Eknath Shinde Political Power : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदारांनी बंड पुकारत संसदेत आपला वेगळा गट स्थापन केल्याचे समजते. या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. खासदारांचा हा गट फोडण्यासाठी राबवण्यात आलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावाही शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान बंडखोर गटाकडून नाशिक खासदार राजाभाऊ वाजे यांनाही आपल्या गोटात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी मात्र वाजे यांनी ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीत खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते.
बंडखोर खासदार शिंदेसेनेत विलीन होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील बंडखोर खासदार २१ किंवा २२ जून रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपल्या गटाचे शिंदेसेनेत विलीनीकरणाचा अधिकृत दावा करण्याची शक्यता आहे. लोकसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्र श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते आहेत. या विलीनीकरणाला उशीर होण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे- धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी औपचारिक बैठकीत सामील होण्यासाठी आणखी काही वेळ मागितला आहे. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल २० जून रोजी लागण्याची शक्यता असून, ते याच निकालाची वाट पाहत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच आपण शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
खासदारांनी बंडखोरीचे काय कारण सांगितले?
दरम्यान, बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यासाठी पत्राचा मसुदा तयार केल्याचे समजते. या पत्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत पक्षातील वाढत्या नाराजीमुळे आपण वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे अनेक वरिष्ठ नेत्यांना पक्ष सोडावा लागल्याच्या घटनांचाही या पत्रात उल्लेख करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असताना एकसंध शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. २००५ मध्ये नारायण राणे यांनी पक्ष सोडला. त्यानंतर २००६ मध्ये राज ठाकरे यांनी वेगळी वाट धरली, तर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदार आणि खासदारांसह बंड पुकारले होते, याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तेही लवकरच आपल्या गोटात सामील होणार असल्याचा दावा बंडखोर खासदारांकडून केला जात आहे. तसे झाल्यास लोकसभेत या गटातील खासदारांचे संख्याबळ सात इतके होईल.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार होणार कारवाई?
ठाकरे गटाकडे नऊ खासदार असल्यामुळे पक्षातील बंदी कायद्यापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमतापेक्षा (सहा खासदार) हा आकडा जास्त असेल. संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी विधिमंडळ किंवा संसदीय पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांचे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण होणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असते. यादरम्यान हे विलीनीकरण अधिकृतपणे मान्य झाल्यास लोकसभेतील शिंदेसेनेचे एकूण संख्याबळ १३ किंवा १४ इतके होईल. त्यामुळे तेलगु देसम पार्टी (१६ खासदार) आणि जनता दल युनायटेड (१२ खासदार) यांच्यापाठोपाठ शिंदेसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) तिसरा मोठा घटकपक्ष ठरेल. तसेच, तृणमूल काँग्रेसच्या २२ बंडखोर खासदारांनी प्रवेश केलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) या पक्षालाही अधिकृत मान्यता मिळाल्यास तो पक्ष एनडीएमधील सर्वात मोठा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंचे राजकीय वजन कसे वाढले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेवरून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदार फुटीची ही राजकीय घडामोड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचे विलीनीकरण यशस्वी झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे लोकसभेतील संख्याबळ सध्याच्या २९३ वरून आणखी वाढेल. त्यातच तृणमूल काँग्रेसच्या २२ बंडखोर खासदारांच्या नव्या पक्षाला मान्यता मिळाल्यास एनडीएचे संख्याबळ ३१५ पर्यंत जाऊ शकते. शिंदेसेनेच्या नेत्यांच्या मते, या घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या वाढत्या वर्चस्वानंतरही आघाडीतील महत्त्वाचे रणनीतीकार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होईल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने १३२ जागा जिंकून मोठे यश मिळवल्यानंतर शिंदे यांचे राजकीय वजन कमी झाल्याची चर्चा होती. मात्र, या नव्या घडामोडींमुळे त्यांना पुन्हा राजकीय बळ मिळू शकते.
भाजपाची धडपड नेमकी कशासाठी?
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, एप्रिल महिन्यात लोकसभेत संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक मंजूर करण्यात एनडीएला अपयश आल्यामुळे संसदेतील संख्याबळ वाढविण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित असलेले हे विधेयक आगामी संसदीय अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारला लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. शिंदेसेनेचे हे वाढलेले बळ राज्यातील ‘महायुती’ आघाडीतील अंतर्गत समीकरणे देखील बदलू शकते. शिंदेसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, विधानसभा निवडणुकीत भाजपा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर अनेकांनी एकनाथ शिंदे हे राजकीयदृष्ट्या संपल्याचे गृहीत धरले होते; पण जेव्हा लोकांना वाटते की लढाई संपली आहे, तेव्हा गेम कसा फिरवायचा हे शिंदेंनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार फोडून त्यांनी एनडीएमध्ये आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
