भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अल्पसंख्याक लोकांना लक्ष्य केले जाते असा आरोप विरोधक भाजपावर नेहमी करतात. दरम्यान आता भाजपाने प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोचण्यासाठी आणि सरकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी नवी योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेची आठ वर्षे पूर्ण करत आहे. यावेळी सरकार अल्पसंख्याक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तसे आदेशच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी सर्व राज्यातील भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाला दिले आहेत. प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक विभागाला सहा ते आठ जून या कालावधीत अल्पसंख्याक समाजाला पक्षाशी जोडण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यास सांगण्यात आले आहे. यावर भाजपाच्या केंद्रीय अल्पसंख्याक विभागाचे लक्ष असणार आहे.

केंद्रात भाजपा सत्तेची आठ वर्षे पूर्ण करत आहे. हा सत्तेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना आणि सरकारने केलेल्या कामांची माहिती देणारी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्या पुस्तिकेत केंद्र सरकारने अल्पसंख्याक समुदायासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्या समुदायापर्यंत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठ वर्षे: सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण या नावाची २६ पानांची पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेत ३० मे ते १५ जून या कालावधीत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेली कामे आणि कल्याणकारी योजना लोकांपर्यत पोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजपा सरकारने गेल्या आठ वर्षांत सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना विविध स्तरांतील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना १० दिवसांत ७५ तास देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी, महिला, अनुसुचीत जाती, ओबीसी, आदिवासी, द्रारिद्र रेषेखालील कुटुंब यांच्यासाठी हे १० दिवस विभागले जाणार आहेत. ज्यांनी करोना काळात आपल्या भागात नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम राबवली आहे त्यांचा पक्ष नेतृत्वातर्फे सन्मान करण्यात येणार असल्याचेही या पुस्तिकेत म्हटले आहे. या सोबतच आठ वर्षांतील सरकारची कामगिरी सांगणारी गाणी, वेबसाईट, पॉकीट डायरी लॉंच केली जाणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांमध्ये कामांची जाहिरात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खास हॅशटॅगसुद्धा बनवण्यात आला आहे. नेत्यांना ‘विकास तीर्थ यात्रा’ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकंदरीतच आठ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सक्रीय रित्या सुरू केलीय असे म्हणावे लागेल. कारण या संपूर्ण कार्यक्रमात भाजपाच्या अजेंड्यावर असलेला प्रमुख विषय म्हणजे अल्पसंख्याक समुदाय. या समुदायाला पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्टपणे जाणवतं