Bihar Elections Nitish Kumar बिहारमधील २०२५ च्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि नितीश कुमार हे अजूनही बिहारच्या केंद्रस्थानी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या निकालांनी पुन्हा एकदा NDA ला मिळालेल्या बहुमताने उत्साह वाढवलेला असला, तरी भाजपापेक्षा कमी जागांवर लढूनही JD(U) ने दाखवलेली कामगिरी नितीश यांच्या राजकीय किमयेचे नवे उदाहरण ठरली आहे. संख्या कितीही असो, सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार हे ठरवण्याची किल्ली मात्र नितीश कुमार यांच्याच हाती असते, असे गेल्या २० वर्षांचा इतिहास सांगतो.
परिवर्तनाचा शिल्पकार की थकलेला सेनापती?
२००५ मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा सत्तेवर आले, तेव्हा बिहारच्या राजकारणात ‘जंगलराज’ विरुद्ध ‘विकास’ असा थेट संघर्ष होता. पहिल्या दशकभरातील त्यांच्या सत्तेमध्ये रस्ते, शाळा, रुग्णालये आणि कायदा व सुव्यवस्था हे परवलीचे शब्द ठरले होते. राज्याचा अर्थसंकल्पही RJD च्या काळात २५,००० कोटींवरून काही वर्षांत १ लाख कोटींवर पोहोचला; आज तो ३.१७ लाख कोटींवर आहे. २० वर्षांत त्यांनी बिहारच्या पायाभूत व्यवस्थेला आकार दिला.
तब्येत हा चर्चेचा विषय
परंतु आज परिस्थिती बदलली आहे. ७४ वर्षीय नितीश यांची तब्येत हा चर्चेचा विषय आहे; त्यांचाच जुना वेग ते गाठू शकत नाहीत, बोलताना त्यांना मध्येच थांबावं लागतं. विधानसभेमध्ये पूर्वी सहज होणाऱ्या पत्रकारभेटीही आता क्वचित होतात. पण तरीही निवडणूक प्रचारात तेच सर्वप्रथम मैदानात उतरले. वयानुसार आलेला थकवा त्यांच्या भाषणांमध्ये दिसत असला, तरी चेहऱ्यावर मात्र विजयाचेच भाव होते.
मोफत वीजेपासून सोलार पॅनेलपर्यंत…
निवडणुकीआधीचा सर्वात चर्चेत राहिलेला निर्णय म्हणजे १२५ युनिटपर्यंत मोफत वीज. ‘फ्रीबीज’ अर्थात रेवडी वाटपाच्या विरोधात बोलणारा नेता असा निर्णय कसा घेईल, अशाही चर्चा झाल्या. पण त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली माहिती वेगळीच होती… कल्पना BJP ची, गणित IAS अधिकाऱ्यांचे, पण ‘सोलार पॅनेल’ची अट नितीश कुमार यांची होती. गरीब कुटुंबांचा पूर्ण खर्च सरकार उचलेल असे त्यांनी सांगितले; आणि इतरांना अनुदान देईल. मोफत वीजमुळे वाढणारा आर्थिक बोजा दुर्गम भागात सोलार पॅनल वितरित करून एकूणच भविष्यात कमी करता येईल, असे त्यांचे गणित होते, ही खास नितीनशैलीच!
पिढी बदलली, बिहार बदलला
२००५ मधील लढत होती ती, लालूप्रसाद यादव विरुद्ध नितीश कुमार. आता तब्बल २० वर्षांनंतर पिढीच बदलली आहे. २००६ मध्ये २०-२९ वयोगटातील युवक लोकसंख्येच्या १५.५% होते ते आता १८.९% वर पोहोचले आहेत. ही पिढी लालू- रबडीच्या राज्याची स्मृती नसलेली अशी आहे; या पिढीने फक्त नितीश कुमारच सत्तेत पाहिले आणि अनुभवले. ही पिढी बेरोजगारीच्या आकड्यांविषयी संवेदनशील आहे. त्यामुळेच तेजस्वी यादव यांच्या ‘प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी’ या वचनाला प्रचार सभांदरम्यान प्रतिसाद मिळाला होता.
