राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या पाटणा आणि दिल्ली येथील निवासस्थानी सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. या धाडींमुळे राष्ट्रीय जनता दलात अस्वस्थता पसरली आहे. सीबीआयने ने टाकलेल्या धाडी म्हणजे राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप पक्षातर्फे करण्यात आला आहे. सीबीआयने २०१७ मध्ये झालेल्या ‘नोकरीसाठी जमीन’ या आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात या धाडी टाकल्या आहेत.

राष्ट्रीय जनता दल हा ७६ आमदार असलेला बिहार विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. बिहारमध्ये भाजपाचे ७७ आमदार आहेत. नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष ४५ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. “बिहारमध्ये आमची ताकद मोठी असल्यामुळेच भाजपा आम्हाला टार्गेट करत आहे” अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी दिली. 

लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याती पाच प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्या पक्षातील मोठे नेते या प्रकरणात अडकले आहेत. सध्या लालूप्रसाद यादव हे जामिनावर बाहेर आहेत. चारा घोटाळ्याच्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यावर खटला सुरू असून त्यांनी अर्धवट शिक्षा भोगली आहे. बांका भागलपूर कोषागरातून बेकायदेशीरपणे पैसे काढल्याबाबत त्यांच्यावर आणखी एक खटला प्रलंबित आहे. 

लालूप्रसाद यादव यांना २०१३ मध्ये पहिल्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणात दोषी ठरवून ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर त्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांच्यावर ११ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे. 

देवघर कोषागारातून ८० लाख रुपयांहुन अधिक रक्कम बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी २३डिसेंबर २०१७ रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली.२४ जानेवारी २०१८ रोजी लालूप्रसाद यादव यांना तिसऱ्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. चौथ्या प्रकरणात ४ मार्च २०१८ रोजी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर डोरांडा कोषागारातील गैरव्यवहार प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.