दिल्ली पोलिसांनी लावलेले बॅरिकेड आंदोलकांनी पहिल्यांदा हटवण्यापूर्वी किंवा दिल्ली पोलिसांकडून अश्रूधुराची पहिली नळकांडी फोडली जाण्याआधी विविध क्षेत्रात काम करणारे पालक, विद्यार्थी, शिक्षक, सुशिक्षित तरूणाई जंतर मंतर मैदानावर जमा झाली होती. संसदेवर निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जंतर मंतरवर जमा झाले होते.

मोर्चाच्या दिवशी म्हणजेच २० जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) मोर्चात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागांमधून लोक जमा झाले होते. नीट पेपरफुटीप्रकरणी नैतिक जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी त्यांची होती. त्यांच्या आजूबाजूला दिल्ली पोलिसांचे जवान तैनात होते. जंतर मंतरच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर त्यांनी बॅरिकेड्स लावले होते.

देशभरातून आंदोलक जंतर मंतरवर

सीजेपीची अत्यंत महत्त्वाचे सदस्य असलेली एक टीम तिथे उपस्थित पोलिसांशी मोर्चाला परवानगी देण्याबाबत चर्चा करत होती. पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोलन सुरू ठेवण्यासाठी आणि संसदेवर मोर्चा काढण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी मोर्चाच्या एक दिवस आधी (रविवारी) सांगितले होते. दरम्यान, देशभरातून तिथे गोळा झालेल्या आंदोलकांवर याचा कोणताही परिणाम झाला नाही.

“आम्हाला शिक्षण व्यवस्थेत बदल हवा, श्रीमंत व गरीब मुलांना…”

मोर्चाच्या दिवशी दिल्लीतील शाहदरा भागातील दीपा (वय ४२) त्यांच्या पती व तीन मुलांसह जंतर मंतरवर सकाळी साडेसहाच्या सुमारास आल्या. “माझी दोन मुले दहावी व बारावीत सरकारी शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांचे भविष्यही टांगणीला लागले आहे. श्रीमंत व गरीब मुलांना शिक्षणाची समान संधी मिळेल, समान संसाधने मिळतील, असा बदल आम्हाला शिक्षण व्यवस्थेत हवा आहे. तसे झाले तरच बदल घडून येईल”, असे दीपा म्हणाल्या.

दीपाचे पती प्रल्हाद (वय ४६) म्हणाले, “आम्ही संध्याकाळपर्यंतही पोलिसांच्या परवानगीची वाट पाहण्यास तयार आहोत. जर आम्ही घाबरलो असतो तर आम्ही इथे कशाला आलो असतो.” त्यांचा मुलगा जो आयआयटी-जेईई परीक्षेची तयारी करतोय तो म्हणाला, माझी बहीण जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी उपस्थित आहे. प्रत्येक रात्री गर्दीत कशी वाढ होतेय याची माहिती तिने आम्हाला दिली होती.

“तुमच्या नाकाखालून काहीतरी घडतंय तर तुम्ही…”

जवळच, तीन तरूण उभे होते. त्यापैकी एक मुंबईतील अभिनेता व शिक्षक होता, तर इतर दोघे जयपूरमधील आर्किटेक्ट होते. त्यांची भेट मोर्चाच्या दिवशी सकाळी झाली होती. मोर्चा सुरू होण्याची ते वाट पाहत होते. या आंदोलनाची माहिती पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर कळाली, असे मुंबईत अभिनेता आणि शिक्षक असलेल्या उजयने सांगितले. तो म्हणाला, “आंदोलनाचा मुद्दा मला सुरूवातीला कळला नाही. त्यानंतर मी माझ्या मित्रांशी चर्चा केली. मंत्र्याने राजीनामा द्यावा असे त्यांना वाटत नव्हते. पण जर तुमच्या नाकाखालून काहीतरी घडतंय तर तुम्ही जबाबदारी घ्यायला हवी. अन्यथा, या गोष्टी सतत घडत राहतील.” दरम्यान, तिथे असलेल्या कडक पोलिस बंदोबस्तामुळे उजयला अस्वस्थ वाटत होते. “इतके सगळे लोक जमा झालेले पाहून छान वाटत आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त पाहून भीतीही वाटतेय. लोकांची सुरक्षा करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे”, असे उजय म्हणाला.

उजय, दुष्यंत, अभय (Express Photo)

“ज्यांच्या विरोधात आंदोलन करायचं त्यांच्याकडूनच…”

त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दिल्लीतील आर्किटेक्टला प्रश्न पडला होता, संसदेवर मोर्चा काढण्यासाठी परवानगी घेण्याची काय गरज आहे? “आंदोलन करण्यासाठी आपल्याला परवानगी का घ्यावी लागते आणि तीही त्यांच्याकडूनच ज्यांच्याविरोधात आपण आंदोलन करतोय. आंदोलन करणे हा आपला मुलभूत हक्क आहे.”

तरूण आंदोलकांना पाहून उत्साह वाढल्याचे जयपूरमधून दिल्लीत आलेल्या ४० वर्षीय आर्किटेक्ट दुष्यंतने सांगितले. “माझ्या पिढीने जे प्रश्न विचारले नाही, ते प्रश्न ते विचारत आहेत. आंदोलन करणे हा आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार असताना आपल्याला परवानगी का लागते, असा प्रश्न त्यांना पडलाय. जर परवानगी दिली नाही, तर आम्ही किमान त्यांना आमची संख्या दाखवू”, असे दुष्यंत म्हणाले.

रंजन, अमित आणि नितीन (Express Photo)

“आमचं आयुष्य बेभरवशाचं कारण…”

१९ वर्षीय ब्लिंकिट डिलिव्हरी एजंट नितीन आणि अनिल यांनीही आंदोलनात भाग घेतला होता. त्यांच्यासह त्यांचे मित्र रंजन हे उत्तर प्रदेशमधील बरेलीतून आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले होते. या तिघांनाही उदरनिर्वाहासाठी पैसे कमवावे लागल्याने शालेय शिक्षण सोडावे लागले होते. “नीट पेपर फुटल्याने २० विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. ज्यामुळे भविष्यात तरी अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. आमचं आयुष्य खूपच बेभरवशाचं आहे. कारण आम्ही दिवसभर दुचाकीवर असतो. लोकांना वस्तू पोहोचवतो. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती मौल्यवान आहे, ते आम्हाला माहिती आहे”, असे ते म्हणाले.