तमिळनाडूमधील बहुजन समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाची हत्या झाल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दलित आणि वंचितांचे नेहमीच अन्याय, भेदभाव यांबरोबरच शोषण होते. तसेच, राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळातील दलितांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा यानिमित्ताने केला जात आहे. गुंडांमधील टोळीवर्चस्वातून बसपाचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांची हत्या झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येचा निषेध करण्यासाठी शनिवारी आघाडीचे चित्रपट निर्माते व दलित चळवळीतील कार्यकर्ते पा. रंजीत यांनी चेन्नईमध्ये न्यायाच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. या रॅलीमध्ये आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. पा. रंजीत यांनी सत्ताधारी द्रमुक पक्षासह मुख्य प्रवाहातील पक्षांवर हल्लाबोल केला. अनुसूचित जातींना राजकीय अवकाश नाकारले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पा. रंजीत यांनी 'कबाली' (२०१६) व 'काला' (२०१८) यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी भूमिका केली आहे. हेही वाचा : एकेकाळी राजकीय विजनवासात गेलेला ‘रालोद’ ताकद मिळताच उत्तर प्रदेशमध्ये कसा करतोय विस्तार? पा. रंजीत यांनी स्थापन केलेल्या नीलम कल्चरल सेंटरने या रॅलीचे आयोजन केले होते. रंजीत हे आर्मस्ट्राँग यांचे निकटवर्तीय होते. मोर्चानंतर झालेल्या सभेला संबोधित करताना रंजीत यांनी आर्मस्ट्राँग यांचा 'अण्णा' (मोठा भाऊ) असा उल्लेख केला. त्याशिवाय आर्मस्ट्राँग हे चेन्नईतील एक शक्तिशाली नेते होते, असेही त्यांचे वर्णन केले. पुढे आर्मस्ट्राँग यांच्या हत्येमागे मोठा कट असू शकतो, असेही रंजीत यांनी बोलताना सुचवले. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचा सखोल पोलीस तपास करण्याची मागणीही त्यांनी केली. पोलिसांनी सांगितले की, आर्मस्ट्राँग यांच्या हल्लेखोरांनी अर्कोट सुरेश यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांची हत्या केली आहे. पोलिस तपासामध्ये सुरेश आणि आर्मस्ट्राँग यांच्यामध्ये वैर असल्याचे आढळून आले असून, आर्मस्ट्राँग यांची हत्या करणाऱ्यांमध्ये सुरेश यांचा भाऊ पोन्नई व्ही. बाळू याचाही समावेश आहे. सुरेश आणि आर्मस्ट्राँग हे दोघेही विविध पक्षांचे वाद सोडविण्यात गुंतलेले होते. त्यातूनच त्यांच्यातील वैमनस्य वाढत गेले होते. पोलीस तपासामध्ये आर्मस्ट्राँग यांच्या हत्येमागे राजकीय आणि जातीय, असा कोणताही हेतू असण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. अनेक दलित गटांनी पोलिसांचे हे म्हणणे मान्य केलेले नाही. आर्मस्ट्राँग यांची ५ जुलै रोजी त्यांच्या बांधकामाधीन घराबाहेर हत्या झाली आहे. रंजीत यांनी या रॅलीत धडाकेबाज भाषण केले. ते म्हणाले की, जस्टिस पार्टीच्या काळापासूनच दलितांना सर्व काही नाकारण्याचे राजकारण केले जात आहे. जस्टिस पार्टीमधूनच द्राविडीयन पक्षांचे राजकारण उदयास आले आहे. रंजीत म्हणाले, "आम्ही आंबेडकर, अयोधिदास पंडितर, जॉन रथिनम, रेत्तमलाई श्रीनिवासन, मीनम्मल आणि व एमसी राजा यांची मुले आहोत." पुढे त्यांनी विचारले, "आम्ही कशाला घाबरायचं? तुम्ही आम्हाला खायला देता का? तुम्ही आम्हाला नोकऱ्या