सारण जिल्ह्यातील दलित नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत राम सुंदर दास यांचे मूळ गाव हे गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. गंगेच्या काठावर रोजंदारीवर काम करणारे भूषण पासवान हे त्यांच्या पक्क्या घराबाहेर बसून तळहातावर तंबाखू चोळत आहेत आणि एलजेपी खासदार, केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांनी पक्ष फोडल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांचे भाऊ दिवंगत रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग यांना वेठीस धरल्याबद्दल ते पशुपतीकुमार यांच्यावर नाराज आहेत.

“रामविलासजींइतके आमच्यासाठी कोणीही केले नाही. आमच्यासाठी चिराग पासवान हेच आमचे आहेत.ते ज्या पक्षासोबत जातील त्याला आम्ही मतदान करू”. भूषण पुढे म्हणाले की जरी पशुपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली असली तरी चिराग यांनी स्वतःचा पक्ष काढला आहे. तो पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशीही जोडलेला आहे.

या गावापासून जेमतेम दोन किलोमीटर पुढे बौरबनी गावाच्याजवळ रवीदासी समाजातील दलितांची एक छोटी वस्ती आहे. ज्यामध्ये अनेक झोपड्या आहेत. ही वस्ती अगदी गंगेच्या तीरावर वसलेली आहे. वर्षानुवर्षे स्थानिक ग्रामस्थांनी आपली जमीन आणि घरे नदीत गमावली आहेत आणि त्यांच्या जमिनीवरील हक्क परत मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

“मोदींकडे सर्वांसाठी आधार आहे. आमच्याकडे जमीन नाही हे  त्यांना माहीत नाही का? आम्हाला घरही मिळू शकत नाही. भाजपा सरकारच्या काळात आमच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. आम्हाला आशा आहे की ते आता होईल. आम्ही २०१९ मध्ये मोदींना मतदान केले होते. पण आता काय करायचे ते बघू,” असे २७ वर्षीय रविदासी रोजंदारीवर काम करणारे संतोष कुमार म्हणतात.

हाच जातीय विरोधाभास भाजपाने आता योग्य पद्धतीने हाताळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण आता त्यांच्यापुढे त्यांना आरजेडी आणि जेडीयुच्या मजबूत युतीचे आव्हान आहे. भाजपा समोर मोठं आव्हान उभं करण्याचा मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्न करण्याची शक्यता आहे.  भाजपाशी संबंध तोडल्यानंतर आणि आता महागठबंधन सरकारच्या प्रमुखपदी आठव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, जेडीयु सुप्रीमो नितीश यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या पुन्हा पंतप्रधानपदी निवड होण्यावर शंका व्यक्त केली.