one more setback to Shiv Sena in Kolhapur in coming days | Loksatta

कोल्हापुरात शिवसेनेला आता तिसरा धक्का… ?

डॉ. सुजित मिणचेकर व चंद्रदीप नरके हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात ठळकपणे दिसले.

कोल्हापुरात शिवसेनेला आता तिसरा धक्का… ?

दयानंद लिपारे

कोल्हापूर : मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या अराजकीय दौऱ्यात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या माजी आमदारांमुळे कोल्हापुरात आता शिवसेनेला तिसरा धक्का लवकरच बसणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या माजी आमदारांनी या अराजकीय दौऱ्यात शिंदे -भाजपशी सलगी दाखविल्याने आगामी काळात ही सलगी अधिक दृढ होईल आणि त्यामुळेच कोल्हापुरात शिवसेनेला तिसरा हादरा बसेल, या चर्चेने आता वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नऊ वर्षांपूर्वी शिवसेना प्रथमस्थानी होती. जिल्ह्यात एखाद- दुसरा आमदार निवडून येत असताना ही संख्या २०१४ सालच्या निवडणुकीत थेट सहावर गेली. पण, गेल्या विधानसभा निवडणुकीत ती पुन्हा एकवर घसरली. त्यास भाजप- जनसुराज्य यांची छुपी आघाडी, शिवसेना उमेदवार आणि स्थानिक पदाधिकारी, जिल्हाप्रमुख यांच्यातील वाद कारणीभूत ठरले होते. पराभूत आमदारांनी पक्षविरोधी कारवायांविरोधात वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेण्याऐवजी पक्षाने कानाडोळा केला, याची खदखद लपून राहिली नव्हती.

एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा घेतल्यानंतर शिवसेनेतून होणाऱ्या अन्यायावर जिल्ह्यातही बोलले जाऊ लागले. यातूनच पहिल्या टप्प्यात माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ,आमदार प्रकाश आबिटकर,माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिंदे यांना समर्थन दिले. हा कोल्हापुरातील शिवसेनेला पहिला धक्का होता. पाठोपाठ कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांनीही शिंदे गटाच्या छावणीत जाणे पसंत केले. ही घटना शिवसेनेला दुसरा मोठा धक्का देणारी होती.

हेही वाचा… विरोधी खासदारांच्या निलंबनातून केंद्राचा अतिकठोर इशारा

शिंदेंना वाढते पाठबळ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले होते. हा अराजकीय दौरा होता. मात्र त्यातील काही घटना नव्याने होत असलेली राजकीय सलगी दर्शविणाऱ्या होत्या. शिवसेनेच्या चार माजी आमदारांची भूमिका शिंदे प्रकरणात तळ्यात मळ्यात राहिली होती. डॉ. सुजित मिणचेकर व चंद्रदीप नरके हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात ठळकपणे दिसले. या सहभागाबद्दल त्यांनी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांसमवेत असल्याचे माध्यमांना सांगितले. माजी आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात उपस्थिती लावलीच पाहिजे, असा कोणताही राजशिष्टाचाराचा संकेत नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले, त्याच दिवशी कोल्हापुरात शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता. त्याकडे चारही माजी आमदारांनी पाठ फिरवली होती. पैकी दोघांनी तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होणे पसंत केले. यामागे राजकीय समीकरणे वेगळी असल्याची चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा… गडकरींच्या ‘त्या’ विधानाचा रोख कोणाकडे? राजकीय वर्तुळात चर्चा…

तिसरा धक्का

शिंदे -फडणवीस यांची युती राजकीय पटलावर भक्कम दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याशी जमवून घेणे हे निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने सोपे असल्याची भावना शिवसेनेतील नाराजांमध्ये आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात भाजपकडे तूर्तास सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे शिंदे -भाजपशी जवळीक साधली तर या मतदारसंघाची उमेदवारी मिणचेकर यांच्याकडे जाऊ शकते. अशीच परिस्थिती करवीरमध्ये ही आहे. येथेही शिंदे -भाजप यांच्याकडे प्रबळ उमेदवाराची वानवा आहे. ही कसर चंद्रदीप नरके यांच्यामुळे भरून निघू शकते. याच विचारातून मिणचेकर- नरके यांची शिंदे -भाजप सरकारशी सलगी वाढताना दिसत आहे. यापूर्वीही अनेक शिवसैनिकांनी आपण ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा केला नंतर मात्र त्यांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. कोल्हापुरात दोन्ही खासदारांनी हीच वाट चोखाळलेली होती. त्यामुळे दोन्ही माजी आमदारांनी उद्या शिवसेनेला `जय महाराष्ट्र’ केला तर ते नवल ठरणार नाही, अशी चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. मात्र तसे झाल्यास हा शिवसेेनेसाठी तिसरा मोठा धक्का ठरेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-07-2022 at 18:57 IST
Next Story
विरोधी खासदारांच्या निलंबनातून केंद्राचा अतिकठोर इशारा