जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ पर्यटकांचा तर एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने तसेच जम्मू – काश्मीर पोलिसांनी अनेक मोठे बदल केले आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात लपून बसले होते. त्यांना शोधून काढणे हे सैन्यासाठी तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. जम्मू – काश्मीर पोलिसांनी जंगल तसेच उंच भागांवर ऑपरेशन्स करू शकतील अशा दोन विशेष दलांची स्थापना केली आहे. बर्फाळ प्रदेशात अतिउंच ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ‘स्नो लिओपार्ड’ व ‘मार्खोर’ या दोन प्राण्यांची नावे विशेष दलांना देण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेबाबत कोणते बदल झाले, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

‘स्नो लिओपार्ड’ आणि ‘मार्खोर’ नेमकं काय आहे?

“मागील तीन दशकांपासून आम्ही शहरी भागातील युद्ध कौशल्यात पारंगत झालो आहोत. ते तुलनेने सोपे देखील आहे. ज्या घरात दहशतवादी लपले आहेत, त्या घराला लक्ष्य केले की खेळ संपला. पण, जंगलातील युद्ध कौशल्य विकसित करणे आमच्यासाठी नवीन होते. ते अवगत करण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. आता आम्ही त्यात पारंगत झालो आहोत”, असे जम्मू-काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिस दलाने स्पेशल ऑपरेशन ग्रुपबरोबरच आणखी दोन विशेष दलांची स्थापना केली. काश्मीर खोऱ्यात उंच डोंगराळ भागात, घनदाट जंगलात ऑपरेशन्स करण्याचे प्रशिक्षण दोन्ही दलांना देण्यात आले. ‘स्नो लिओपार्ड’ आणि ‘मार्खोर’ अशी नावे त्या दलांना देण्यात आली आहेत. स्नो लिओपार्ड व मार्खोर ही प्राण्यांची नावे असून हे दोन्ही प्राणी बर्फाळ प्रदेशात अति उंच ठिकाणी वास्तव्य करतात. हे दोन्ही प्राणी त्यांच्यातील सामर्थ्य, लवचिकता, अचूकता आणि वेग यांसाठी ओळखले जातात. ‘स्नो लिओपार्ड’ दलाला अति उंचीवर ऑपरेशन्स करण्याचे, तर ‘मार्खोर’ दलाला घनदाट जंगलात ऑपरेशन्सचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतातील वेगवेगळ्या सुरक्षा दलांबरोबर या दोन्ही विशेष दलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा

‘स्नो लिओपार्ड’ व ‘मार्खोर’ यांना कोणत्याही ऑपरेशन्ससाठी तयार ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने देखील स्वत:च्या क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील अतिउंच डोंगराळ भागात पॅराट्रुपर (भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेस) तैनात करण्यात आले आहेत. याच स्पेशल फोर्सेसच्या जवानांनी मागील वर्षी २८ जुलै रोजी पहलगामी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सुलेमान उर्फ फैजल जाट, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी श्रीनगरच्या बाहेरील भागात असलेल्या दाचिगम वन क्षेत्रात दडून बसले होते. पॅरा जवानांनी त्यांना शोधून ठार केले.

डिसेंबर २०२५ मध्ये भारतीय सैन्याने पीर पंजाल डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात लष्करी मोहीम हाती घेतली होती. पीर पंजाल डोंगराळ भाग हा एकीकडे काश्मीर खोरे ते पुंछ व राजौरी पर्यंत पसरलेला आहे. तर दुसरीकडे किश्तवाड आणि दोडापर्यंत पसरलेला आहे. या भागात सैन्याने कारवाई करून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाच्या सैफुल्ला समुहाला संपवले. तसेच पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशी धागेदोरे असलेले नेटवर्कही उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांची लपण्याची ठिकाणे उद्ध्वस्त केली.

दर आठवड्याला जॉइंट कंट्रोल सेंटरच्या बैठकीत काय होते?

