Opposition in Parliament Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडल्याचे दिसून आले. सोमवारच्या कामकाजानंतर पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस वगळता जवळपास सर्व विरोधी पक्षांनी नीटसह विविध परीक्षांचे पेपरफुटी प्रकरण आणि जंतरमंतरवरून संसदेकडे निघालेल्या तरुणांच्या मोर्चाचा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत आक्रमकपणे उपस्थित करण्याचा आग्रह धरला.

विरोधी पक्षांनी मंगळवारी देखील दोन्ही सभागृहांतील कामकाजात याच मुद्द्यांवरुन सरकारला घेरायचे ठरवले आहे. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी कथित गैरव्यवहाराचा मुद्दा, नीटसह विविध परीक्षा पेपरफुटी या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करायचे, यावर बैठकीत एकमत झाले.

काँग्रेसचा यू-टर्न

द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या राज्यसभेतील दालनात विरोधकांची बैठक पार पडली. सुरुवातीला केवळ राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारावरुन सरकारला जाब विचारण्याची काँग्रेसची भूमिका होती. मात्र, इतर विरोधी पक्षांनी पेपरफुटी आणि सीजेपीच्या संसदेवरील मोर्चाचा मुद्दा देखील चर्चेत आणण्याचा आग्रह धरला.

बैठकीत विरोधी पक्षांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद दिसून आले. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस सुरुवातीला केवळ राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याच्या भूमिकेत होती. मात्र, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस (TMC), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि डाव्या पक्षांसह इतर सर्व विरोधी पक्षांनी नीटसह विविध परीक्षा पेपरफुटीचा मुद्दा दोन्ही सभागृहांत उपस्थित करण्याचा आग्रह धरला. अखेर सर्व पक्षांची समान भूमिका पाहून काँग्रेसनेही या मागणीला मान्यता दिली आहे.

बैठकीत उपस्थित खासदाराने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, सुरुवातीला सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्याबाबत काँग्रेस साशंक होती. मात्र, इतर विरोधी पक्ष ठाम राहिल्यानंतर काँग्रेसनेही भूमिका बदलली आणि या मुद्द्यावर विरोधकांमध्ये अखेर एकमत झाले.

विरोधी पक्षांच्या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील उपनेत्या सागरिका घोष, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव, माकपचे जॉन ब्रिटास, भाकपचे पी. संतोष कुमार यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत सरकारविरोधातील रणनीती, सभागृहातील समन्वय आणि विविध मुद्द्यांवर संयुक्त भूमिका ठरवण्यात आली.

आदल्या दिवशी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत वाद निर्माण झाला. केंद्र सरकारने बोलावलेल्या या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे फुटीर खासदार जे नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI)मध्ये विलीन झालेत, त्यांना निमंत्रण दिल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता, यावरून वातावरण तापले आणि विरोधी पक्षांनी बैठकीतून वॉकआऊट केले.

सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानीतील वातावरण तप्त

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीजेपीच्या आंदोलनामुळे वातावरण तापले आहे. लोकसभेत काँग्रेस वगळता अन्य विरोधी पक्षांनी सभागृहात कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. पण ही मागणी मान्य झाली नाही. सभागृहाचे कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर राजधानी दिल्लीत सध्या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून सरकारच्या भूमिकेकडे अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारला अनेक मुद्द्यांवर घेरण्याची रणनिती आखली आहे. पेपरफुटी, सीजेपी आंदोलन, अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार, शेतकरी आणि बेरोजगारीचे प्रश्न तसेच इतर जनहिताच्या विषयांवर सरकारला जाब विचारणार असल्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही सभागृहांत जोरदार गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.