Shiv Sena Rebel MPs: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभेत एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी फक्त तीनच खासदारांनी काल (१८ जून) दिल्लीत झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत उपस्थिती दर्शवली. त्यामुळे इतर सहा खासदार वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजच्या बैठकीला संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार अनुपस्थित राहीले. शिवसेनेला २०२२ मध्ये खिंडार पडल्यानंतर याच खासदारांनी उद्धव ठाकरे यांना भाजपाविरोधात लढण्यासाठी भक्कम पाठिंबा दिला होता. आता हेच खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय जाधव
संजय जाधव हे परभणी लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते शिवसेना व उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत मानले जातात. संजय जाधव यांची बंडखोरी उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. कारण जून २०२२ मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. त्यावेळी अनेक खासदार शिंदेंच्या बंडात सहभागी झाले. परंतु, संजय जाधव यांनी ठाकरेंची शिवसेना सोडली नाही. मराठवाड्याच्या राजकारणात त्यांना बंडू जाधव म्हणून ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंतची त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द फक्त शिवसेनेतच घालवली आहे. पक्ष न बदलता सुरूवातीपासून शिवसेनेत राहिलेल्या काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकी बंडू उर्फ संजय जाधव एक आहेत.

मराठवाड्यात शिवसेना विस्तारत असताना १९९० मध्ये बंडू जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेतून पहिल्यांदा परभणी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही ते लोकसभेवर निवडून गेले. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. २०२२ मध्ये शिंदेंच्या बंडानंतर परभणीतील शिवसेना उद्धव ठाकरेंबरोबर होती.
संजय जाधव यांनी मागील काही वर्षांपासून स्वत:चा राजकीय पाया तयार केला आहे. त्यांना परभणीच्या ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा आहे. परभणीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात संजय जाधव म्हणाले होते, “आज तुमच्यासोबत आहे, उद्या काय सांगता येत नाही.” तेव्हापासून ते पक्ष बदलणार अशा चर्चा रंगल्या होत्या. स्थानिक पातळीवर ठाकरेंच्या शिवसेनेत नुकतेच फेरबदल करण्यात आले. त्यावरून जाधव यांच्यासह पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी होती.
संजय देशमुख
संजय देशमुख (५८) हे पहिल्यांदा खासदार झाले असून ते यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीला संजय देशमुख अनुपस्थित राहिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी केंद्रीय मंत्री आणि शिंदेसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतली होती. तेव्हापासून संजय देशमुख बंडात सहभागी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संजय देशमुख यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा पक्ष बदलले आहेत. यवतमाळच्या राजकारणात त्यांना संजय भाऊ म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरूवात बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून केली होती. १९९८ मध्ये संजय देशमुख यांनी यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद भूषवले होते.

१९९९ मध्ये शिवसेनेतील नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये ते क्रीडा राज्यमंत्री होते.
संजय देशमुख यांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काढली. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा सोडल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणुका लढवल्या. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना लोकसभेचे तिकिट दिले. संजय देशमुख यांनी यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव केला. ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. संजय देशमुख हे एका शेतकरी कुटुंबातील आहेत. ते दिग्रसमधील चिंचोली या गावचे आहेत. दिग्रस – धारवा पट्ट्यात शैक्षणिक संस्था आणि स्थानिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी प्रभाव पाडला आहे.
नागेश पाटील आष्टीकर
नागेश पाटील आष्टीकर हे २०२४ च्या हिंगोली लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत ते शिवसेनेबरोबरच राहिले आहेत. त्यांनी पक्षांतर केले नाही. नागेश पाटील आष्टीकर हे नांदेड जिल्ह्यातील हादगावचे आहेत. २००९ मध्ये ते हादगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. २०१३ मध्ये शिवसेनेने आष्टीकर यांना हादगाव विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. त्यावेळी ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. २०१५ मध्ये नागेश पाटील आष्टीकर हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, परंतु, त्यानंतरही ते पक्षात सक्रिय होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आष्टीकर यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले होते. लोकसभा निवडणुकीत आष्टीकर विजयी झाले. त्यांचा एक लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय झाला होता. या वर्षाच्या सुरूवातीला केंद्रीय मंत्री व शिंदेसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत ठाकरेंच्या खासदारांबरोबर मेजवानीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात आष्टीकर सहभागी झाले होते. तेव्हापासून त्यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.

सोमवारी आष्टीकर यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर होतो त्यामुळे पक्ष बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी रविवारी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला आष्टीकर गैरहजर होते. सध्या सुरू असलेल्या नांदेड विधान परिषद निवडणुकीत व्यस्त होतो, याबाबत उद्धव ठाकरेंना कळवले होते, असे ते म्हणाले. मी शिवसेना सोडणार अशा अफवा मागील दोन वर्षांपासून पसरवल्या जात आहेत, असे आष्टीकर म्हणाले होते.
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (७४) हे अहिल्यानगर मधील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेकदा पक्ष बदलले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

वाकचौरे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक वरिष्ठ नेते आहेत. २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ते शिवसेनेकडून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी आरपीआयच्या रामदास आठवले यांचा पराभव केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वाकचौरे यांचे शिवसेना नेतृत्वाशी संबंध बिघडले होते. त्यांना शिर्डीतून पुन्हा तिकीट मिळण्याबाबत शंका निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून नंतर काही वर्ष ते भाजपा नेत्यांच्या संपर्कात होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना शिर्डीत एका प्रभावी नेत्याच्या शोधात असताना वाकचौरे यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. वाकचौरे यांनी शिंदेसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता.
संजय दिना पाटील
संजय दिना पाटील (५७) हे दुसऱ्यांदा ईशान्य मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करणार असल्याच्या वृत्ताचे खंडन करणाऱ्या आघाडीच्या खासदारांपैकी ते एक आहेत. दरम्यान, संजय दिना पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेतून केलेली नाही. २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
पाटील हे मुंबईतील राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील दिना बामा पाटील हे मुलुंडमधून काँग्रेसचे आमदार होते. तसेच ते भांडुप-मुलुंड पट्ट्यात एक नावाजलेले राजकारणी होते. संजय दिना पाटील यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. २००४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा भांडूप विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. त्यात ते विजयी झाले. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने संजय दिना पाटील यांना मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले. त्यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुरुदास कामत यांचा पराभव करत ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना मुंबई ईशान्येतून उमेदवारी दिली, त्यांनी भाजपचे मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. पाटील यांचे कुटुंबही मुंबईतील राजकारणात सक्रिय आहे. त्यांच्या पत्नी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या नगरसेविका आहेत.
ओमराजे निंबाळकर
ओमराजे निंबाळकर (४२) हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ओमराजे निंबाळकर यांनी त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द शिवसेनेतच घालवली आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही. धाराशिव जिल्ह्यातील राजकीय कुटुंबातून ओमराजे येतात. ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकरांचे पूत्र आहेत. २००६ मध्ये पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते पद्मसिंह पाटील हे त्यांचे काका आहेत, तर भाजपा नेते राणाजगजितसिंह पाटील हे त्यांचे बंधू आहेत.
२००९ मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा लढवली होती. त्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये शिवसेनेने ओमराजेंना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी ओमराजे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर २०२४ मध्ये ते दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. ओमराजे हे शिवसेना ठाकरे गटातील तरूण खासदार मानले जातात. ते उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.

बुधवारी ओमराजे पुण्याहून दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त झळकल्यानंतर ओमराजेही बंडखोरांच्या गटात सहभागी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरी उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. कारण ते पक्षातील एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात.
