आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीवरून विरोधकांची टीका

आमदार बांगर यांनी केलेली तक्रार योग्य असली तरी सत्ताधारी आमदारांनी कायदा हातात घेण्याची वृत्ती त्यात दिसून येते. त्यामुळे बांगर यांच्या कार्यशैलीबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत.

आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीवरून विरोधकांची टीका
आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीवरून विरोधकांची टीका

औरंगाबाद : नोंदणीकृत कामगारांना भोजन पुरविणाऱ्या कंत्राटदाराने राखलेला दर्जा निकृष्ट असल्याचे सांगत आमदार संतोष बांगर यांनी कंत्राटदार कर्मचाऱ्यास चापटा मारत केलेल्या मारहाणीवरून सरकारच्या कार्यशैलीबद्दल नवे प्रश्न विचारले जात आहेत.

नोंदणीकृत कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या भाेजनाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदार बांगर यांनी अधिकाऱ्यांसह छापा टाकून कारवाई करणे अभिप्रेत होते. मात्र, तसे न करता लोकप्रतिनिधी म्हणून आमदार बांगर यांनी मारहाण करणे चुकीचे असल्याचे मत शिवसेनेचे अजित मगर यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केले.

आता कागदी घोळ घालण्यापेक्षा थेट कारवाई करण्यावर आपला भर असेल असे मुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीरपणे सांगितल्याने सत्ताधारी आमदारांकडून कारवाईसाठी होणारा आग्रह नियमबाह्य असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून अशा नियमबाह्य पद्धतीने केलेल्या कारवायांच्या घटना गेल्या दोन दिवसात समोर आल्या आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

निकृष्ट जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराला विचारणा करण्यासाठी गेलेले आमदार बांगार यांनी दबंग शैलीत कर्मचाऱ्यास विचारणा केली. करपलेल्या पोळ्या आणि ठरवून दिलेल्या यादीप्रमाणे जेवणातील पदार्थ नसल्याचे सांगत कर्मचाऱ्यांच्या कानशीलात लगावत जाब विचारला. या घटनेची चलचित्रे समाजमाध्यमांमधून समोर आली आहेत. त्यानंतर नव्या चर्चेला सुरूवात झाली.

लोकप्रतिनिधींनी गैरप्रकार लक्षात आणून द्यावेतच पण त्यांची कार्यपद्धती ही मारहाणीची असावी का, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर आमदार बांगर यांचे वर्तन तळ्यात-मळ्यात होते. अगदी शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात आमदार बांगर सहभागी झाले. तत्पूर्वी शिवसेनेतच राहू, उद्धव ठाकरे यांची पाठराखण करू असे डोळ्यात पाणी आणून सांगितले होते. त्यामुळे मिळालेली सहानुभूती सर्वसामान्यांच्या मनातून जाण्यापूर्वी ते शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांची टर उडविणे सुरू केले. त्यातूनच बाहेर पडण्यासाठी ते आक्रमक झाले असावेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. आमदार बांगर यांनी केलेली तक्रार योग्य असली तरी सत्ताधारी आमदारांनी कायदा हातात घेण्याची वृत्ती त्यात दिसून येते. त्यामुळे बांगर यांच्या कार्यशैलीबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत.

केवळ हिंगोलीच नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्यातही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी महसूल विभागातील अधिकारी सरसकट प्रत्येक कामासाठी पैसे मागतात असा आराेप केला. असे सरसकट आरोप शासन यंत्रणेला बदनाम करणारे असल्याने सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते करावेत का, असाही प्रश्न विचारला जात आहे. कोणत्या प्रकरणात कोणी पैसे मागितले ते सांगा त्याविरोधात प्रशासन थेट पोलिसांमध्ये तक्रार करेल असे उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावल्यानंतर ही चर्चा थांबल्याचे बैठकीतील सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राजस्थान : दलित विद्यार्थ्याच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले; गेहलोत यांच्यासाठी दलित अत्याचाराचा मुद्दा अडचणीचा ठरणार?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी