Next Bihar CM likely from BJP दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत मुख्यमंत्री पदावर असलेले नितीश कुमार आता राज्यसभेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. नितीश कुमार यांनी गुरुवारी अधिकृतपणे जाहीर केले की, ते राज्यसभेवर जाणार आहेत. सकाळी ११ च्या सुमारास प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, कुमार यांनी बिहारच्या जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. बिहारच्या विधानसभा निवडणुकीला अवघे चार महिने होताच नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“यंदा होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मी अर्ज सादर करत आहे. बिहारच्या जनतेशी असलेले माझे संबंध भविष्यातही कायम राहतील. जे नवीन सरकार स्थापन होईल, त्याला माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल”, असेही नितीश कुमार म्हणाले. या निर्णयामुळे आता बिहारमध्ये राजकीय पुनर्रचनेची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची रिक्त झाल्याने अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्यानंतरच्या सत्ता समीकरणात पाच नावांची चर्चा आहे, त्यात तीन नावे भाजपातील आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांच्यानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेली नावे
उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उद्योगमंत्री दिलीप जयस्वाल, नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार व राज्यमंत्री विजय कुमार चौधरी, ही सर्वाधिक चर्चेत असलेली नावे आहेत. ८९ आमदारांसह विधानसभेत आता सर्वांत मोठा पक्ष ठरलेला भाजपा मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या तुलनेत बिहारमधील ओबीसी आणि ईबीसी गटांमध्ये पक्षाचा विस्तार कमी झाला आहे, तो भरून काढण्यासाठी भाजपा या संधीचा वापर करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, जेडीयू पक्ष नितीश कुमार यांचे पुत्र निशांत यांना सरकारमध्ये आणून आणि विश्वासू सहकारी विजय कुमार चौधरी यांच्या मदतीने वारसा हक्काची योजना निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. या नवीन व्यवस्थेत सम्राट चौधरी, नित्यानंद राय व दिलीप जयस्वाल हे भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत; तर निशांत कुमार व विजय चौधरी यांच्या नावांची चर्चा जेडीयूकडून उपमुख्यमंत्री पदासाठी केली जात आहे. पक्षाचा पारंपरिक सामाजिक आधार टिकवून ठेवण्यासाठी आणि संघटनेत नेतृत्व सुरळीत करण्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याचे दिसून येत आहे.
प्रमुख दावेदार कोण?
१. सम्राट चौधरी
मुंगेर येथील कोइरी-कुशवाहा (ओबीसी) समाजाचे नेते सम्राट चौधरी सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आरजेडीमधून केली आणि १९९९ मध्ये राबडी देवी सरकारमध्ये ते कृषिमंत्री होते. त्यानंतर त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आणि शेवटी भाजपामध्ये आले. भाजपामध्ये त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष, विधान परिषद सदस्य व प्रदेशाध्यक्ष, अशी पदे भूषवली आहेत. २०१४ मध्ये त्यांनी आरजेडी विधिमंडळ पक्षात फूट पाडली होती आणि त्यामुळे त्यांची एक कुशल संघटक म्हणून ओळख निर्माण झाली. बिगर-यादव ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा त्यांना मुख्यमंत्रिपदाचे आघाडीचे उमेदवार मानत आहे.
२. नित्यानंद राय
वैशाली जिल्ह्यातील यादव समाजाचे नेते नित्यानंद राय हे केंद्र सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आहेत आणि बिहारमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म हाजीपूरजवळील करणपुरा गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. ते १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला अभाविपच्या माध्यमातून राजकारणात आले आणि दीर्घकाळापासून संघ परिवाराशी जोडलेले आहेत. त्यांनी २००० ते २०१० पर्यंत हाजीपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतर २०१४, २०१९ व २०२४ मध्ये उजियारपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. आरजेडीची यादव मतांवरील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पक्ष त्यांना नेहमीच पुढे करत आला आहे. त्यांना मुख्यमंत्री केल्यास यादव मतांमध्ये फूट पाडण्याबरोबरच उच्चवर्णीय आणि बिगर-यादव ओबीसींचा पाठिंबा मिळवणे भाजपाला सोपे जाईल.
३. दिलीप कुमार जयस्वाल
खगरियाच्या उसरी गावातील वैश्य-बनिया समाजाचे नेते दिलीप जयस्वाल हे बिहारचे उद्योग आणि रस्ते निर्माण मंत्री आहेत. पूर्णिया-अररिया-किशनगंज पदवीधर मतदारसंघातून ते सलग तीनदा विधान परिषद सदस्य (एमएलसी) म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे कोषाध्यक्ष आणि महसूल व जमीन सुधारणा खातेही सांभाळले आहे. ते दोनदा प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वांत मोठा पक्ष म्हणून उभारी देण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
४. निशांत कुमार
नितीश कुमार आणि मंजू सिन्हा यांचे एकुलते एक पुत्र निशांत यांचा जन्म १९७५ मध्ये झाला. पाटणा आणि मसुरी येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बीआयटी मेसरा येथून सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले.गेली अनेक वर्षे ते राजकारणापासून दूर राहिले. त्यांचा कल अध्यात्माकडे होता. निशांत केवळ कौटुंबिक कार्यक्रमांतच दिसायचे. मात्र, २०२५ पासून ते सार्वजनिक कार्यक्रमांत वडिलांबरोबर दिसत आहेत. जेडीयूच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून ते पक्षासाठी पाठिंबा मागत असल्याने त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमार यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर नेहमीच टीका केली आहे. मात्र, पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी निशांत यांना उपमुख्यमंत्री करणे, हा त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
५. विजय कुमार चौधरी
समस्तीपूरच्या दलसिंगसराई येथील भूमिहार समाजाचे नेते विजय चौधरी १९८२ पासून राजकारणात सक्रिय आहेत. ते नितीश कुमार यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे तीन वेळा आमदार राहिलेल्या जगदीश प्रसाद चौधरी यांचे ते सुपुत्र आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियातील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ची नोकरी सोडून निवडणूक लढवली. सुरुवातीला काँग्रेसकडून तीन वेळा आमदार झाल्यानंतर त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला. पक्षात त्यांनी प्रदेशाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आणि अर्थ, शिक्षण, जलसंपदा यांसारखी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन नितीश कुमार पक्षातील अनुभवी नेत्यांना आनंदी ठेवण्याचा आणि निशांत कुमार यांच्या रूपाने होणाऱ्या पिढीबदलाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू शकतात.