तरुण पिढीला हवाय ‘विकास प्लस’
JD(U) नेही युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालये, युवक आयोग, १८-२५ वर्षांतील तरुणांसाठी १,००० रुपये मासिक भत्ता यांसारख्या योजना जाहीर केल्या. परंतु या पिढीच्या आकांक्षा ‘विकास’पलीकडे ‘विकास प्लस’च्या शोधात आहेत. फक्त विकासावर ही पिढी खूश नाही, त्यांना आणखीही खूप काही हवे आहे. स्वतःची प्रगती, स्पर्धात्मक रोजगार, आणि आधुनिक, महानगरीय राजकारण सारे काही.
नितीश कुमारांचे सोशल इंजिनीअरिंग
नितीश यांच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी राजकारणाचे सर्वात कठीण कोडे सोडवले हे होते जातीय संतुलनाचे. नितीश कुमार त्यांच्या सोशल इंजिनीअरिंगसाठी अधिक ओळखले जातात. यादव- मुस्लीम या RJD च्या बालेकिल्ल्याबाहेर असलेल्या EBC, महादलित, आणि महिलांचे नवीन गट तयार करून त्यांनी स्वतःचा मजबूत ‘सामाजिक आधार’ उभा केला.
महिलांचे वाढलेले प्रमाण आणि योजना
२०१० नंतर महिलांचे मतदानाचे प्रमाण पुरुषांपेक्षा सतत अधिक राहिले आहे. पंचायतीत ५०% आरक्षण, स्वयं-सहाय्यता गटांची उभारणी, मोफत सायकली, मुलींचे मोफत शिक्षण आदी योजनांनी महिलांमध्ये नितीश कुमार यांचा प्रभाव वाढत गेला.
परंतु EBC मतदारांमध्ये तडे गेले. मोदी लाटेपासून BJP ला मिळणारा EBC पाठिंबा वाढला. २०२० मध्ये JD(U) च्या ४३ जागाच आल्या. EBC बहुल मतदारसंघांतील त्यांचा पराभव ठळकपणे दिसणारा होता.
सत्ता म्हणजे नितीश आणि नितीश म्हणजे सत्ता
२०१० मध्ये पहिला क्रमांक, २०१५ मध्ये दुसरा, २०२० मध्ये तिसरा… क्रमांक कोणताही असला तरी मुख्यमंत्री मात्र तेच अर्थात नितीश कुमार. बिहारमध्ये सत्ता कोणाची? हा प्रश्न अनेकदा उत्तरापेक्षा सोपा असतो… नितीश कुमार जिथे, सत्ता तिथे.
२०२५ परिस्थिती बदलली
२०२५ मध्ये BJP ने पहिल्यांदाच त्यांना ‘समान जागा वाटप’ सूत्र स्वीकारायला भाग पाडले. पण उमेदवारीच्या चर्चेत त्यांनी BJP कडून यादी बदलून घेतली, चिराग पासवानला काबूत ठेवण्याचा आग्रह धरला आणि तो मान्यही झाला. २० वर्षांचा अनुभव आणि राजकीय डावपेच वळवण्याची क्षमता हे नितीश कुमार यांचे आजवरचे सर्वात मोठे भांडवल राहिले आहे.
आता पुढे काय?
NDA ला बहुमत मिळाले आहे. BJP मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्याच नावाला पसंती देईल का, हा अद्याप प्रश्नच आहे. JD(U) ची कामगिरी ६० जागांच्या आसपास राहिल्याने त्यांचे महत्त्व पुन्हा वाढले, पण भविष्यातील समीकरणे मात्र कदाचित बदलतील, अशी चिन्हे आहेत.
भविष्यात निशांत कुमार?
नितीश यांच्या प्रकृतीच्या चर्चा आहेत, तर दुसरीकडे JD(U) मध्ये त्यांचा मुलगा निशांत कुमार यांना हळूहळू पुढे आणण्यासाठी चाचपणी सुरू आहे. समाजवाद्यांना जवळची विचारसरणी, वाचन, कार्यकर्त्यांशी वाढता संवाद हे ‘उद्या’साठीचे संकेत मानले जात आहेत.
बिहारचे भीष्म?
एका मतदाराने निवडणूक मोहिमेदरम्यान केलेली टिप्पणी आजही चर्चेत आहे, ते म्हणजे “महाभारतात भीष्मांना इच्छामृत्यूचे वरदान होते; बिहारमध्ये नितीश कुमारांकडे इच्छाशासनाचे वरदान आहे.”
२०२५ च्या निवडणुकीने हे वरदान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, पण तेच मुख्यमंत्री होणार का आणि पुढील पाच वर्षे ते टिकून राहणार हा यक्षप्रश्नच आहे.
