Maha Vikas Aghadi Rajya Sabha seat महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी महायुती सहा जागा सहज जिंकण्याच्या स्थितीत आहे; मात्र उर्वरित एका जागेसाठी विरोधी पक्षांच्या ‘महाविकास आघाडी’मध्ये (मविआ) रस्सीखेच सुरू झाली आहे. मतांची जुळवाजुळव केल्यास ही जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडू शकते. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस हे तिन्ही मित्रपक्ष या जागेसाठी आग्रही आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आपले अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे, शिवसेना आपल्या विधिमंडळातील संख्याबळाच्या जोरावर दावा सांगत आहे, तर काँग्रेस राजकीय गणिते विचारात घेऊन या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे नक्की कोणाला राज्यसभेवर पाठवले जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. मित्रपक्षांची भूमिका काय? जागांचे गणित काय? जाणून घेऊयात…

एका जागेवरून वाद

२८८ सदस्यांच्या विधानसभेत भाजपाकडे १३१, शिवसेनेकडे ५७ व राष्ट्रवादीकडे ४० आमदार आहेत. या बळावर सत्ताधारी युती सहा जागा बिनविरोध जिंकू शकते. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- २०, काँग्रेस- १६ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)- १०, असे प्रत्येक पक्षाकडील आमदारांचे संख्याबळ आहे. या तिघांनी एकजूट दाखवली, तर एका जागेसाठी आवश्यक असलेला आकडा महाविकास साघाडी सहज पार करू शकते. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी ३७ मतांची गरज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय?

एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शरद पवार यांचा समावेश आहे. त्यांची कन्या व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सांगितले की, पवारसाहेब पुन्हा वरिष्ठ सभागृहात असावेत, अशी पक्ष आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्या म्हणाल्या, “आमचे नेते जयंत पाटील व शशिकांत शिंदे हे उद्धवजी आणि काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करतील. गरज पडल्यास मी स्वतः दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलेल. मला खात्री आहे की, आम्ही एकमताने निर्णय घेऊ.”

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)मधील नेत्यांनी संकेत दिले आहेत की, अंतर्गत चर्चा पूर्ण झाल्यावर मित्रपक्षांशी औपचारिक बोलणी केली जातील. शरद पवार यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु त्यांच्या प्रकृतीमुळे उमेदवारीच्या निर्णयाला विलंब होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पवारांना पुण्यातील रुग्णालयातून बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या जागांचे गणित

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेत जाण्याची इच्छा गांभीर्याने विचारात घेण्यासारखी आहे. मात्र, पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संख्याबळाचा विचार केल्यास ही जागा आमच्याच पक्षाची आहे, असा दावा केला. ते म्हणाले, “वरिष्ठ सभागृहातील शिवसेनेच्या दोन्ही जागा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. २०२० मध्ये आम्ही आमची एक जागा राष्ट्रवादीला दिली होती. त्यामुळे यावेळी ही जागा आम्हाला मिळायला हवी,” असे ठाकरे म्हणाले.

संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी या दोन्ही खासदारांनी सभागृहात महत्त्वाचे मुद्दे सातत्याने मांडले असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी, राज्यसभा निवडणूक म्हणजे संविधान वाचवणे, तसेच देशाचे अदानीकरण, धारावीची विक्री आणि मुंबई-महाराष्ट्र विकण्याचे प्रयत्न यांच्याविरुद्धची लढाई असल्याचे म्हटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाच वर्षांपासून ‘इंडिया’ आघाडीत सातत्याने सक्रिय राहिली आहे. “या सातत्यामुळे आमचा दावा अधिक मजबूत आहे,” असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील तडजोडीची शक्यता कमी झाली आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची टर्म मे महिन्यात संपत असल्याने, त्यांनीच राज्यसभेत जाण्याचा विचार करावा, असाही शिवसेनेच्या एका गटाचा सूर आहे. अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव मांडला गेला नसला तरी संसदेत आपला प्रभाव टिकवून ठेवण्याचा शिवसेनेचा मानस यातून स्पष्ट होतो.

काँग्रेसची भूमिका काय?

काँग्रेसने सावध भूमिका घेतली असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, सामूहिक निर्णय घेण्यापूर्वी मित्रपक्षांनी आपापली राजकीय भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, काँग्रेस नेते राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये भविष्यात पुन्हा मनोमिलन होण्याची भीती व्यक्त करत आहेत. जर भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आले, तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेला राज्यसभा खासदार तिकडे गेल्यास पक्षाची मोठी नाचक्की होऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ शकते; परंतु त्या बदल्यात विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांसाठी तडजोडीची मागणी करू शकते. एकूणच राज्यसभेची ही एक जागा आता मोठ्या राजकीय देवाणघेवाणीचा भाग ठरत आहे. सपकाळ यांनी म्हटले की, मित्रपक्षांकडून स्पष्टता मिळाल्याशिवाय काँग्रेस घाई करणार नाही. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होऊन सविस्तर चर्चा केली जाईल. दुसरीकडे, भाजपाने विरोधकांमधील या स्पर्धेवर टीका केली आहे.