श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) काँग्रेसशी आघाडी केली असली तरी, निकालानंतर सत्तेसाठी ‘एनसी’ भाजपशी हातमिळवणी करेल ही उघडपणे होणारी चर्चा पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्या अडचणीत भर घालू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुच्छेद ३७०ची पुनर्स्थापना आणि राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय निवडणूक न लढवण्याचा निर्धार करणाऱ्या ओमर अब्दुल्लांनी घुमजाव केले आहे. आता ते कुटुंबाचा बालेकिल्ला असलेला गांदरबल तसेच, बडगाम या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत मतदारांनी ‘एनसी’ला कौल दिला तर ओमर अब्दुल्लांना मुख्यमंत्रीपदाचा दावा करता येऊ शकतो. हा विचार करून अखेर ओमर अब्दुल्ला निवडणुकीत उतरले असल्याचे सांगितले जाते. बडगाममध्ये ‘पीडीपी’चे नेते आगा मुन्तझीर हे ओमर यांच्या विरोधात लढत असून ते ‘हुरियत कॉन्फरन्स’चे नेते आगा हसन यांचे पुत्र आहेत. गांदरबलमध्ये ओमर यांना ‘पीडीपी’चे तगडे नेते बशीर अहमद मीर यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांमध्ये ओमर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा >>> CM Siddaramaiah : कर्नाटकात का होतेय मुख्यमंत्री बदलाची चर्चा? सिद्धरामय्यांशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या ‘या’ नेत्यांची CM पदासाठी चर्चा!

काश्मीर खोऱ्यामध्ये ‘एनसी’ व ‘पीडीपी’ हेच दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत. ‘पीडीपी’वरील नाराजीमुळे ‘एनसी’ला लोकांचे झुकते माप मिळू लागले आहे. अखेरपर्यंत ‘एनसी’ला मतदारांचा पाठिंबा कायम राहिला तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक जागा ‘एनसी’ला मिळू शकतील. पण, ‘एनसी’ भाजपबरोबर सत्ता स्थापन करेल ही चर्चा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू लागली आहे. भाजपशी जवळीक असलेल्या काही पक्षांचे उमेदवार व नेते उघडपणे ‘एनसी’-भाजपच्या युतीचा दावा करत आहेत.

ओमर यांचे स्पष्टीकरण

‘कश्मिरियत’च्या मुद्द्यावरून ‘एनसी’ भाजपविरोधात आक्रमक झालेली असताना पक्षाविरोधातील हा अपप्रचार ‘एनसी’साठी अचडचणीचा ठरू शकतो, हे लक्षात घेऊन ओमर अब्दुल्लांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. ‘आम्हाला भाजपबरोबर जायचे नाही म्हणून आम्ही काँग्रेसशी आघाडी केली आहे. आम्हाला काही जागा सोडाव्या लागल्या तरीही आम्ही काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला’, असे ओमर अब्दुल्लांनी जाहीरपणे सांगितले. ‘२०१४ मध्ये भाजपबरोबर जाणाऱ्या ‘पीडीपी’ची किती दुरवस्था झाली हे सगळ्यांना माहीत आहे. मग, आम्ही कशासाठी स्वत:चे नुकसान करून घेऊ’, असा प्रतिप्रश्न ‘एनसी’च्या प्रवक्त्या इफ्रा जान यांनी केला. पण, ‘एनसी’चे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेले आरोपपत्र उच्च न्यायालयाने रद्द केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घडामोडींमुळे भाजपकडून ‘एनसी’ला चुचकारले जात असल्याचे मानले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सशी आघाडी करण्याआधी ‘पीडीपी’शी बोलणी सुरू केली होती. त्यामुळे ‘एनसी’ला काँग्रेसशी आघाडी करणे भाग पडले असे सांगितले जाते. काँग्रेसशी प्राथमिक चर्चा झाल्याची कबुली ‘पीडीपी’च्या एका नेत्याने दिली. ‘एनसी’ला प्राधान्य दिल्यामुळे काँग्रेसने ‘पीडीपी’शी युती केली नसल्याचे बोलले जाते. विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले तर ‘एनसी’ व काँग्रेस यांचा सत्तास्थापनेचा मार्ग निर्धोक असेल. अन्यथा, ‘एनसी’ काँग्रेससह विरोधी बाकांवर बसेल का, या प्रश्नावर, ‘केंद्र सरकारशी जुळवून घेऊन राहावे लागते’, असे मार्मिक प्रत्युत्तर ‘एनसी’च्या अनंतनागमधील एका नेत्याने दिले. (क्रमश:)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omar abdullah in trouble over alliance negotiations with bjp print politics news zws
Show comments