विसरली जाऊ शकत नाही, असे विधान केले होते. त्यावेळी नितीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले होते. ते विरोधकांना जाऊन मिळाले होते. दरम्यान, भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केल्यास बिहारमध्ये पक्षांमध्ये ध्रुवीकरण होईल, असे विरोधकांना वाटते. सध्या भाजपाने बिहार जिंकला आहे. ही पकड कायम ठेवण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल
२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत एनडीए महायुतीला २०२ जागांवर यश मिळाले आहे. तर, विरोधकांच्या पारड्यात केवळ ४१ जागा पडल्या आहेत. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ८९, संयुक्त जनता दलाने ८५, एलजेपी १९, आरएलएम ४ आणि एचएएम ५ जागांवर विजयी झाले. तर आरजेडीला २५, काँग्रेसला ६ जागांवर यश मिळाले.
