दयानंद लिपारे

कोल्हापूर : भाजप हाच ध्यास आणि श्वास असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादांकडे पुन्हा मंत्रीपद आल्याने पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलवण्याची तसेच मराठा संघटन वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल. अपक्ष आमदारांचा पाठिंबा आणि भाजपात नव्याने प्रवेश केलेल्यांमुळे दादांचा मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचा प्रवास काहीसा सोपा झालेला असला तरी आधीच्या दोन्ही मंत्र्यांशी त्यांना तुल्यबळ राजकीय सामना करावा लागेल.

चंद्रकांत पाटील यांची कारकीर्द सुरू झाली ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून. तपाहून अधिक काळ ते अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता होते. गुजरातमध्ये अमित शहा अभाविपचे अध्यक्ष असताना चंद्रकांत पाटील तेथे संघटनेचे प्रभारी होते. यामुळे दोघांच्यात मैत्र जमले होते. त्याचा काही प्रमाणात का होईना राजकीय लाभ चंद्रकांत पाटील यांना होताना दिसतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा अमित शहा यांचा प्रवास उजळत राहिला. तर चंद्रकांत पाटीलही महाराष्ट्रात आपला राजकीय प्रवास उंचावत राहिले.

पदवीधर मतदारसंघात दोनदा विजय मिळवून ते विधान परिषदेत गेले. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन, वस्त्रोद्योग ही महत्त्वपूर्ण खाती आली. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे महसूल खात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रीपदांना न्याय देण्याचे काम त्यांनी पाच वर्षे केले.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडी एका क्लिकवर…

नवा प्रदेशाध्यक्ष

राज्यात शिंदे यांच्या बंडानंतर सत्तांतर घडून आले. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत असताना चंद्रकांतदादांकडे पुन्हा एकदा मंत्रीपद सोपवण्यात आले आहे. त्यांच्याकडे मंत्रीपद सोपवले जात असताना प्रदेश अध्यक्षपद अन्य कोणाकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री म्हणूनच पाटील यांना आव्हाने पेलावी लागणार आहेत.

मराठा समाज – आव्हान आणि संधी

राज्यात महाविकास आघाडी सरकार कार्यरत झाल्यानंतर भाजपातील चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व कायम राहिले. त्यांच्याकडे जुलै २०१९ मध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राज्यातील मराठा समाजाचे आंदोलन, मराठा आरक्षण मुद्दे तापलेले असताना त्याला हवा देण्याचे काम पाटील करीत राहिले. या मुद्द्यावरून त्यांनी सातत्याने आघाडी सरकारवर शरसंधान केले. आता मराठा चेहरा असलेले मंत्री म्हणून पाटील यांना मराठा समाजाच्या भावना, मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. हे प्रश्न योग्यप्रकारे मार्गी लावले तर अर्थातच त्याचा भाजपला आगामी निवडणुकांत राजकीय लाभ घेता येईल. भाजपचे मराठा संघटन वाढवण्यासाठीही त्यांना कार्यरत राहावे लागणार आहे.

कोल्हापुरात भाजपला बळकटी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपदाचा लाभ उठवत सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय, सहकार क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सहा, राष्ट्रवादी दोन असे आघाडीचे संख्याबळ प्रबळ राहिले. भाजपला दोन्ही जागा गमवाव्या लागल्याचे शल्य होते. प्रकाश आवाडे व विनय कोरे या दोन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे; ही पक्षाची जमेची बाजू ठरली. या दोघांनाही मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे धनंजय महाडिक यांचेही महत्त्व वाढले आहे. महाडिक परिवार भाजपच्या पाठीशी आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनीही संपर्क वाढवला आहे. अशातच चंद्रकांतदादांकडे पुन्हा मंत्रीपद आल्याने जिल्ह्यात भाजपला बळकटी मिळण्याची चिन्हे आहेत. पुढील काळात भाजप – शिंदे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात राजकीय संघर्ष तापत राहणार हे मात्र निश्चित.