पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन केले. या उदघाटनाच्या निमित्ताने सेन्गोल राजदंडाचा इतिहासावरून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. ब्रिटिशांनी सत्तेचे हस्तांतर म्हणून पंडीत नेहरुंकडे सेन्गोल सुपूर्द केला होता, असा दावा करण्यात आला होता. ‘सत्तांतराचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या हाती सेन्गोल दिल्याचा कोणताही पुरावा नाही. माऊंटबॅटन, राजाजी आणि पं. नेहरू यांच्याशी संबंधित कोणतेही दस्तऐवज भाजपचा दावा सिद्ध करत नाहीत.”, अशी भूमिका भाजपावर टीका करत असताना जयराम रमेश यांनी मांडली होती. त्यांच्या भूमिकेला पूरक असे वक्तव्य तिरुवदुथुराई अधिनम मठाधिपतींनी केले आहे. द हिंदू दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले, “भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत असताना लॉर्ड माऊंटबॅटन यांना सेन्गोल दिल्याची कोणतीही ठोस माहिती आढळत नाही.” मठाधिपतींच्या या मुलाखतीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली असून भाजपाची फेक फॅक्टरी यानिमित्ताने उघड झाल्याची टीका त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दि हिंदू दैनिकाने तिरुवदुथुराई अधिनम मठाचे २४ वे मठाधिपती श्री ला श्री अम्बलावन देसिका परमाचार्य स्वामिगल यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “लॉर्ड माऊंटबॅटन यांना स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सेन्गोल दिला गेला का? याची ठोस माहिती उपलब्ध नाही. काहीजण असे म्हणतात की त्यांना सेन्गोल दिला होता. त्यावेळचे लोकदेखील हे सांगतात.” मठाधिपतींनी केलेल्या दाव्यामुळे भाजपाने नेहरूंबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावरच बोट ठेवून आता जयराम रमेश यांनी टीका केली.

हे वाचा >> राजदंडावरून वाद तीव्र!

जयराम रमेश काय म्हणाले?

“ब्रिटिशांकडून भारताला सत्ता हस्तांतर करत असताना सत्तेचे प्रतिक म्हणून सेन्गोल प्रदान केले होते, असा दावा भाजपाने केला होता. मात्र मठाधिपतींच्या मुलाखतीमुळे भाजपाचा हा दावा कसा बिनबुडाचा आहे, हे आता उघड झाले आहे. १४ ऑगस्ट १९४७ मध्ये लॉर्ड माऊंटबॅटन किंवा सी. राजागोपालचारी यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना सेन्गोल दिला नव्हता, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.”, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, “२९ ऑगस्ट १९४७ रोजी द हिंदू या दैनिकातील पान क्र. १० वर याबाबतचा तपशील छापून आला होता. तिरुवदुथुराई अधिनम मठाच्यावतीने १४ ऑगस्ट १९४७ साली रात्री १० वाजता पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडे सोन्याचा राजदंड सुपूर्द केला होता.”

सेन्गोल माऊंटबॅटन यांना दिला होता का?

माऊंटबॅटन यांना सेन्गोल दिल्याच्या प्रश्नावर बोलत असताना अधिनमचे मठाधिपती म्हणाले, “माऊंटबॅटन यांना सेन्गोल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते भारताला सर्वाधिकार प्रदान करून जाणारच होते. त्यादिवाशी (१४ ऑगस्ट) नेहरू हेच महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते.” सेन्गोल हे ब्रिटिशांकडून भारताला सत्ता हस्तांतर करण्याचे प्रतिक म्हणून दिले गेले, असा दावा केंद्र सरकारने मे २०२३ मध्ये केला होता. केंद्र सरकारच्यावतीने तामिळ भाषेतील एक दस्तऐवज सादर केला होता, ज्यामध्ये अधिनम मठाकडून सदर सेन्गोल माऊंटबॅटन यांना दिल्याचा उल्लेख होता. माऊंटबॅटन यांना दिल्यानंतर पुन्हा तो गंगेच्या पाण्यात स्वच्छ करून नेहरूंच्या ताब्यात देण्यात आला, असे या दस्तऐवजामधील उताऱ्यात म्हटले होते.

दि हिंदू दैनिकाने २६ मे रोजी या दस्तऐवजाबाबत तिरुवदुथुराई अधिनम मठाला प्रश्न विचारला होता. त्यावर मठाधिपती म्हणाले की, सदर उतारा हा १९४७ आणि १९५० दरम्यान विशेष स्मृती अंकामध्ये छापला गेला असावा. हे दस्तऐवज मठात उपलब्ध आहेत. मात्र गुरुवारी द हिंदूने घेतलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा या दस्तऐवजाबाबत प्रश्न विचारला असता श्री ला श्री अम्बलावन देसिका परमाचार्य स्वामिगल म्हणाले की, त्या स्मृती अंकाचा दस्तऐवज आता सापडत नाही. आम्हाला माहीत नाही तो कुठे आहे. नेहरूंना सेन्गोल देऊन आता ७५ वर्ष लोटली आहेत. कुणीही इतिहासात जाऊन पुन्हा पडताळणी करण्याचा प्रयत्न केला नाही. २०२२ साली जेव्हा स्वातंत्र्यदिन साजरा केला, त्यानंतर आम्ही या इतिहासाची उजळणी करण्यासाठी एक विशेष स्मृती अंक काढला. त्याकाळात फारसे फोटो काढले जात नव्हते, त्यामुळे अतिशय कमी फोटो उपलब्ध आहेत. त्या फोटोंचा आम्ही शोध घेत आहोत.

याचा अर्थ सेन्गोल हे सत्ता हस्तांतर करण्याचे प्रतिक नव्हते का? असाही प्रश्न द हिंदूने आपल्या मुलाखतीमध्ये मठाधिपती यांना विचारला. त्यावर मठाधिपतींना हो असे उत्तर देताना सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळताना आपण पाहिलेले नाही. मठाने राजदंड १९४७ साली नेहरूंना दिला होता. त्यानंतर आता अनेक वर्ष लोटली आहेत. त्यानंतर आता राजदंडाबाबत माहिती बाहेर येत आहे. खरेतर याचा संदर्भ शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा होता. जेणेकरून गैरसमज पसरले नसते. अभ्यासक्रमात याचा समावेश असता तर याची खरी माहिती सर्वांना कळली असती.

केंद्र सरकारला सेन्गोलची माहिती कशी मिळाली?

मठाधिपतींनी द हिंदूला मुलाखतीमध्ये सांगितले की, सेन्गोल नेहरूंना दिला गेला, हे अनेकांना माहीत नाही. म्हणून आम्ही तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवि आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून याची माहिती दिली. त्यानंतर राज्यपाल रवि यांनी मठाला भेट देऊन राजदंडाबाबत माहिती घेतली. आम्ही सास्त्र विद्यापीठाच्या (SASTRA University) माध्यमातून ‘Thurasai Sceptre in India’s Independence’ हे पुस्तकदेखील प्रकाशित केले आहे. आम्हाला आनंद आहे की, नव्या संसद भवनाच्या इमारतीमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी पवित्र राजदंड स्थापित केला गेला आहे. तामिळनाडूतील शैव मठांच्या पुजाऱ्यांच्याहस्ते विधीपूर्वक पुजाअर्चा करून या राजदंडाची स्थापना झालेली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not clear if sengol was presented to lord mountbatten as transfer of power says thiruvavaduthurai adheenam head kvg
First published on: 09-06-2023 at 14:19 IST