“पहलगाम हल्ल्यानंतर रणनीती पूर्णपणे बदलण्यात आली आहे. आधी ते (दहशतवादी) आम्हाला लक्ष्य करण्यासाठी शोधत होते. आता आम्ही त्यांना शोधत आहोत. त्यांच्या मागावर आहोत. त्यांना सतत पळावे लागत असल्याने पहलगाम हल्ल्यानंतर त्यांना कोणत्याही हल्ल्याचे नियोजन करणे शक्य झाले नाही”, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम सहकार्य ठेवले आहे. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या यंत्रणेपासून ते गुप्तचर यंत्रणेपर्यंत एकमेकांशी सुरक्षा यंत्रणा ताळमेळ साधत आहेत. दर आठवड्याला सुरक्षा यंत्रणा जॉइंट कंट्रोल सेंटर उपक्रमातून बैठका घेतात. त्यात तात्काळ हाती घेण्यायोग्य असलेल्या मोहीम व गुप्तचर यंत्रणांच्या अहवालांची माहिती दिली जाते.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी यापूर्वी शहरी भागात दडून बसायचे. आता दहशतवाद्यांनी जम्मू तसेच काश्मीरलगत असलेल्या ग्रामीण भागांमध्ये दडून बसण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी अड्डे तयार केले आहेत. त्यामुळे पीर पंजालच्या अलिकडे असलेल्या जम्मू व पलिकडे असलेल्या काश्मीर या दोन्ही भागांतील सुरक्षा यंत्रणांमध्ये ताळमेळ असणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

पहलगाम हल्ल्यात चिनी डिव्हाइसचा वापर – NIA

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी चायनीज इलेक्ट्रॉनिक उपक्रमांचा वापर हल्ल्यासाठी केल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आहे. दोन महिन्यांपूर्वी चीनमधील एका न्यायालयाला ‘लेटर रोगेटरी’ पाठवण्यात आल्याचे एनआयएने सांगितले आहे. पहलगाम हल्ल्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणाची पुरवठा साखळी व त्याचा शेवटी वापर कोणी केला याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान आतापर्यंत चिनी न्यायालयाकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे एनआयएने सांगितले.

एनआयएचे उपमहानिरीक्षक संदीप चौधरी यांनी जम्मू मधील एनआयएच्या विशेष न्यायालयात सांगितले होते की, पहलगाम हल्ल्याशी संबंधित अनेक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. त्यातील एक महत्वाचे उपकरण म्हणजे गोप्रो कॅमेरा आहे. हल्ला करण्यापूर्वी या कॅमेऱ्यात अनेकदा चित्रीकरण करण्यात आले. त्यातून दहशतवाद्यांनी हल्ला कसा करायचा, कधी करायचा याचे नियोजन केले. हल्ल्यात सहभागी तिन्ही दहशतवाद्यांकडून दोन चिनी बनावटीच्या फोनचा वापर करण्यात आला होता. संबंधित फोन हे पाकिस्तानात विकले गेल्याचे चिनी कंपनीने सांगितले आहे.

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण?

पहलगाम हल्ल्याचे नियोजन लष्कर-ए-तय्यबा (LeT)/द रेझिस्टन्स फ्रंड (TRF)च्या साजिद जाट या दहशतवाद्याने केले होते, अशी माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. “भारतात हल्ल्यासाठी ड्रोनने हत्यारे टाकणे, हल्लेखोरांच्या हालचालींचे नियोजन करणे, पर्यंटकांवर हल्ला करणे या सगळ्या गोष्टी साजिदने हाताळल्या आहेत. तपासादरम्यान एनआयएने १११३ जणांची कसून चौकशी केली. त्यात ५४३ ढोक रहिवासी, ११७ पोन्नीवाले (घोडे किंवा खेचरवाले), ६७ पशूधनाचे मालक, ५२ स्थानिक खाद्यपदार्थ विकणारे, १९ दुकानदार, ४२ फोटोग्राफर्स, ३६ तिकिट काऊंटरवर काम करणारे व झिपलाइन चालवणारे, ३१ शाल विकणारे, २५ टॅक्सी चालक आणि २३ इतर संशयितांचा तपास करण्यात आला.”, अशी माहिती एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.