scorecardresearch

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांनी केली मोदी सरकारची पाठराखण

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून राजकारण पेटले आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरून राजकारण पेटले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर उलटसुलट राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ज्या प्रमाणात भाव वाढले त्याप्रमाणत दर कमी झाले नाहीत अशी टीका महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली होती.

आता तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून जनतेला दिलासा दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक केले.राजस्थान, ओरिसा आणि तामिळनाडू सरकारने इंधनावरील राज्य शासनाचे कर कमी केले आहेत याचं अनुकरण जगन मोहन रेड्डी सरकारने करावे अशी मागणी केली आहे.

यासोबतच जनसेना पक्षाचे प्रमुख के पवन कल्याण यांनी जाहीर सभेतच पुढील निवडणुकांसाठी भाजप, टीडीपी आणि जनसेना यांच्यात युती करण्याबाबत सहमती दर्शवली. यावर भाजापाकडून कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.

पवन कल्याण यांनी वायएसआर सरकार विरोधातील पक्षांनी एकत्र येण्याची विनंती केली. सरकार विरोधी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पवन कल्याण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे ९.५० आणि ७ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आणल्या गेल्या आहेत, हे कौतुकास्पद आहे,” असे पवन कल्याण म्हणाले.

नायडू आणि पवन कल्याण या दोघांनीही राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर कपात केली आहे. “अनेक राज्यांनी केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि आंध्र प्रदेशनेही त्याचे पालन केले पाहिजे,” असे नायडू यांनी स्पष्ट केले. एकीकडे आंध्रप्रदेशातील लोकांना खराब रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे वाहने लवकर बिघडतात. ती दुरुस्त करण्याचा भूर्दंड लोकांना सहन करावा लागतोय त्यामुळे राज्य सरकारनी पेट्रोल आणि डिझेलवरील स्थानिक उपकर कमी करावेत अशी विनंती केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now naidu and pawan kalyan praise bjp for fuel price cut pkd