नवी दिल्ली : आयुर्विमा व आरोग्य विम्यावरील १८ टक्के जीएसटी मागे घेण्याची मागणी करत मंगळवारी ‘इंडिया’तील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या आवारात तीव्र निदर्शने केली. यासंदर्भात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले होते. विरोधकांनी निदर्शनाद्वारे गडकरींच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा >>> कारण राजकारण : ‘मागच्या बाकांवरील’ सावेंची मतदारसंघात अडचण

आरोग्य विम्यावर जीएसटी आकारणे हा कर-दहशतवाद आहे, अशी निषेधाची फलके घेऊन विरोधी पक्षनेत्यांनी संसदेच्या मकरद्वारात घोषणाबाजी केली. या निदर्शनामध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह तृणमूल काँग्रेस, शिवसेना-ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा आदी इंडिया आघाडीतील नेते सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते सुदीप बंडोपाध्याय यांनी आयुर्विमा व आरोग्य विम्यावरील १८ टक्के जीएसटी वसूल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय जनतेविरोधी आहे. सामान्य लोकांना याच विम्याचा आधार असून त्यावरही सरकार कर लादणार असेल तर लोकांनी कुठे जायचे, असा प्रश्न बंडोपाध्याय यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आयुर्विमा व आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.