दिल्यात? आम्ही तुम्हाला का घाबरायचं? मद्रासमध्ये ४० टक्क्यांहून अधिक दलित आहेत. आम्ही तुम्हाला इशारा देतोय." रंजीत यांनी या मोर्चातील भाषणामधून सत्ताधारी द्रमुक आणि प्रमुख विरोधी पक्ष एआयएडीएमके यांना एक प्रकारे इशारा दिला आहे. त्यांनी या प्रमुख पक्षांना त्यांच्या ‘दलित व्होट बँके’ची आठवणही करून दिली. हेही वाचा : राजस्थानच्या राजकारणात स्वतंत्र ‘भिल प्रदेश’ राज्याची मागणी का जोर धरू लागली आहे? रंजीत यांनी पुढे म्हटले की, आर्मस्ट्राँग यांनी हिंदू धर्मातील भेदभाव करणाऱ्या प्रथांच्या विरोधात लढा दिला. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि बौद्ध मंदिरेही बांधली. "त्यांचे अलीकडचे हे कामदेखील त्यांच्या हत्येमागचे कारण असू शकते. चेन्नई शहराच्या महापौर (डीएमकेच्या आर. प्रिया) यांना दलित आरक्षणामुळे त्यांचे पद मिळू शकते, हे लक्षात ठेवा." पुढे रंजीत यांनी असा आरोप केला की, द्रमुक पक्षातील अनुसूचित जातींमधील नेतेही आर्मस्ट्राँग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासाठी उभे राहत नाहीत. "आर्मस्ट्राँग यांच्या पाठीशी उभे राहण्यापासून तुम्ही किती खासदारांना रोखत आहात? किती ऑनर किलिंग झाल्या? जातीमुळे आपण किती वर्षे सहन करीत आहोत? द्रमुक असो वा अण्णा द्रमुक, जेव्हा आमच्या नेत्यांची हत्या होते, तेव्हा तुम्ही त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करू शकत नसाल, तर तुम्ही कुणाचे गुलाम तर नाही ना? आम्ही गुलाम नाही. आम्ही आंबेडकरांची लेकरे आहोत. आम्ही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही; परंतु आम्ही आमच्या मतांद्वारे आमचे महत्त्व दाखवून देऊ", असेही रंजीत यांनी म्हटले. तमिळनाडूमध्ये सामाजिक न्यायासाठी दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे. आरक्षण आणि सरकारी कल्याणकारी योजनांमुळे वंचितांच्या उत्थानामध्ये थोडा तरी हातभार लावला गेला आहे. या योजनांनी अनेक दशकांपासून दलितांचे सक्षमीकरण केले असले तरीही दलितांना पुरेशा प्रमाणात सामाजिक न्याय अद्याप मिळालेला नाही. त्यांना पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्वही प्राप्त झालेले नाही, असे अनेक अभ्यासक सांगतात. अभ्यासकांच्या मते, ग्रामीण तमिळनाडूमध्ये दलितांना आजही भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे दलितांवरील हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या २१ टक्क्यांपेक्षा जास्त दलितांची लोकसंख्या आहे. असे असूनही प्रमुख पक्षांमध्ये दलितांचे नेतृत्व पुरेशा प्रमाणात नाही. तमिळनाडूतील VCK हा दलितांचा पक्ष आणि द्रमुक हे मित्रपक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपाही दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. इतिहास पाहिला, तर आजवर दलितांनी द्रविडी पक्षांच्या मागे उभे राहणे पसंत केले आहे. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येबद्दल काही दलित नेते व विचारवंतांचे म्हणणे आहे की, टोळ्यांमधील वादातून ही हत्या झाली असेलही; मात्र त्याहून सखोल मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. हा मुद्दा दलित आणि वंचितांचा आहे. या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये नेहमीच दलितांना चिरडण्याचा प्रयत्न केला जातो, असे त्यांचे मत आहे.