विरोधक एकत्र येत असल्यामुळे भाजपा पक्षाचे नेते निराश झाले असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलेली सीबीआयची नोटीस ही त्या नैराश्याचे प्रतिबिंब आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागच्या आठवड्यात नितीश कुमार यांनी राजधानी दिल्लीत जाऊन काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. नितीश कुमार म्हणाले की, आणखी काही पक्षांशी संवाद साधून माझ्यापुरती जबाबदारी मी पूर्ण करेन. त्यानंतर जागावाटप आणि एकत्रित प्रचार करण्याच्या रणनीतीबाबत सर्व एकत्र येऊन चर्चा करतील आणि निर्णय घेतील.

विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत असताना नितीश कुमार यांनी ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्या अटकळींना पुन्हा एकदा वाव दिला आहे. पटनाच्या जवळ असलेल्या बख्तियारपूर येथे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी बिहारमध्ये होत असलेल्या जातनिहाय सर्व्हेची माहिती दिली. यावेळी नितीश कुमार यांच्या समर्थकांनी मध्येच, “देश का पीएम कैसा हो, नितीश कुमार जैसा हो” अशा घोषणा दिल्या. यावर नितीश कुमार यांनी समर्थकांना थांबवून सांगितले, “अरे भाई, हम नही बनेंगे”.

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?

नितीश कुमार म्हणाले की, माझ्या समर्थकांना अशाप्रकारच्या घोषणा देण्यापासून मी शुक्रवारीदेखील थांबविले होते. “आम्ही (विरोधक) फक्त निवडणूक एकत्र लढवू इच्छितो. जेव्हा आम्ही एकत्र बसू तेव्हा सर्व बाबी स्पष्ट होतील. कोणता पक्ष कुठे आणि किती जागा लढविणार आणि एकत्रितपणे प्रचार कसा केला जाणार? यावर चर्चा होईल. लोकांचा जो काही कौल असेल तो आम्ही स्वीकारू. शेवटी लोकशाहीत लोकांचे मत अंतिम आहे.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.

हे वाचा >> “…तर भाजपाला १०० पेक्षाही कमी जागा मिळतील” बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं वक्तव्य

जातनिहाय सर्व्हेचा दुसरा आणि शेवटचा टप्पा बिहारमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व्हेमध्ये १७ प्रश्न विचारण्यात येत आहेत. ज्यामध्ये व्यक्तीला जात, धर्म, काम, उत्पन्नाचे मार्ग, राहण्याचे ठिकाणी आणि इतर माहिती विचारली जात आहे. नितीश कुमार यांनी बिहारपुरता जातनिहाय सर्व्हे घेऊन केंद्र सरकारवर एकप्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमध्ये होत असलेल्या सर्व्हेबाबत बोलताना नितीश कुमार यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांचा सर्वंकष आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे यामुळे सोपे होणार आहे.

मागच्या सात महिन्यांपासून विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न माझ्याकडून करण्यात येत आहेत. माझ्याकडे इतर काही पक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जातनिहाय सर्व्हेबाबत बोलताना त्यांनी पुन्हा सांगितले की, १५ मे रोजी हा सर्व्हे पूर्ण होईल. त्यानंतर सर्व डेटा एकत्र करण्याचे काम केले जाईल. सर्व्हेतून पुढे आलेली सांख्यिकी माहिती खूप मोठी असून त्याचे विश्लेषण करण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. या सर्व्हेचा अहवाल सर्वप्रथम बिहार विधानसभेत ठेवला जाईल. या सर्व्हेमध्ये जात, धर्म याशिवाय स्थलांतरीत झालेल्या मजुरांची देखील माहिती घेण्यात येत आहे. ज्यामुळे या माहितीचा वापर सरकारचे सर्वंकष धोरण ठरविण्यासाठी होऊ शकतो, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली.

हे ही वाचा >> ‘एक जागा, एक उमेदवार!’ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमारांचा नेमका फॉर्म्युला काय?

नितीश कुमार पुढे म्हणाले, मी केंद्र सरकारला देखील आवाहन केले की त्यांनी राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय जनगणना घ्यावी, पण केंद्राने माझे म्हणणे ऐकले नाही. काही राज्यांनी स्वतःहून सर्व्हे घेण्यास सुरुवात केली. जी चांगली बाब आहे. मी बिहारच्या लोकांना आवाहन करतो की, त्यांनी सर्व्हेदरम्यान आपली मूळ जात सांगावी. उपजात सांगू नये.