सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : १२ एप्रिल २०१६ रोजी मिरजेहून पाण्याने भरलेली रेल्वे लातूरकरांची तहान भागविण्यासाठी निघाली, त्यानंतर लातूर महापालिकेत भाजपचे ३६ नगरसेवक निवडून आले. ‘रेल्वे आली धावुनी..’ हा तेव्हाचा राजकीय खेळ आता नव्या रूपात लोकसभेसाठी पुन्हा खेळला जात आहे. गेली सहा वर्षे रडत- रखडत सुरू असणाऱ्या रेल्वे कोचच्या कारखान्यातून पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत १६०० कोच निर्माण केले जातील. या प्रत्येक कोचची किंमत आठ ते नऊ कोटी रुपये असेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी औरंगाबाद येथे जाहीर केले. यामुळे रेल्वेचे डब्बेच लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे इंजिन असेल अशी रचना केली जात आहे.

हेही वाचा… राज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक

वंदे- भारत योजने अंतर्गत गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावलेल्या रेल्वेनिर्माण बांधणीत पूर्वी असणारा तीन ते चार मिलिमीटरचा फरक आता केवळ काही मायक्रॉनपर्यंत खाली आणला गेला. अशा अत्याधुनिक रेल्वेंची निर्यात करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहे. त्या रेल्वेचे कोच बनविण्याचे काम लातूर येथून होईल. त्यासाठी लातूर येथील कारखान्यातही काही बदल केले जात आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याच्या योजनांच्या आधारे राजकीय पेरणीस आता सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी नोव्हेंबरअखेर साखळी उत्पादनास सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पात लातूर जिल्ह्यातून ५० हजाराहून अधिक रोजगार उपलब्ध होईल, असा दावा पूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर रखडलेल्या प्रकल्पाची चर्चा मतदारांमध्ये हाेऊ लागली होती. पण आता पुन्हा त्याला गती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे उत्पादन सुरू झाले तर ते इंजिन मतदारांना आकर्षित करेल असा भाजपाचा होरा आहे. त्यामुळेच रेल्वे कोच निर्माण कार्याची घोषणा होताच निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्याचे श्रेय घेण्यासाठी पत्रकही आवर्जून प्रसिद्धीस दिले. रेल्वे कोच निर्माण कार्यात मराठवाड्यातील उद्योजकांनाही संधी मिळणार असल्याने रेल्वेमुळे अर्थगती वाढेल असा दावाही करण्यात येत आहे.

हेही वाचा… शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार

लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार विजयी झाले. हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती- जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. २०१४ मध्ये सुनील गायकवाड आणि सध्या सुधाकर शृंगारे भाजपचे खासदार आहेत. सलग तिसऱ्यांदा विजय मिळविण्यासाठी रेल्वे इंजिन धावून येईल असा भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again railway issue will be one of major factor in latur lok sabha election print politics news asj
First published on: 04-10-2022 at 09:33 IST