छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. या निवडणुकीतील पराभवामुळे इंडिया आघाडीत काहीशी चलबिचल निर्माण झाली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. संयुक्त जनता दल तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून अनुक्रमे नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी हे पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या ६ डिसेंबर रोजीच्या बैठकीला येऊ शकणार नसल्याचेही सांगितले. त्यामुळे इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले. दरम्यान, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांचा सूर आता मवाळ झाला आहे. आम्ही इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीला उपस्थित राहू, असे ते म्हणाले आहेत.
“काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटकपक्षांना सोबत घेतले नाही”
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितीश कुमार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटकपक्षांना सोबत घेतले नाही, असे नितीश कुमार म्हणाले होते; तर हा लोकांचा नव्हे तर काँग्रेसचा पराभव आहे. काँग्रेस या पराभवापासून धडा घेईल अशी अपेक्षा आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. मतविभाजनामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांचा सूर मवाळ
दरम्यान, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांचा सूर आता नरमला आहे. “गेल्या काही दिवसांपासून माझ्याविषयी काय काय चर्चा झाली आहे, माझी प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे मी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, असे सांगितले होते. मी सध्या बरा झालो आहे, त्यामुळे इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीला मी उपस्थित राहीन. मात्र, जागावाटपासंदर्भात लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे, कारण आता लोकसभा निवडणुकीसाठी फारच कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत”, असे नितीश कुमार म्हणाले. ते बुधवारी पाटण्यात बोलत होते.
निवडणुकीत जय-पराजय होतच असतो- नितीश कुमार
विशेष म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील पराभवाबद्दल बोलताना त्यांनी काँग्रेसची पाठराखणच केली. काँग्रेसची कामगिरी फार खराब नव्हती. काँग्रेसला तेलंगणात चांगली मते मिळाली. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो, असेही ते म्हणाले.
…तेव्हा आम्ही सगळे भेटू- ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनीदेखील इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य केले. ६ डिसेंबर रोजीच्या बैठकीबाबत आम्हाला कोणीही सांगितले नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. “मला राहुल गांधी यांनी सोमवारी फोन केला होता. मात्र, माझा उत्तर बंगालचा दौरा अगोदरच ठरलेला होता. एखाद्या कार्यक्रमाविषयी सात ते १० दिवस अगोदरच सांगायला हवे, कारण अनेकदा माझ्यासह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री हे व्यग्र असतात. मात्र, आता जेव्हा इंडिया आघाडीची बैठक होईल, तेव्हा आम्ही सगळे भेटू”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्या कोलकाता विमानतळावर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.
मला स्वत:साठी काहीही नको- नितीश कुमार
दरम्यान, नितीश कुमार हे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, असा दावा गेल्या अनेक दिवसांपासून केला जातो. यावरही खुद्द नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. “जे भारताचा इतिहास बदलायला निघाले आहेत, त्यांच्या विरोधात विरोधकांना एकत्र करणे हाच माझा उद्देश आहे. मला माझ्या स्वत:साठी काहीही नको आहे, माझ्यासाठी पंतप्रधानपद हे महत्त्वाचे नाही. मी पाटण्यातून विरोधकांना एकत्र आणण्याची मोहीम सुरू केली. याच मोहिमेत मला एका निष्कर्षापर्यंत पोहोचायचे आहे”, असे नितीश कुमार म्हणाले.