नितीशकुमार यांनी भाजपाशी युती तोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. संयुक्त जनता दलाने (एसजेडी) युती तोडल्यानंर येथील सरकार कोसळले आणि नितीश कुमार यांनी काँग्रेस, डावे पक्ष तसेच राष्ट्रीय जनता दल (राजद) यांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना करत राज्यातही नव्या सरकारची स्थापना केली. बिहारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर नितीश कुमार यांच्या ‘महागठबंधन मॉडेल’ची सगळीकडे चर्चा होत आहे. भाजपाला थोपवण्यासाठी बिहारमधील हे मॉडेल राष्ट्रीय पातळीवर लागू होऊ शकेल का? अशी चर्चा केली जात आहे.

हेही वाचा >> त्रिपुरा: तृणमूल कॉंग्रेसला करावा लागतोय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाशी केलेली काडीमोड हा त्याचाच एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. महागठबंधन करून सरकार स्थापन केल्यानंतर त्यांनी हा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर राबवला जाऊ शकतो, याचे संकेत त्यांच्या पक्षाने दिले आहेत. ” केवळ हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्यूलर) तसेच माझा पक्ष मला युतीमधून बाहेर पडा असे म्हणत नव्हते. तर काँग्रेस, राजद, मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्ष, भारतीय कम्यूनिष्ट पक्ष, सीपीआय (एमएल) अशा पाच पक्षांचेदेखील तेच मत होते. आता महागठबंधनमध्ये एकूण सात पक्ष आहेत,” असे नितीशकुमार म्हणाले.

हेही वाचा >> स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: तिरंगा यात्रेवरून रंगले राजकारण

नितीशकुमार यांची राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय ठरण्याची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र त्यांनी आपली ही इच्छा अद्यपातरी सार्वजनिक केलेली नाही. असे असले तरी महागठबंधन सरकारची स्थापना झाल्यानंतर नितीशकुमार यांना वरील विधानाद्वारे भाजपाला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे विरोधकांना अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

हेही वाचा >> उत्तर प्रदेश: अखिलेश आणि मायावती तिरंगा मोहिमेत होणार सहभागी, देशभक्त नसल्याच्या भाजपाच्या प्रचाराला छेद देण्याचा प्रयत्न

जेडी(यू) चे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी इंडियन एक्स्प्रेसला महागठबंधनचा प्रयोग, राष्ट्रीय पातळीवरील या प्रयोगाची यशस्वीता तसेच या प्रयोगासाठी बिहारची भूमी कशी पोषक आहे यावर भाष्य केले. “१९६७ सालापासून बिहारची भूमी ही वेगवेळ्या युतीच्या राजकारणासाठी पोषक राहिलेली आहे. १९६७ साली काँग्रेसला थोपवण्यासाठी भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, डावे पक्ष सोबत आले होते. तसेच अटलबिहारी वाजपेयी आणि ज्योती बसू यांच्या काळातदेखील एक चांगले युती मॉडेल देशाने पाहिलेले आहे. मात्र सध्या भाजपाकडून प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. याच कारणामुळे येथील युतीच्या प्रयोगांना अडथळा निर्माण होत आहे,” असे त्यागी यांनी सांगितले.

हेही वाचा >> आपचं ‘मिशन गुजरात’! विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अरविंद केजरीवाल यांच्या उद्योजक, व्यापाऱ्यांसोबत बैठका

संयुक्त जनता दल आणि भाजपा यांच्यातील युतीवरही त्यागी यांनी भाष्य केले हे. “एनडीएचा भाग असताना सर्व पक्षांत समन्वय साधण्यासाठी एका समन्वय समितीची स्थापना करावी अशी मागणी आम्ही केली होती. मात्र आता बिहारमध्ये आम्ही महागठबंधनचे भाग आहोत. काँग्रेस, डावे पक्ष आणि जेडीयू यांच्यात एक नवी युती आकार घेत असून आम्हाला याचा आनंद आहे. नितीशकुमार यांनी सर्वांना मार्ग दाखवला आहे. सर्व पक्षांनी एकमेकांचा आदर केला तर हे महागठबंधन शाबूत राहू शकेल,” असेही त्यागी म्हणाले.

हेही वाचा >>नितीशकुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय ठरणार का? बिहामधील राजकीय उलथापालथ म्हणजे लोकसभा निवडणुकीची तयारी?

महागठबंधनचा प्रयोग राष्ट्रीय पातळीवरदेखील राबवला जाऊ शकतो, असे जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. “महागठबंधनची स्थापना करण्याआधी नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. आता सर्व सात पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसच्या पुढाकाराने हाच प्रयोग राष्ट्रीय पातळीवरदेखील राबवला जाऊ शकतो. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे पुरेसा वेळ आहे. मात्र भाजपाला थोपवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर युती करण्याच्या चर्चेला सुरुवात व्हायला हवी,” असे मत या वरिष्ठ नेत्याने मांडले.