scorecardresearch

तिसरी आघाडी अटळ; काँग्रेसला साथ देण्यास अनेक पक्षांचा विरोध

तिसऱ्या आघाडीचा भाजपला फायदा होतो हे काँग्रेस नेतृत्वाचे विश्लेषण बरोबर असले तरी भाजप विरोधी सारे पक्ष काँग्रेसबरोबर लढण्यास तयार नाहीत याचाही काँग्रेसला विचार करावा लागेल.

Opposition of many parties to support Congress against BJP
भाजपाविरोधात काँग्रेसला साथ देण्यास अनेक पक्षांचा विरोध (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तिसऱ्या आघाडीचा भाजपलाच फायदा होईल, असा निष्कर्ष काँग्रेसने काढला असला तरी भाजपच्या विरोधात समविचारी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संघटित होणे सध्या तरी कठीणच दिसते. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढती अटळ आहेत.

हेही वाचा- तिसरी आघाडी भाजपाच्या फायद्याची! काँग्रेसच्या ठरावात भूमिका

तिसऱ्या आघाडीचा भाजपला फायदा होतो. यामुळेच सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका काँग्रेसच्या रायपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात मांडण्यात आली. तिसऱ्या आघाडीचा भाजपला फायदा होतो हे काँग्रेस नेतृत्वाचे विश्लेषण बरोबर असले तरी भाजप विरोधी सारे पक्ष काँग्रेसबरोबर लढण्यास तयार नाहीत याचाही काँग्रेसला विचार करावा लागेल.

हेही वाचा- काँग्रेस कार्यकारिणी समितीची निवडणूक होणार नाही; रायपूरमधील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निर्णय

भाजपच्या विरोधात सध्या पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव या तीन मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यापैकी ममता बॅनर्जी या अलीकडच्या काळात थंडावल्याची टीका केली जाते. पण त्या भाजपला मदत करणार नाहीत हे मात्र निश्चित. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षेतूनच भारत राष्ट्र समितीची स्थापना केली. केजरीवाल यांचाही राष्ट्रीय पातळीवर जागा व्यापण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही मुख्यमंत्री भाजपच्या विरोधात आहेत तेवढेच काँग्रेसच्याही विरोधात आहेत. केजरीवाल काँग्रेसला अजिबात जवळ करत नाहीत. चंद्रशेखर राव काँग्रेस जणू काही शत्रू असल्यागत वागतात. ममतांनाही काँग्रेसचे ओझे नको आहे. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्षा जनता दलाला काँग्रेसपेक्षा भाजप अधिक जवळचा वाटतो. हे सारे नेते काँग्रेस किंवा राहुल गांधी यांचे नेतृत्व मानण्यास तयार नाहीत. दुसरीकडे काँग्रेस या पक्षांच्या आघाडीत सहभागी होणार नाही. यामुळे तिसऱ्या आघाडीमुळे भाजपचा फायदा होतो, असे मत काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जूुन खरगे यांनी मांडले असले तरी सध्या तरी तिसरी आघाडी होणार हे निश्चित आहे.

हेही वाचा- कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये काय होणार?

काँग्रेसबरोबर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार, केरळात मुस्लीम लिग असे काही ठराविक पक्ष सोडले तर अन्य पक्ष आघाडी करण्यास फारसे उत्सूक दिसत नाहीत. डाव्या पक्षांनी पश्चिम बंगाल किंवा त्रिपूरामध्ये काँग्रेसबरोबर आघाडी केली असली तरी ती उभयतांची अपरिहर्यता होती. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात राष्ट्रीय पातळीवर आघाडी होण्यास केरळचा अडथळा आहे. यातूनच सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसने केले असले तरी सध्या तरी भाजप, काँग्रेस व मित्र पक्ष आणि तिसरी आघाडी अशी तिरंगी लढती अटळ दिसतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 13:08 IST
ताज्या बातम्या