Premium

जदयू पक्ष पुन्हा एनडीएत सहभागी होणार? खुद्द नितीश कुमार यांनी दिलं उत्तर; म्हणाले…

नितीश कुमार यांच्या या विधानानंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली.

nitish kumar
निती शकुमार (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया या नावाने नवी आघाडी केली आहे. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. या पक्षांना एकत्र आणण्यात बिहारचे मुख्यमंत्री तथा जदयू पक्षाचे नेते नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. असे असले तरी सध्या ते इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असल्याचा दाव केला जात आहे. नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करणार का? असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्वच शंका-कुशंकांवर खुद्द नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाशी हातमिळवणी करण्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीश कुमार यांनी शक्यता फेटाळली

नितीश कुमार यांनी सोमवारी (२५ सप्टेंबर) एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना काही प्रश्न विचारले. यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पुन्हा एकदा सामील होणार का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना नितीश कुमार यांनी ‘काय फालतू प्रश्न आहे’ असे उत्तर दिले. नितीश कुमार यांच्या या विधानानंतर त्यांच्या बाजूला उभे असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना हसू आवरले नाही. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार इंडिया आघाडीतील धोरणांबाबत नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यांच्या या विधानानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी इंडिया आघाडीच्या भविष्यातील वाटचालीवरही भाष्य केले. नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे विधान जदयू पक्षाच्या काही नेत्यांकडून केले जाते. या विधानांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

नितीश कुमार यांच्यासाठी दरवाजे बंद- सुशीलकुमार मोदी

नितीश कुमार यांच्या या विधानानंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. “नितीश कुमार यांना आता राजकीय महत्त्व राहिलेले नाही. ते आपल्या मित्रपक्षांना एकही मत मिळवून देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी आता युती कोण करणार? त्यांच्यासाठी आता दरवाजे बंद झालेले आहेत. त्यांनी एनडीएमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त करत आमच्याकडे तशी विनंतीजरी केली, तरी ती मान्य केली जाणार नाही,” असे सुशीलकुमार मोदी यांनी स्पष्ट केले.

राजद पक्षाच्या राजकारणामुळे नितीश कुमार यांच्यात नाराजी?

दरम्यान, सध्या बिहारमध्ये महायुतीचे सरकार आहे. महायुतीत जदयू पक्षासह राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षाच्या एका नेत्याने हिंदू धर्मग्रंथाविषयी भाष्य केले. त्यांनी केलेल्या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झाला. यामुळेदेखील नितीश कुमार नाराज असल्याचे म्हटले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitish kumar reject possibility to join nda and bjp prd

First published on: 25-09-2023 at 22:32 IST
Next Story
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय सुलभ करणाऱ्या शशिकांत सेंथिल यांच्याकडे राजस्थानच्या प्रचाराची धुरा